‘मेजर ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार’ विजेते सय्यद शाहीद (ऊर्फ एस. एस.) हकीम फुटबॉल जगतात ‘हकीमसाब’ म्हणून ओळखले जायचे. माजी फुटबॉल प्रशिक्षक एस. ए. रहीम यांचे ते पुत्र. परंतु वडिलोपार्जित पुण्याईवर ते मर्यादित राहिले नाहीत. पाच दशकांहून अधिक काळ फुटबॉलपटू, प्रशिक्षक आणि ‘फिफा’ सामनाधिकारी अशा भूमिका त्यांनी पार पाडल्या. त्यांचा मृत्यू फुटबॉल जगतासाठी पोकळी निर्माण करणारा आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

१९५० ते ६०च्या मध्यापर्यंत भारत दोन-अध्र्य पद्धतीचा (टू-हाफ सिस्टीम) अवलंब करायचा. मध्यवर्ती मध्यरक्षक या स्थानावर हकीम खेळायचे. परंतु राम बहादूर, मरियप्पा केमपय्या, प्रशांता सिन्हा आणि फ्रॅन्को हे समकालीन या स्थानावर अधिक चोख भूमिका बजावायचे. त्यामुळे हकीम यांना योग्य महत्त्व दिले गेले नाही. १९६०च्या रोम ऑलिम्पिकमध्ये हकीम भारतीय संघात होते. परंतु वडील संघाचे प्रशिक्षक असूनही त्यांना एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही. पेरूविरुद्धच्या अखेरच्या सामन्यात तरी हकीम यांना खेळवावे, अशी चुनी गोस्वामी यांची विनंती फेटाळली गेली. १९६२च्या आशियाई क्रीडा स्पध्रेतील सुवर्णपदक विजेत्या भारतीय संघातही त्यांचा समावेश नव्हता. भारतीय हवाईदलात ‘स्कॉड्रन लीडर’ असलेल्या हकीम यांनी १९६० ते १९६६ पर्यंत संतोष करंडक राष्ट्रीय स्पध्रेत सेनादलाचे प्रतिनिधित्व केले. क्लबस्तरावर हैदराबादच्या ‘सिटी कॉलेज ओल्ड बॉइज क्लब’कडून ते खेळले. २५ वर्षांहून अधिक काळ फुटबॉल खेळल्यानंतर त्यांनी मार्गदर्शनाकडे आणि सामनाधिकाऱ्याकडे मोर्चा वळवला. दिल्लीत १९८२ मध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पध्रेसाठी पी. के. बॅनर्जी भारताचे प्रशिक्षक होते, तर हकीम साहाय्यक प्रशिक्षक होते. त्यानंतर काही स्पर्धासाठी त्यांनी मुख्य प्रशिक्षकसुद्धा सांभाळले होते. १९८८च्या ‘एएफसी’ आशियाई चषक स्पध्रेत ते सामनाधिकारी होते. १९९८ मध्ये हकीम यांच्या मार्गदर्शनाखाली महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्राने डय़ुरँड चषक जिंकला. साळगावकर आणि हिंदुस्तान एफसी संघालाही त्यांनी मार्गदर्शन केले. २००४-०५ मध्ये ते बंगाल या व्यावसायिक संघाचे प्रशिक्षक होते.२०१७ मध्ये भारतात झालेल्या कुमार ‘फिफा’ विश्वचषक फुटबॉल स्पध्रेसाठी त्यांनी प्रकल्प अधिकारी म्हणून काम पाहिले. फुटबॉलविश्वातील हेच त्यांचे अखेरचे कार्य होते. ‘‘हकीमसाब हे भारतामधील फुटबॉलच्या सुवर्णयुगाचे साक्षीदार होते. त्यांचे योगदान कधीच विसरता येणार नाही,’’ ही अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष प्रफुल पटेल यांची प्रतिक्रियाच त्यांच्या मोठेपणाची महती पटवणारी आहे.

मराठीतील सर्व व्यक्तिवेध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Olympian footballer fifa international referee syed shahid hakim profile zws