‘‘नाटक तर आपणही लिहू शकू, असं प्रत्येकाला वाटतं.. आयुष्यात आपल्यावर कोणकोणते प्रसंग आले, हे कुणीही लिहू शकतं.. पण आयुष्याचा प्रत्येक क्षण समजून घेऊन लिहिलं, तर नाटक लिहून होतं.’’ किंवा ‘‘मला जगणं आवडतं. समस्या माझ्याही आयुष्यात आहेत, पण जगणं हा (समस्यांवरचा) सर्वोत्तम उपाय आहे.’’ अशा साध्यासुध्या, पण प्रभावित करणाऱ्या नाटय़मय वाक्यांचे बादशहा होते नील सायमन! पण साध्या जगण्यावर प्रेम करणाऱ्या आणि प्रभावी शब्दांमधून ते मांडणाऱ्या एखाद्या लेखकास लोकांचे किती प्रेम मिळू शकते, याचे उदाहरण म्हणजे त्यांचे जगणे. त्यांची मृत्युवार्ता भारतीय वेळेनुसार सोमवारी सकाळी आली. ज्यावर सायमन यांनी प्रेम केले, ते जगणे त्यांच्यासाठी संपले.

सायमन हे अट्टल अमेरिकी. मॅनहॅटनमध्ये जन्मले. तिथेच थोडेफार शिकले. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात देशसेवा वगैरेही केली प्रथेप्रमाणे. नंतर नोकरीचा प्रश्न आला. त्यांच्या बंधूंमुळे त्यांना नभोवाणी आणि चित्रवाणीवर संवादलेखनाचे काम मिळाले. तेव्हाच्या त्या लुटुपुटु हशा-टाळ्यांच्या जगात उणेपुरे दशकभर काढल्यावर सायमन खऱ्या परीक्षेला- रंगभूमीला- सामोरे गेले आणि पहिल्याच प्रयत्नात विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झाले. ‘कम ब्लो युअर हॉर्न’ (१९६१) हे त्यांचे पहिले नाटक. याचे ६८० हून अधिक प्रयोग झाले आहेत. त्यानंतर त्यांनी ३० नाटके लिहिली आणि गेल्या ५० वर्षांत सातत्याने सायमन यांच्या नाटकांचे प्रयोग न्यू यॉर्क रंगमंचावर वा चित्रवाणीवर सुरू राहिले. न्यू यॉर्कचा ‘ब्रॉडवे’ हा लहानमोठी ४० नाटय़गृहे असलेला भाग जनप्रिय नाटकांसाठी प्रसिद्ध. तेथील चार नाटय़गृहांत एकाच वेळी सायमन यांच्या नाटकांचे खेळ होताहेत, असेही १९६८-६९ मध्ये घडले. विशेष म्हणजे, बदलत्या काळातही त्यांची लोकप्रियता अबाधित राहिली.

याचे कारण, स्वत:चा प्रेक्षकवर्ग सायमन यांना पक्का माहीत होता. अट्टल अमेरिकी, गौरवर्णीय, कुटुंबवत्सल.. किंवा व्यक्तिकेंद्रीपणामुळे कुटुंबच हरवूनसुद्धा कुटुंबवत्सलपणाचे कढ काढणारे प्रेक्षक. त्यांच्यासाठी लिहिता-लिहिता, सायमन यांना नात्यांचा सूर गवसला. अमेरिकी नाटकांना दिले जाणारे ‘टोनी पुरस्कार’ तीनदा आणि १९७५ साली ‘टोनी कारकीर्द गौरव’, अमेरिकन रायटर्स गिल्डतर्फेही चार वार्षिक बक्षिसांनंतर कारकीर्द गौरव, १९९१ सालच्या ‘लॉस्ट इन याँकर्स’ या नाटकासाठी ‘पुलित्झर पुरस्कार’, ‘द ऑड कपल’सह अनेक नाटकांवर चित्रपट निघून संवाद सायमन यांचेच असल्याने चारदा ‘ऑस्कर’साठी नामांकन.. १९६४ सालीच नाटकाचे चित्रपट हक्क विकून पावणेदोन लाख डॉलरची कमाई.. अशी समृद्धी सायमन यांना लाभली; पण अमेरिकी कुटुंबजीवनातील अस्वस्थेतेचे भाष्यकार म्हणूनच ते ओळखले जातील.

Story img Loader