टाटा हे भारतातील आद्य उद्योग घराणेच नव्हे तर एक मूल्यपरंपरा आहे असे अनेकांगाने म्हणता येईल. वारसा अथवा परंपरेची निर्मिती करणाऱ्या अनेक व्यक्तींचा वावर दीडशेहून अधिक वर्षांचा इतिहासात असलेल्या या उद्योग घराण्यात राहिला आहे. दोन दिवसांपूर्वी टाटा समूहातील सर्व जबाबदाऱ्यांतून मोकळे होऊन पायउतार झालेले नोशिर सुनावाला हे अशाच मूल्यव्यवस्थेचे एक प्रतिनिधी किंबहुना पाईक ठरावेत. या उद्योग घराण्याशी संलग्न सर रतन टाटा ट्रस्ट आणि सर दोराबजी टाटा ट्रस्ट या दोन मोठय़ा ना नफा तत्त्वावरील सेवाभावी संस्थांच्या विश्वस्तपदाचा त्यांनी वाढते वय आणि तब्येतीचे कारण देऊन राजीनामा दिला. टाटा परंपरेतील आणखी एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व आदी बिलिमोरिया यांनी आयसीआयसीआय लि. (आजच्या आयसीआयसीआय बँकेची पूर्वज) मधून सुनावाला यांना हेरून त्यांना टाटा समूहात आणले आणि त्यांच्याकडे वित्तीय जबाबदारी सोपविली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

टाटा समूहात गेली पाच दशके विविध पदे सांभाळलेले सुनावाला हे रतन टाटा यांचे समकालीन आणि सर्वात जवळचे सहयोगी आहेत. ८३ वर्षीय सुनावाला हेही रतन टाटा यांच्याप्रमाणेच अविवाहित. टाटांच्या व्यवस्थेवर जबरदस्त प्रभाव राखलेले आणि विशेषत: रतन टाटा यांच्या नेतृत्व आणि कार्यशैलीवर आस्तिक विश्वास असलेल्या मंडळींत सुनावाला यांचे नाव सर्वप्रथम येईल. टाटा उद्योग समूहाची ६६ टक्के भांडवली मालकी असलेल्या विश्वस्त संस्थेवर रतन टाटा अध्यक्ष तर सुनावाला उपाध्यक्षपदी होते. टाटा समूहातील १००हून अधिक कंपन्यांची धुरा सांभाळणाऱ्या टाटा सन्सच्या संचालक मंडळातही ते होते. परंतु कमाल ७५ वर्षे वयापर्यंतच हा पदभार सांभाळण्याचा रतन टाटा यांचा दंडक असल्याने (जो खुद्द त्यांनीही पाळला!) सुनावाला तेथून २०१० मध्ये पायउतार झाले. केवळ रतन टाटा यांच्यासहच नव्हे तर त्यांचे सावत्र बंधू नोएल यांच्या बरोबरीनेही काम केल्याचा अनुभव असलेल्या काही मोजक्या मंडळींमध्ये सुनावाला मोडतात. टाटा समूहाचे किरकोळ विक्री क्षेत्रात बस्तान बसविणाऱ्या ट्रेंट लिमिटेडला आकार देण्यात व तिला फुलविण्यात नोएल यांच्या नेतृत्वक्षमतेचा सुनावाला यांनी त्या कंपनीच्या संचालक मंडळावर २७ वर्षे राहून जवळून अनुभव घेतला आहे. दोन बंधूंमध्ये वितुष्ट नसले तरी त्यांचे नाते दिसावे इतकी सलगीही नव्हती. सुनावाला यांच्या प्रयत्नानेच त्यांच्यातील अंतर कमी केले गेले आणि परिणामी नोएल यांची फेब्रुवारीत टाटा ट्रस्टवर विश्वस्त म्हणून नेमणूक झाल्याचे म्हटले जाते.

टाटा समूहांतर्गत उत्तराधिकार आणि खांदेपालटाचे आडाखे सुरू असताना, जुन्या पिढीचे प्रतिनिधी सुनावाला यांचे निर्गमन अपरिहार्यच असले तरी चटका लावून जाणारे निश्चितच.

मराठीतील सर्व व्यक्तिवेध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Noshir soonawala most powerful man in tata group after ratan tata