‘टूट जाते हैं कभी मेरे किनारे मुझमें
डूब जाता हैं कभी मुझमें समंदर मेरा’
‘मी जेव्हा कविता लिहिते तेव्हा माझ्या मनाची नेमकी हीच भावना असते,’ ही प्रांजळ कबुली आहे कवयित्री पद्मा सचदेव यांची. ही ताकद फक्त कवितेत आहे अशीच त्यांची पक्की धारणा. कवितेविषयी इतकेच सांगून त्या थांबत नाहीत. त्या म्हणतात, ‘कविता आतून आपोआप येते, पण गद्य लेखनाला थोडा ‘प्रयास’ करावा लागतो.. कवितेत जेवढे तुम्ही आत शिराल तेवढे मौलिक रत्न- अर्थात कविता बाहेर येईल..’ पद्मा सचदेव.. डोगरी भाषेतल्या आधुनिक कवयित्री व लेखिका बुधवारी (४ ऑगस्ट) निवर्तल्या. त्यांचा जन्म १७ एप्रिल १९४०चा- जम्मूमधील पुरमण्डल या ऐतिहासिक गावातला. या छोटय़ाशा गावातला अद्भुत निसर्ग आणि डोगरी भाषेतील लोकगीतं त्यांच्यात काव्याचे अंकुर पेरण्यात पोषक ठरले. लहानपणी डोगरी भाषेतील लोकगीते ऐकून त्यांना कुतूहल वाटे. त्या कुतूहलापोटीच त्यांना प्रश्न पडत की, कोणी लिहिली असतील बरं ही अद्भुत गाणी? ती लिहिणारा कुठल्या आकाशी राहात असेल बरं? या विलक्षण लोकगीतांनी त्यांना इतकी भुरळ पाडली की दहाव्या-बाराव्या वर्षीच शब्दाशब्दांची गुंफण करण्याचा नाद त्यांना लागला आणि त्या शब्दगुंफणीत त्या पार गुंतून गेल्या. त्यांची कविता स्वच्छंदी.. तरल; अगदी बाईंच्या व्यक्तिमत्वासारखीच! डोगरी भाषा आणि कविता यांवर त्यांचे निस्सीम प्रेम. डोगरी ही जगातली सर्वात ‘मीठी’ भाषा.. आणि हे सांगताना त्यांच्या चेहऱ्यावरचे भावही पाहण्यासारखे असत. आपल्या मातृभाषेवर कसं ओतप्रोत प्रेम असावे याचा उत्तम दाखलाच! डोगरी भाषेवरचे हेच प्रेम व्यक्त करताना त्या म्हणतात-
दिन निकेलया जां समाधि जोगिऐ ने खोली ऐ
संझ घिरदी आई जां लंघी, गैई कोई डोली ऐ
कोल कोई कूकी ऐ जांकर त्र्याणा हस्सेया
बोल्दा लंघी गेया कोई डोगरे दी बोलीऐ
अगदी उतारवयातही आपल्या खडय़ा आवाजात ही कविता सादर करताना ते प्रेम जाणवत असे. तसेच कवितेविषयीही होते. कवितेविषयीची त्यांची आत्मीयता त्यांच्या बोलण्यातून जाणवत असे. एक कविता सुचली की उद्या दुसरी कविता सुचेल का? ही अस्वस्थता त्यांच्या ठायी असे.
डोगरी भाषेसह हिंदीतही त्यांनी लेखन केले. अर्थात याचं श्रेय त्या ज्येष्ठ साहित्यिक डॉ. धर्मवीर भारती यांना देत. त्यांच्याच सांगण्यावरूनच आपण हिंदीत लेखन केलं, हे त्या प्रांजळपणे सांगत.
पद्मा सचदेव यांचे कवितासंग्रह आणि कथा प्रसिद्ध झाल्या, त्यात ‘डोगरी कविताएँ’, ‘तवी ते झँना’, ‘न्हेरियाँ गलियाँ’, ‘पोटा पोटा निंबल’, ‘उत्तरवाहिनी’, ‘मेरी कविता मेरे गीत’, ‘सबद मिलावा’, ‘साक्षात्कार दीवानखाना’ या पुस्तकांचा समावेश आहे.
पद्मा सचदेव यांना ‘पद्मश्री’ (२००१), साहित्य अकादमी पुरस्कार, मध्य प्रदेश सरकारचा कबीर सन्मान, सरस्वती सन्मान, जम्मू-कश्मीर अकादमीतर्फेदिला जाणारा जीवनगौरव पुरस्कार असे अनेक मानसन्मान मिळाले. त्यांनी बालकविताही लिहिल्या. त्यांच्या कवितेत निसर्गसंपन्नता प्रामुख्याने जाणवते. जम्मूतील निसर्गसौंदर्य, तिथली माणसे, संस्कृती, माणसांमधील परस्पर सामंजस्य, धार्मिक सलोखा त्यांच्या कवितेतून ठळकपणे प्रतीत होतो.
त्यांच्या कवितेतील-
दरगाह खुली, खुले हैं मंदिर
हृदय खुले हैं बाहर भीतर
– ही भावना देशात फुलू देणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.