२०१४ मध्ये रशियाने क्रिमियात आक्रमण करून त्या द्वीपकल्पाचा ताबा घेतला, त्या वेळी तेथे जे राजकीय कैदी पकडले गेले त्यात तो होता. त्याच्यावर आरोप होता पूल, विजेचे खांब व लेनिनचा पुतळा उडवण्याचा कट रचल्याचा. सायबेरियात या कैद्याची रवानगी झाली. वीस वर्षे तो तिथेच खितपत पडला आहे. त्याची ही कहाणी युरोपीय संसदेचा प्रतिष्ठेचा ‘साखारोव्ह पुरस्कार’ मिळाला नसता तर कदाचित जगासमोर आली नसती, त्याचे नाव आहे ओलेग जी. सेन्त्सोव्ह.
तो मूळचा क्रिमियाचा. तो चांगला चित्रपट दिग्दर्शक आहे. ‘अ परफेक्ट डे फॉर बनानाफिश’, ‘द हॉर्न ऑफ द बुल’ हे लघुपट केल्यानंतर त्याने ‘गेमर’ हा चित्रपटही साकारला. त्यानंतर ‘ऱ्हायनो’ या चित्रपटासाठी त्याला लोकांनीच निधी दिला. नंतर युरोमेडन व ऑटोमेडन या चळवळीतील सहभागामुळे त्याने चित्रपट क्षेत्राकडे दुर्लक्ष केले व नंतर क्रिमियाच्या न्यायासाठीच्या लढय़ात तो सामील झाला. त्याच्या संवेदनशील मनाला रशियाने क्रिमियाचा जो लचका तोडला ते भावणारे नव्हते. त्याने त्याविरोधात उपोषण केले. पण त्याला वैद्यकीय मदतीने १४५ दिवसांच्या उपोषणातही जिवंत ठेवण्यात आले. ज्यांच्या नावाने हा पुरस्कार दिला जातो ते आंद्रे साखारोव्ह हे रशियन भौतिकशास्त्रज्ञ व शांततेचे नोबेल विजेते होते. हा पुरस्कार मानवी हक्क व विचार स्वातंत्र्यासाठी दिला जातो. रशियातीलच नव्हे तर जगातील राजकीय कैद्यांची व्यथा त्याच्या या पुरस्काराने मांडली गेली आहे. रशियाने निर्लज्जपणे क्रिमियावरील आक्र मणाचे समर्थन केले होते. काही वेळा राजकीय कैद्यांची अदलाबदलीत सुटका केली जाते. सेन्त्सोव्ह याच्या समर्थकांनी रशियाच्या वृत्त संस्थेच्या पत्रकाराच्या बदल्यात त्याच्या सुटके ची मागणी केली, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. यात लेफ्टनंट नादिया व्ही सावचेन्को यांची सुटका रशियाच्या दोन गुप्तचर लष्करी अधिकाऱ्यांच्या बदल्यात करण्यात आली तरीही अजून ७० युक्रेनियन कैदी रशियाच्या ताब्यात आहेत. सोव्हिएत रशियाच्या बाबतीत साखारोव्ह यांनी जी भूमिका पार पाडली ती आताच्या रशियाबाबत सेन्त्सोव्ह पार पाडत आहे असे म्हटले जाते. रशियाच्या अफगाणिस्तानातील आक्रमणास सेन्त्सोव्हने विरोध केला. त्यामुळे त्यांना सहा वर्षे अंतर्गत विजनवास पत्करावा लागला. सेन्त्सोव्ह यांना मिळालेल्या पुरस्काराने त्यांच्या सुटकेसाठी रशियाचे नेते पुतिन यांना पाझर फुटण्याची शक्यता नाही. याआधी हा पुरस्कार नेल्सन मंडेला, अलेक्झांडर डुबसेक, आँग सान स्यू की व मलाला युसुफझाई यांना मिळाला आहे.