विधिमंडळाच्या परिसरात निदर्शने, निषेधाची आंदोलने करणे संकेताला धरून नाही. तरीही, १९९२ नंतर याच विधिमंडळातील एक व्यक्ती आपल्या दंडावर कायमस्वरूपी काळी फीत चिकटवून कामगाराच्या, मजुरांच्या आणि गरिबांच्या समस्या सोडविण्याकरिता विधानसभेत आवाज उठवत राहिली. निहाल अहमद मौलवी मोहमद उस्मान असे त्या व्यक्तीचे नाव असले, तरी महाराष्ट्राला मात्र, ते निहालभाई म्हणूनच परिचित होते.
मौलवीच्या घरात जन्मलेले, सदासर्वकाळ कुराणाचे पठण करणाऱ्या कुटुंबात वाढलेले निहाल अहमद मात्र, धर्माच्या चौकटीबाहेर पडले. मधु दंडवते, मधु लिमये आदी समाजवादी नेत्यांच्या बरोबरीने समाजवादी चळवळीचा खंदा आधारस्तंभ बनले. अयोध्येतील बाबरी मशीद आंदोलनानंतर त्याचा निषेध म्हणून निहालभाईंनी आपल्या दंडावर बांधलेली काळी फीत नंतर कधीच दूर केली नाही. उलट, त्यानंतर प्रत्येक अंगरख्याच्या उजव्या बाहीवर कायमस्वरूपी काळी पट्टी शिवून घेतली. मालेगावसारख्या अल्पसंख्यबहुल मतदारसंघात १९६७ ते १९९९ पर्यंतच्या १९७२चा अपवाद वगळता प्रत्येक निवडणुकीवर आपली छाप ठेवणाऱ्या निहालभाईंनी राजकीय कारकीर्दीची सुरुवात नगरसेवकपदापासून केली. महाराष्ट्रात शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील पहिल्या आघाडी सरकारच्या प्रयोगात कामगार व रोहयोमंत्री असलेल्या निहाल अहमद यांची विधानसभेतील खुसखुशीत भाषणे म्हणजे सभागृहाचा एक ‘अभ्यासवर्ग’ असायचा. समाजाची मानसिकता ओळखून त्यानुसार निर्णय घेण्याची, प्रसंगी धार्मिक भावनांची गणिते ओळखून कुणाला दुखावणारी व कुणाला सुखावणारी राजकीय कृती करतानाही बेरजेचीच उत्तरे जुळविण्याच्या असामान्य हातोटीमुळे, मालेगावसारख्या मुस्लीमबहुल मतदारसंघात मुस्लिमेतर मतदारांनीही निहालभाईंच्या पारडय़ात मतांचे दान सातत्याने ओतले. मालेगाव महापालिका झाल्यानंतर ते साहजिकच पहिले महापौर झाले. प्रजा समाजवादी पार्टी, जनता पार्टी आणि जनता दल अशा प्रवासात त्यांनी जनता दलाचे प्रदेशाध्यक्षपदही भूषविले. पक्षाचा प्रभाव क्षीण झाला तरी विरोधी बाकांवरील निहाल अहमद यांच्या आवाजाची धार कायम होती. गेल्या काही वर्षांत राजकारणाचा बाज बदलला. निवडणुकीचे रंगही बदलले. गाडय़ा, विमाने, हेलिकॉप्टरच्या धुरळ्याने मतदारसंघ न्हाऊ लागले. निहालभाई मात्र, त्या माहोलापासून अलिप्त राहिले. सायकल फेरी आणि पदयात्रांद्वारे मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयोग नेहमीच यशस्वी ठरला. त्यांची अर्धशतकी राजकीय कारकीर्द हा त्याचाच पुरावा. अतिसंवेदनशीलतेमुळे सतत धगधगते असलेले मालेगाव एका इशाऱ्यानिशी शांत करण्याची ताकद त्यांच्या उंचावलेल्या बोटात होती. निषेधाची ती काळी फीत काळासोबत विधिमंडळातून विस्मृतीत गेली, तरी मालेगावच्या आणखी काही पिढय़ा मात्र निहालभाईंची आठवण जपतच राहतील..
निहाल अहमद
विधिमंडळाच्या परिसरात निदर्शने, निषेधाची आंदोलने करणे संकेताला धरून नाही.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 02-03-2016 at 03:31 IST
मराठीतील सर्व व्यक्तिवेध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nihal ahmad