मध्यमवर्गीय कुटुंबातील तिच्या आईवडिलांनी त्या काळातही मुलांच्या हिताचा विचार म्हणून चांगल्या भवितव्यासाठी स्थलांतर करून अमेरिका गाठली. बहीण-भाऊ व आई-वडील असे हे चौकोनी कुटुंब एक स्वप्न घेऊन आले, पण ते नुसते स्वप्नांच्या दुनियेत वावरणारे नव्हते, तर त्यासाठी कष्टाची त्यांची तयारी होती. मूल्यांचे संस्कार तर आधीपासूनच होते. आज ही मुलगी अमेरिकी काँग्रेसच्या प्रतिनिधिगृहात केंटुकी मतदारसंघातून डेमोक्रॅटिक पक्षाकडून निवडून आली आहे. ती मराठी आहे हे विशेष! नाव निरुपमा ऊर्फ निमा कुलकर्णी.
अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकीत भारतीय वंशाचे जे उमेदवार होते त्यांचा एक गट म्हणजे ‘समोसा कॉकस’. त्यांना खरे तर मोठे यश मिळवता आले नाही, पण तरी पाच-सहा जणांनी बाजी मारली, त्यात निमाही होती. तिचा व्यवसाय वकिलीचा, त्यामुळे समाजातील सर्व प्रश्नांची तिला चांगली जाण आहे. ‘इंडस लॉ फर्म’ ती चालवते. त्यामार्फत तिने स्थलांतर, रोजगार व व्यवसाय या क्षेत्रांत केंटुकीतील लुईसव्हिले येथे वकिलीचे काम सुरू ठेवले आहे. त्यांचे कुटुंब मूळ नागपूरचे. वयाच्या अडतिसाव्या वर्षी केंटुकीतील निवडून आलेली ती भारतीय वंशाची पहिलीच प्रतिनिधी आहे. प्रायमरीत तिने डेमोक्रॅटिक पक्षाचे अनुभवी उमेदवार डेनिस हॉलंडर यांना पराभूत करून डेमोक्रॅटिक पक्षाची उमेदवारी मिळवली होती. राजकारणात नवखी असलेली ही मुलगी काय निवडणूक जिंकणार, असेच सर्वाना वाटत होते, पण तिने हे आव्हान स्वीकारले व लढत जिंकली. स्थलांतरितांची कैवारी, बंदूक संस्कृतीची विरोधक, हाडाची कार्यकर्ती, अशी तिची ओळखच तिला हे यश देऊन गेली.
अध्यक्ष ट्रम्प यांनी स्थलांतरितांविरोधात जे आदेश काढले त्या अवघड परिस्थितीत तिने अनेकांसाठी कायदेशीर बाजू मांडली. प्रायमरीतील विरोधक हॉलंडर हे आत्मसंतुष्ट बनले होते, तर त्यांना पर्याय नाही असे लोकांना वाटत होते; पण तो पर्याय निमाच्या रूपात पुढे आला व लोकांच्या कुठल्याच प्रश्नात स्वारस्य नसलेल्या हॉलंडर यांना त्यांनी दूर केले. लोकांनीही तिला निधी दिला. विशेष म्हणजे भारतीय अमेरिकी समुदाय आपल्या चौकटीतून बाहेर आला व त्यांनी निमाला सक्रिय पाठिंबा दिला. त्यामुळेच त्यांनी अंतिम फेरीत रिपब्लिकन पक्षाच्या जोशुआ न्यूबर्ट यांचा पराभव केला. केंटुकीतही तीच परिस्थिती आहे, पण या लोकांना राजकारणात काही आवाज असला पाहिजे असे निमा यांना वाटत होते. निमाचे वडील जमशेदपूरला टाटा स्टीलमध्ये काम करीत होते. खरे तर या कुटुंबाचे जीवन भारतातही सुखासमाधानात होते, पण मुलांच्या भवितव्यासाठी ते अमेरिकेत आले. त्या वेळी नोकरी मिळत नव्हती म्हणून तिच्या वडिलांनी पैसे उसने घेऊन जर्मन टाऊन येथे किराणामालाचे दुकान टाकले. ते संघर्षांचे जीवन अजूनही निमा यांच्या लक्षात आहे. त्यांनी वडिलांच्या किराणा दुकानातही काम केले. क्लार्क लॉ स्कूलमधून कायद्याची पदवी घेतली. अनेक संस्थांवर त्यांनी काम केले असून बिडेड ट्रेजर्स प्रोजेक्ट या शरणार्थी व वंचित महिलांच्या प्रकल्पात त्या कार्यरत आहेत. सार्वजनिक शिक्षण मुलांना मिळालेच पाहिजे, असा त्यांचा आग्रह आहे. त्याशिवाय स्थलांतरितांचे प्रश्न व इतर मुद्दय़ांवर त्या आता अमेरिकी काँग्रेसच्या प्रतिनिधिगृहात डेमोक्रॅटिक पक्षाबरोबरच जनसामान्यांचा आवाज बुलंद करणार आहेत.