मुंबईचे गतकालीन पोलीस आयुक्त मानसिंग चुडासामा यांचे पुत्र, नरेंद्रभाई हे ‘नाना’ म्हणूनच पहिल्यापासून परिचित राहिले. लहानपणापासूनच प्रखर वाणी आणि तेजस्वी नेतृत्वगुण अंगी असलेल्या नानांच्या तरुणपणी, त्यांच्या नेतृत्वगुणांची पारख करून स्वतंत्र पार्टीने त्यांना एका निवडणुकीची उमेदवारी दिली. ती निवडणूक नाना हरले; पण त्यामुळे मतदारांशी, म्हणजे समाजाशी नानांचे नाते जडले. ‘जेसीज’, ‘जायंटस इंटरनॅशनल’ या समाजभावी क्लबांमार्फत उभ्या केलेल्या कामांतूनच समाजापर्यंत पोहोचले. १९७२ मध्ये नानांच्या पुढाकाराने भारतभर ‘जायंट्स’तर्फे विविध सेवाकार्ये सुरू झाली आणि नाना चुडासामा हे नाव देशाच्या कानाकोपऱ्यातील वंचितांपर्यंत पोहोचले. लातूर, उस्मानाबादचा भूकंप, कच्छ-भुजमधील प्रलयंकारी भूकंपानंतर कमीत कमी वेळेत या संघटनेने मदतकार्य सुरू केले. जायंटसच्या आजवरच्या वाटचालीत नानांनी विविध योजना सुरू केल्या. कुटुंब नियोजन, शैक्षणिक मोहिमा, जलसंवर्धनाचे प्रयोग, पर्यावरण रक्षण, नेत्रदान मोहिमा, अपंग साहाय्यता उपक्रम, बेटी बचाओ अभियान, अशा अनेक मोहिमांना नानांनी बळ दिले. स्त्री भ्रूणहत्येचे प्रकार रोखले नाहीत, तर भविष्यात एक गंभीर सामाजिक समस्या उभी राहील, हे ओळखून नानांनी समाजाच्या विविध स्तरांतील नागरिकांना या अभियानात सहभागी होण्यासाठी एकत्र आणले. ज्या मुंबईत आपण राहतो, ते शहर आपले आहे, या शहराचे पर्यावरण जपले पाहिजे, याची जाणीव प्रत्येक मुंबईकराच्या मनात जागी करून देण्यासाठी नानांनी ‘आय लव्ह मुंबई’ नावाची चळवळ सुरू केली. ही चळवळ पुढे मुंबईच्या समाजजीवनाचे एक अविभाज्य अंग बनून गेली. या चळवळीच्या माध्यमातून मुंबईत अनेक सार्वजनिक शौचालये उभी राहिली. मुंबईच्या नगरपालपदाची सलग दोन वेळा धुरा सांभाळणारे नाना चुडासामा हे एकमेव व्यक्तिमत्त्व होते. कोणत्याही सामाजिक स्तरातील व्यक्तीशी समान पातळीवरून मत्री साधण्याची नानांची हातोटी वाखाणण्याजोगी होती. विविध क्षेत्रांतील नानांच्या उल्लेखनीय कार्याचा गौरव म्हणून सन २००५ मध्ये केंद्र सरकारने त्यांना ‘पद्मश्री’ देऊन गौरविले.
मुंबईत मरिन ड्राइव्हच्या एका चौकात नेहमीच एक फलक झळकताना दिसतो. सद्य:स्थितीवर एका ओळीत खुमासदार भाष्य करणारा हा फलक ही नानांची एक वेगळी ओळख ठरली. नानांच्या या फलकबाजीने एक इतिहास निर्माण केला. तो एवढा प्रभावी ठरला की, ‘हिस्ट्री ऑन अ बॅनर’ नावाच्या पुस्तकाने नानांचे फलक अजरामर करून ठेवले. गेल्या दोन-चार दिवसांपासून तो फलक नि:शब्द झाला आहे, कारण त्याला शब्द देणारे नाना आज अशा मोजक्या आठवणी मागे ठेवून काळाच्या पडद्याआड गेले आहेत.