‘आमच्या कुटुंबात मीच सर्वात गरीब आहे,’ असे ते गमतीने म्हणायचे; पण मनाने ते खूप श्रीमंत होते. राजकारण्यांपासून उद्योगपतींपर्यंत अनेकांच्या हृदयावर शस्त्रक्रिया करणारे ख्यातनाम हृदयरोगतज्ज्ञ बी. के. गोयल हे गरीब रुग्णांवरही कमी खर्चात उपचार करीत असत. दिलदार हृदयाचे डॉक्टर बी. के. गोयल यांना अखेर हृदयविकारानेच गाठले हा दुर्दैवी योगायोग. तरुणांनाही लाजवेल अशी त्यांची कार्यमग्नता होती. त्यामुळे त्यांच्या अचानक जाण्याने सर्वाना धक्का बसणे साहजिकच होते. त्यांना पद्मश्री (१९८४), पद्मभूषण (१९९०), पद्मविभूषण (२००५) हे नागरी सन्मान मिळाले होते.
जयपूरला जन्मलेले गोयल हे बॉम्बे हॉस्पिटलमध्ये अधिष्ठाता होते व सर जे.जे. हॉस्पिटल, ग्रँट मेडिकल कॉलेज, हाफकिन इन्स्टिटय़ूट या संस्थांशी ते दीर्घकाळ जोडले गेले. त्यांचे ‘हार्ट टॉक’ हे पुस्तक अनेक भाषांत प्रसारित झाले. बो-टाय हे त्यांचे खास वैशिष्टय़ होते. कुणी तरी त्यांना विनोदाने म्हटलेही होते, की तुम्ही झोपतानाही बो-टाय घालता का.. अंत्यसमयीही त्यांच्यासोबत गुलाबी बो-टाय होताच. त्यांची स्मरणशक्ती तल्लख, लोकसंग्रह मोठा, त्यामुळे मानसन्मानांपेक्षाही जनमानसातील त्यांचे स्थान मोठे होते. एकदा श्रीमंत रुग्ण हाताला लागले की, गरीब रुग्णाकडे लक्ष न देणारे डॉक्टर बरेच असतात, पण गोयल यांचे तसे नव्हते. रुग्णांचा त्यांच्या निदानावर खूप विश्वास होता, त्यामुळे त्यांनी निदान केल्यानंतर रुग्णांसाठी तो अंतिम शब्द असे. वयाच्या ३९व्या वर्षी ते मुंबईचे नगरपाल होते. जे.जे. रुग्णालयासह अनेक रुग्णालयांत हृदयरोगतज्ज्ञ म्हणून त्यांनी काम केले. २०१७ मध्ये त्यांनी गरजू रुग्णांसाठी ट्रस्ट स्थापन केला होता. ५४ वर्षे त्यांनी वैद्यकीय व्यवसायात नाव कमावले. टेक्सास हार्ट इन्स्टिटय़ूट व न्यू ऑर्लिन्स येथील ओशनर हार्ट इन्स्टिटय़ूट या संस्थांमध्ये ते सल्लागार शल्यविशारद होते. १९९० मध्ये तेव्हाचे राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा यांना दिल्लीतील रुग्णालयात दाखल केले होते तेव्हा त्यांच्यावर उपचारासाठी गोयल यांना पाचारण करण्यात आले होते. राजस्थानातील एका खेडय़ात एक व्यक्ती हृदयविकाराने मरताना पाहिली तेव्हाच गोयल यांनी डॉक्टरकी करायचे ठरवले होते. खान अब्दुल गफार खान म्हणजे सरहद्द गांधी यांच्यावरील शस्त्रक्रियेमुळे गोयल यांचे नाव सर्वतोमुखी झाले. गोयल हे इतर डॉक्टरांसारखे नव्हते. डॉक्टर लोक नेहमी वैद्यकीय अहवाल बघून निदान करतात, त्यांचे निदान हे रुग्णाकडे बघूनही होत असे. त्यामुळे त्यांच्याकडे गेल्यानंतरच रुग्ण निम्मे बरे होऊन जात. त्यांच्या निधनाने आता अशा अनेक रुग्णांचा आधारवड कोसळला आहे.