अलीकडच्या काळात महिला अनेक महत्त्वाची क्षेत्रे पादाक्रांत करीत आहेत. त्यात आता आर्थिक क्षेत्रातही नवे नेतृत्व उदयास येत आहे. न्यू यॉर्क स्टॉक एक्स्चेंजच्या अध्यक्षपदी नुकतीच स्टॅसी कनिंगहॅम यांची झालेली निवड त्याचेच प्रतीक. या स्टॉक एक्स्चेंजच्या २२५ वर्षांच्या इतिहासात प्रथमच एक महिला या सर्वोच्च पदावर विराजमान झाल्याने वॉल स्ट्रीटवर नवे चैतन्य पाहायला मिळेल.
नॅसडॅकव न्यू यॉर्क शेअर बाजार हे दोन्ही आता महिलांच्या हातात आहेत. स्टॅसी या सध्या न्यू यॉर्क स्टॉक एक्स्चेंजच्या मुख्य संचालन अधिकारी होत्या. १९६७ मध्ये या संस्थेत मुरियल सिबर्ट यांच्या रूपाने एका महिलेला पहिल्यांदा स्थान मिळाले होते. त्यानंतर कॅथरिन किनी या २००२ मध्ये सहअध्यक्ष झाल्या. त्या दोघींनाही त्या वेळी त्यांचे जे काही स्थान होते ते मिळवण्यास मोठा संघर्ष करावा लागला, पण सर्व सूत्रे महिलेकडे येण्याची मात्र आताची पहिलीच वेळ. सध्या नॅसडॅकच्या मुख्य कार्यकारी अॅडेना फ्रीडमन या महिलाच आहेत. कनिंगहॅम या लेहाय विद्यापीठातून उद्योग अभियांत्रिकीत बीएस झालेल्या असून नंतर त्यांनी न्यू यॉर्क स्टॉक एक्स्चेंजमध्ये काम सुरू केले. १९९४ च्या उन्हाळ्यात पुरुषांचे वर्चस्व असलेल्या या क्षेत्रात त्यांनी आंतरवासीयता म्हणजे इंटर्नशिप केली. त्याच वेळी त्यांचे शेअर बाजाराशी प्रेम जुळले ते कायमचे. १९९६ मध्ये स्टॅसी या पूर्ण वेळ काम करू लागल्या. त्या वेळी बँक ऑफ अमेरिकाचे रोखे हाताळण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. त्यांनी नॅसडॅक या दुसऱ्या शेअर बाजारातही काम केले आहे. इलेक्ट्रॉनिक व्यापारामुळे नॅसडॅक व न्यू यॉर्क स्टॉक एक्स्चेंज यांचे महत्त्व काहीसे कमी झाले असले तरी स्पॉटिफाय व स्नॅप या लिस्टिंगसाठी दोन्ही शेअर बाजारांत अजूनही स्पर्धा असते. वॉल स्ट्रीटवर महिलांचे अस्तित्व वाढले पाहिजे अशी मागणी असतानाच त्यांची झालेली नेमणूक सयुक्तिक ठरली आहे. महिलांचा आर्थिक क्षेत्रातील प्रवेश आणखी खुला व्हावा यासाठी स्टॉक एक्स्चेंजच्या समोर फीअरलेस गर्लचे शिल्प बसवण्याचेही नुकतेच मान्य करण्यात आले आहे. स्टॅसी या नव्या दमाने न्यू यॉर्क शेअर बाजाराची धुरा सांभाळणार आहेत. शेअर बाजारातील कामकाजात रोजचे ताणतणाव असतातच. त्यात वेळप्रसंगी सहकाऱ्यांवर रागावण्याचे प्रसंग आले तरी दिवसाच्या शेवटी त्यांच्या समवेत बसून एकत्र बसून बिअर घ्यावी म्हणजे सगळा ताण तर पळून जाईल, शिवाय बरोबरीचे नातेही निर्माण होईल असे त्या म्हणतात, यावरून तरी त्या सर्वाना बरोबर घेऊन काम करणार हे दिसते आहे, यातूनच खरी स्त्री-पुरुष समानता निर्माण होईल यात शंका नाही.