विश्वाचा पसारा अगाध आहे. त्याचा वेध घेण्यासाठी हबल अवकाश दुर्बीण सोडण्यात आली, आधुनिक तंत्रज्ञानाचा हा चमत्कार होता. या दुर्बिणीच्या निर्मितीत एका महिलेचा मोठा वाटा होता. हबलची माता असेच नामाभिधान प्राप्त झालेल्या या महिला वैज्ञानिक म्हणजे नॅन्सी ग्रेस रोमन. त्यांच्या निधनाने नासाच्या माध्यमातून विश्वाला गवसणी घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रमुख महिला वैज्ञानिकांपैकी एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे.

अमेरिकेच्या नासा या संस्थेत सर्वोच्च पदांवर त्यांनी काम केले. नासाच्या मुख्यालयात खगोलशास्त्र विभागाच्या पहिल्या प्रमुख म्हणून काम करण्याचा मान त्यांच्या वाटय़ाला आला. हबल अवकाश दुर्बीण व कॉस्मिक बॅकग्राऊंड एक्स्प्लोरर या दोन प्रकल्पांत त्यांनी फार मोठी भूमिका पार पाडली होती हे विशेष. शिकागो येथून खगोलशास्त्रात १९४९ मध्ये डॉक्टरेट केलेल्या रोमन यांनी त्यानंतर दहा वर्षांनी म्हणजे १९५९ मध्ये नासात कारकीर्द सुरू केली.  १९७९ मध्ये त्या निवृत्त झाल्या. अमेरिकेसारख्या प्रगत देशातही सुरुवातीला महिलांना वैज्ञानिक क्षेत्रात महत्त्वाचे स्थान नव्हते. ते मिळवून देण्यात त्यांचा अवकाश संशोधन क्षेत्रात का होईना पण मोठा वाटा राहिला. नासाने २०१७ मध्ये ज्या महिलांचा सन्मान केला त्यात त्यांचा समावेश होता. अनेक लोकांनी त्यांना तुम्ही खगोलवैज्ञानिक होऊ शकणार नाही असे सांगितले होते, पण तेच आव्हान समजून त्यांनी या क्षेत्रात अढळपद मिळवले. पाचवीत असताना त्यांनी खगोलशास्त्र छंद मंडळ स्थापन केले होते. बाल्टीमोर येथील शाळेत त्यांचे शिक्षण झाले.  नंतर पेनसिल्वानियातील स्वार्थमोर कॉलेजातून त्यांचे शिक्षण झाले. शिकागो विद्यापीठातून पीएच.डी. केल्यानंतर त्या नौदल संशोधन प्रयोगशाळेत काम करीत होत्या, तेथून त्यांचा प्रवास नासाकडे झाला. तेथे त्यांनी अवकाशात दुर्बिणी पाठवण्याच्या कल्पनेला उत्तेजन दिले. त्यामुळे पृथ्वीवरून निरीक्षण करताना येणारे सगळे अडथळे दूर झाले, पण त्यांच्या या कल्पनेला पारंपरिक वैज्ञानिकांनी विरोध केला होता. रोमन या नासाच्या पहिल्या महिला अधिकारी, पुरुषांची मक्तेदारी असलेल्या या क्षेत्रात पदार्पण करून त्यांनी पुढील महिला वैज्ञानिकांचा मार्ग प्रशस्त केला. त्यांच्या प्रयत्नातून साकार झालेल्या हबल दुर्बिणीने ज्या विलोभनीय प्रतिमा पाठवल्या त्या कलाकारांच्याही कल्पनेपलीकडच्या होत्या. याशिवाय त्यांनी संशोधनाअंती साधारण तारे हे एकसारख्या वयाचे नसतात असे सांगितले होते. लहान मुले ज्या निरागस प्रेमाने ग्रह-ताऱ्यांकडे बघतात त्याच प्रेमाने त्यांनी आपल्याभोवती एक वेगळे विश्व निर्माण केले होते.

Story img Loader