हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक विक्रम प्रस्थापित करणारा ‘शोले’ हा चित्रपट अनेक कारणांसाठी लक्षात राहतो. ‘अंग्रेजों के जमाने का जेलर’ ते ‘इतना सन्नाटा क्यूं है भाई’ ..सारखे संवाद सिनेप्रेमींना आठवतात, तर पांढऱ्या साडीतील जया भादुरी ठाकुरांच्या हवेलीतील एकेक दिवा मालवताना तिचे आयुष्यच जणू अंधकारमय झाल्याचे वाटत राहते. यावेळी माऊथ ऑर्गनवर अमिताभने वाजवलेली सुरावट त्या प्रसंगाला अधिकच गहिरी बनवते. ही गाजलेली धून वाजवली होती भानू गुप्ता नावाच्या अवलिया कलावंताने!
मदन मोहन, सी रामचंद्र ते आर डी बर्मन अशा अनेक दिग्गज संगीत दिग्दर्शकांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी काम केले होते. त्यांचा जन्म तेव्हाच्या ब्रह्मदेशातील रंगूनचा. ब्रिटिश खलाशांकडून ते माऊथ ऑर्गन वाजवायला शिकले. त्यांना जपानी भाषा लिहिता, वाचता येत होती. वयाच्या बाराव्या वर्षी त्यांनी जपानी लष्करात इंग्रजी दुभाषी म्हणून काम केले. त्या वेळी दुसरे महायुद्ध सुरू झाले. ते व त्यांच्या कुटुंबीयांनी त्या काळात सुभाषचंद्र बोस यांच्यासमवेत काम केले. सुरुवातीला त्यांना वयाच्या पंधराव्या वर्षी प्लास्टिकचा माऊथ ऑर्गन भेट मिळाला. १९५० मध्ये ते कुटुंबीयांसमवेत भारतात आले. त्या वेळी युद्ध टिपेला पोहोचले होते. पश्चिम बंगालमधील हुगळी जिल्हय़ातील बैद्याबाती येथे त्यांचे वास्तव्य होते. कोलकात्यात त्यांनी तेल तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण घेऊन नंतर कालटेक्समध्ये काम केले. भानू हे चांगले क्रीडापटूही होते. बॉक्सिंग व क्रिकेट हे त्यांचे आवडते खेळ. वयाच्या अठराव्या वर्षी ते कोलकाता लीगकडून खेळले होते. त्या वेळी बापू नाडकर्णी, पंकज रॉय, गिलख्रिस्ट यांच्याबरोबर खेळण्याची संधी त्यांना मिळाली. नंतर ते नाइट क्लबमधून गिटार व माऊथ ऑर्गन वाजवत असत. खेळाची आवड असली तरी त्यात करिअर करणे शक्य नसल्याने ते संगीताकडे वळले. १९५९ मध्ये ते मुंबापुरीत आले.
‘पैगाम’चे संगीत दिग्दर्शक सी. रामचंद्र यांनी त्यांना पहिली संधी दिली. बिरीन दत्ता व सलील चौधरी यांच्यासाठीही त्यांनी वाद्यवादन केले. सलील चौधरी यांच्यासाठी काम करताना त्यांना एकदा जुनी गिटार मिळाली. त्या वेळी सोनिक ओमी या संगीत दिग्दर्शकाच्या घराजवळ ते राहायचे. तेथे मदन मोहन नेहमी येत असत. एकदा मदन मोहन यांनी भानूदांची गिटार ऐकली व ते प्रभावित झाले. त्यांनी त्यांना त्यांच्या चित्रपटांमध्ये संधी दिली. त्याच वेळी आर डी बर्मन चांगल्या गिटारवादकाच्या शोधात होते. भानू गुप्ता यांना लगेच पाचारण करण्यात आले. नंतर आर डी आणि त्यांची जोडी अखेपर्यंत कायम होती. काही काळ त्यांनी विलायत खाँ व उ. अल्लारखाँ यांच्यासोबतही गिटारची साथ केली. ‘पैगाम’पासून सुरू झालेली त्यांची कारकीर्द पुढे बहरतच गेली. मदन मोहन, सी रामचंद्र, एस डी बर्मन व आर डी बर्मन यांच्याबरोबर काम करण्याची संधी त्यांना मिळाली. त्याचे त्यांनी सोने केले. कश्मीर की कली, दोस्ती, शोले, यादों की बारात हे त्यांचे चित्रपट गाजले. त्यांच्या निधनाने जुन्या मोहमयी संगीताच्या दुनियेतील एक सुरावट कायमची शांत झाली आहे.