मराठीत आता अनुवादित साहित्यालाही अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. अनुवादित साहित्याची नियतकालिके वा दिवाळी अंक काढले जातात व ते वाचलेही जातात. फार पूर्वी नाटककार मामा वरेरकर यांनी बंकिमचंद्र, रवींद्रनाथ टागोरांच्या बंगाली भाषेतील कथा मराठीत आणण्याचे काम केले होते. त्यानंतर गेल्या तीन दशकांत शरदबाबू ते तसलिमा नासरिन अशा अनेक नामवंत लेखकांच्या बंगाली पुस्तकांचा मराठीत अनुवाद करणाऱ्यांमध्ये मृणालिनी गडकरी यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल.

हिंदी म्हटले की चंद्रकांत पाटील, कानडी साहित्य म्हटले की उमा कुलकर्णी ही नावे साहित्यप्रेमींना आठवतात. तसेच मृणालिनी गडकरी यांनी बंगालीतील अभिजात साहित्याचे दालन मराठी वाचकांसाठी खुले केले. त्यांचा जन्म १२ जानेवारी १९४९ चा. साहित्याची आवड असली तरी त्यांनी बीए (ऑनर्स) ही पदवी घेतली ती जर्मन ही प्रमुख भाषा निवडून. मग पदव्युत्तर पदवी मराठी साहित्यातून घेतली. एमफिलसाठी त्यांनी ‘बा.भ. बोरकर आणि रवींद्रनाथ टागोर यांच्या कवितेतील निसर्ग’ हा काहीसा वेगळा विषय निवडला. ‘टागोरांच्या कविता आणि समकालीन मराठी कविता’ यावर त्यांनी सखोल चिंतन आणि मनन केल्यानंतर आपला प्रबंध लिहिला.   पुढे बंगाली साहित्य मराठीत आणण्याकडे त्यांनी प्राधान्याने लक्ष दिले. शरदबाबूंच्या ‘देवदास’ने तर अनेक भाषांतील साहित्यिकांना भुरळ घातली. कुठल्याही एका भाषेतून दुसऱ्या भाषेत अनुवाद करायचा असेल तर दोन्ही भाषांतील शब्दांच्या विविध अर्थच्छटा व त्यांच्या खाचाखोचा यांची चांगली जाण असणे आवश्यक असते. तसेच दोन्ही भाषांमधील संस्कृती आणि परंपरांचेही ज्ञान असणे गरजेचे असते. याचे भान गडकरी यांना होते. म्हणूनच त्यांच्या ‘देवदास’ला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला.  ‘अज्ञात विवेकानंद’, ‘निर्बाचित कलाम’, ‘काबुलीवाल्याची मराठी बायको’, तसलिमा नासरिनचं ‘आमार मेयेबेला’ (माझं कुवारपण), ‘क्रांतियोगिनी भगिनी निवेदिता’ (चरित्र), शीर्षेन्दू मुखोपाध्याय यांचं ‘गोसावी बागेतील भूत’ (बालसाहित्य), ‘नष्ट मेअर, नष्ट गद्या’ ही त्यांची काही गाजलेली पुस्तके. विवेकानंदांचे चरित्र ढोबळमानाने बहुतेकांना माहीत असते; पण संन्यास घेतल्यानंतरही स्वामींनी संवेदनशीलता कशी जपली, आईसाठी त्यांना कौटुंबिक भाऊबंदकीत का लक्ष घालावे लागले, त्यांचे चहावरचे प्रेम, खानपानातल्या आवडीनिवडी, आपला अंतकाळ जवळ आल्याची जाणीव झाल्यानंतर त्यांनी केलेली निरवानिरव असे त्यांचे अनेक अज्ञात पैलू विवेकानंदांवरील पुस्तकात उलगडून दाखवण्यात आले आहेत.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
eknath shinde
Eknath Shinde: एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते? ‘दाल…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

साहित्यसेवेबद्दल मृणालिनी गडकरी यांना मातृ-पितृ पुरस्कार, सुभाष भेंडे पुरस्कार, प. बंगाल सरकारचा शरद पुरस्कार, जी.ए. कुलकर्णी पुरस्कार, रणजित देसाई अनुवाद पुरस्कार असे अनेक मानसन्मान मिळाले. साऱ्या जगाला जवळ आणणारे, एकमेकांच्या संस्कृतीची ओळख करून देणारे अनुवादित साहित्य बहरत आहे. त्यातील मृणालिनी गडकरी यांचे योगदान लक्षणीय आहे. त्यांच्या निधनाने अनुवादित साहित्यातील एक महत्त्वाचा दुवा निखळला आहे.

Story img Loader