गेल्या मंगळवारी, म्हणजे २ ऑक्टोबर रोजी देशभरात महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम झाले. नागालॅण्डमध्येही बापूंची जयंती साजरी झाली. पण तेथील जनतेत तेव्हा चिंतेचे वातावरण होते. ‘नागालॅण्डचे गांधी’ अशी ओळख असलेले नटवरभाई ठक्कर यांना गुवाहाटीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या प्रकृतीत सतत चढउतार चालू होते. गांधी जयंतीच्या कार्यक्रमास ते उपस्थित राहू शकणार नाहीत, हे तेथील जनतेच्या मनाला पटतच नव्हते.

मूळचे महाराष्ट्राचे रहिवासी असलेले नटवरभाई १९५५ मध्ये नागालॅण्डमध्ये आले. नागा बंडखोरांची चळवळ तेव्हा जोमात होती. अशा परिस्थितीत येथे आलेला हा गांधीवादी माणूस म्हणजे सरकारी हेरच आहे, असे नागा बंडखोरांना वाटत होते. गांधीविचारांचा प्रसार करणे हे नाटक असल्याने त्यांनी ताबडतोब राज्यातून निघून जावे यासाठी त्यांना अनेकदा धमक्याही देण्यात आल्या. पण या धमक्यांना न जुमानता ते आपले काम करीत राहिले. नागालॅण्डच्या जनतेलाही हळूहळू ते आपले वाटू लागले. मग लोकांनीच नटवरभाईंच्या सच्चेपणाबद्दल, त्यांच्या तळमळीबद्दल बंडखोरांना समजावले. नंतर मात्र कुणीही त्यांना त्रास दिला नाही. तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना त्यांच्या कामाची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी या गांधीवादी नेत्याला पाठिंबा दिलाच, पण तेथील विकासकामांसाठी वेळोवेळी केंद्राकडून निधीही पाठवला.  नटवरभाईंनी नंतर चुचुयिमलांग येथे गांधी आश्रम उभारला. गांधीविचारांच्या प्रसाराचे काम सुरू असतानाच लेंटिना आओ या त्यांच्या जीवनात आल्या. त्याही गांधीविचारांनी प्रभावित झालेल्या होत्या. नटवरभाईंशी विवाह केल्यानंतर या दाम्पत्याने गांधी तत्त्वज्ञान आणि शांततेचा संदेश सर्वत्र पोहोचवण्याचे काम नेटाने चालू ठेवले. त्यांची सचोटी पाहून तेथील जनता आणि राज्यकर्तेही त्यांना ‘नागालॅण्डचे गांधी’ संबोधत असत. सामाजिक क्षेत्रात या दाम्पत्याने केलेले लक्षणीय काम ध्यानात घेऊन केंद्राने या दोघांनाही पद्मश्री देऊन गौरवले.

नागा बंडखोरांनी शस्त्रे टाकून सरकारशी चर्चा करावी, असेच ते वारंवार त्यांच्या नेत्यांना सांगत. रुग्णालयात उपचार चालू असतानाच रविवारी ८६ वर्षीय नटवरभाईंनी  या जगाचा निरोप घेतल्याची बातमी आली. त्यांच्या निधनाने एक सच्चा गांधीवादी आपल्यातून निघून गेला आहे.

Story img Loader