अरुणाचल प्रदेश या राज्याची राजधानी इटानगर, हे प्राथमिक शाळेतही शिकवले जाते; परंतु हा भूगोल कसा घडला, यामागचा गेल्या अवघ्या सहा दशकांचा इतिहास माहीत असणारे फार थोडे. मग नाबाम रुंघी यांचे कार्य कुणाला कसे माहीत असणार? रुंघी यांचे निधन रविवारी, १८ नोव्हेंबरच्या रात्री झाले. त्यांना स्थानिक पातळीवर वाहिल्या गेलेल्या आदरांजलींतून वारंवार त्यांचा उल्लेख ‘इटानगरला अरुणाचल प्रदेशची राजधानी म्हणून आकार देणारे’ असा होत राहिला.. त्यामुळे तरी त्यांच्या अनुल्लेखित कार्याकडे आता लक्ष वेधले जावे.
हे नाबाम रुंघी २० एप्रिल १९३५ रोजी जन्मले. चीनचे आक्रमण १९६२ साली झाले, तेव्हा भारताविषयी असलेल्या निष्ठेचे प्रत्यंतर देणाऱ्या स्थानिक तरुणांपैकी रुंघी हे एक. काही तरुणांचे नेतेसुद्धा. आक्रमणाची आग विझल्यावर १९६६ मध्ये जेव्हा ग्रामपंचायत व्यवस्था या प्रदेशात सुरू झाली, तेव्हा ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य अशी पदे रुंघी यांनी अल्पावधीत मिळवली. ‘नेफा’ म्हणजे ‘नॉर्थ ईस्ट फ्राँटियर एजन्सी’ असे नाव तेव्हा आजच्या अरुणाचल प्रदेशाला होते. भारतीय मुलकी प्रशासनापेक्षा सैनिकी वावरच त्याआधी इथे अधिक होता आणि मुख्यालय होते शिलाँग शहरात. अशा काळात ‘नेफा’चे पहिले लोकप्रतिनिधीगृह १९६९ मध्ये स्थापले गेले, त्यात रुंघी हेदेखील होते. राज्यस्थापनेच्या दृष्टीने, राजधानीची जागा निवडण्यासाठीच्या समितीचे प्रमुख म्हणून त्या लोकप्रतिनिधीगृहाने रुंघी यांची निवड केली. ‘राजधानी या प्रदेशाच्या सीमांपासून ५० मैल दूर (अंतर्भागात, केंद्रस्थानी) हवी’ असा निकष रुंघी यांनी ठरवला आणि त्यानुसार एका टेकडीवजा गावाची निवड झाली- तिथल्या विटा आणि मासे घेऊन रुंघी शिलाँगला गेले, त्या विटाच पुढे या शहराची कोनशिला ठरल्या, म्हणून हे ‘ईटा’-नगर!
कानाच्या टोचलेल्या पाळ्यांभोवती स्थायी रिंगा आणि त्यामध्ये अडकविलेल्या दोन लोंबत्या रिंगा, वर ‘हॉर्नबिल’ सुतारपक्ष्याची चोच असलेले शिरस्त्राण, अशा चर्येचे नाबाम रुंघी धर्माने ख्रिस्ती आणि मनाने भारतीय होते. क्रिकेटचे मैदान आपल्याकडेही हवे, म्हणून स्वत:ची भातशेती त्यांनी देऊन टाकली होती आणि ‘राज्याच्या निरंतर सेवेसाठी माझ्या राहत्या गावाऐवजी, इटानगरमध्ये मला घर द्या’ अशी मागणी वयाच्या सत्तरीत त्यांना करावी लागली होती. ती पूर्ण झाली नाही, पण अरुणाचलचे माजी मुख्यमंत्री कालिखो पुल यांनी दोन लाख रु. रोख आणि फिरण्यासाठी बोलेरो गाडी देऊन त्यांचा सत्कार केला होता.