अद्याप त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा झालेली नाही, जर्मन कायदेमंडळाच्या मंजुरीशिवाय ती होणारही नाही. परंतु जग आतापासूनच, ओलाफ शोल्झ यांच्याकडे ‘जर्मनीचे नवे चॅन्सेलर’ म्हणून पाहू लागले आहे!
शोल्झ हे जर्मनीतील ‘सोशल डेमोक्रॅटिक पार्टी’ किंवा जर्मन नावातील आद्याक्षरांनुसार ‘एसपीडी’चे नेते. या पक्षाने २०१८ पासून अँगेला मर्केल यांच्या ‘ख्रिश्चन डेमोक्रॅटिक युनियन’ या पक्षाशी युती केल्यानंतर, मर्केल यांचे अर्थमंत्री तसेच उप चॅन्सेलर अशा महत्त्वाच्या पदांवर शोल्झ यांनी काम केलेले आहे. चॅन्सेलरपदी त्यांची निवड ठरली, ती मात्र मर्केल यांच्या पक्षाला वगळून. पर्यावरणवादी ग्रीन पार्टी आणि उदारमतवादी ‘फ्री डेमोक्रॅट पार्टी’ (एफडीपी) अशा अन्य दोन पक्षांशी आघाडी करून शोल्झ यांचे सरकार येणार आहे. त्यासाठी तिघा पक्षांत सुरू असलेल्या वाटाघाटी बुधवारी (२४ नोव्हेंबर) सुफळ संपूर्ण झाल्या. त्यानंतर तिघाही पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी, शोल्झ यांच्या नावाची घोषणा केली आणि अवघ्या आठवडय़ाभरात जर्मनीला नवे चॅन्सेलर लाभलेले असतील, असा आशावादही व्यक्त केला.
ओलाफ शोल्झ हे पेशाने वकील, पण वयाच्या सतराव्या वर्षांपासून राजकारणात- तेही समाजवादी विचारांच्या ‘एसपीडी’ याच पक्षात ते राहिले. विद्यार्थी नेता म्हणून त्यांनी राजकारणात प्रवेश केला तेव्हापासून त्यांच्या वक्तृत्वगुणांकडे लक्ष वेधले गेले होते. पक्षानेही त्यांना प्रोत्साहन दिले. १९८९ साली, वयाची तिशी ओलांडल्यामुळे ‘एसपीडी’ च्या ‘यंग सोशालिस्ट’ या युवा आघाडीचे काम त्यांना सोडावे लागले. यानंतरची सुमारे नऊ वर्षे वकिली व संसार सांभाळून, त्यांनी राजकीय कामही सुरू ठेवले होते. प्रामुख्याने कामगार न्यायालयात ते वकिली करत. १९९८ मध्ये जर्मनीच्या लोकप्रतिनिधीगृहाचे (बुंदेश्टाग) सदस्य म्हणून त्यांची निवड झाली. तो कार्यकाळ २००१ मध्ये संपल्यावर हॅम्बुर्गचे सिनेटर म्हणून त्यांची निवड झाली. हे सिनेट म्हणजे राज्य कायदेमंडळ, पण त्याचे प्रशासकीय अधिकार ‘मेयर’कडे असतात. २००२ ते २०११ असा सलग काळ पुन्हा केंद्रीय लोकप्रतिनिधी (बुंदेश्टाग सदस्य) असताना, २००९ मध्ये त्यांना कामगार व समाज कल्याण खात्याचे मंत्रीपदही मिळाले होते. युरोपातील महत्त्वाच्या देशाचे प्रमुख झाल्यावर, शोल्झ यांच्यापुढे निराळे प्रश्न, नवी आव्हाने असतील. जर्मनीत करोनाबाधित पुन्हा वाढताहेत, तसेच युरोपीय संघातील धुसफूस जर्मनीलाच सांभाळावी लागते असा आजवरचा अनुभव आहे. इराण, चीन आदी मुद्दय़ांवर शोल्झ यांना भूमिका घ्यावी लागेल आणि त्यांचा प्रभाव भारत-जर्मनी संबंधांवरही निश्चितच पडेल.