अमेरिकेने दुसऱ्या महायुद्धात जपानच्या नागासाकी शहरावर केलेला अणुबॉम्ब हल्ला ओसामु शिमोमुरा यांनी अगदी तरुण वयात अनुभवला होता. काही तरुण त्या न कळत्या वयात काय घडते आहे हे पाहण्यासाठी एका बंकरच्या ठिकाणी व नंतर डोंगरावर गेले, त्यात ओसामु शिमोमुरा यांच्यासह काही जणांची दृष्टी अधू झाली. नंतर हेच शिमोमुरा रसायनशास्त्रज्ञ बनले. अमेरिकेतसुद्धा शिकले व नंतर देशऋ ण म्हणून पुन्हा नागासाकीत परतले, त्यांना २००८ मध्ये रसायनशास्त्राचे नोबेल विभागून मिळाले होते. शिमोमुरा यांचे सुरुवातीचे जीवन जपान व्याप्त चीनमध्ये गेले. नंतर ते पुन्हा जपानला आले, त्या वेळी आजीने त्यांचा सांभाळ केला. त्यांना इयत्ता दहावीत असताना शस्त्रागारात नेण्यात आले. अमेरिकी विमाने ओळीने येऊन बॉम्बफेक करीत होती. बॉम्ब पडत होते व पांढऱ्या ज्वाळा तेजाळत होत्या. ‘एकाच्या अंगावर बॉम्ब पडला, त्यात त्याचा हात तुटला तो तसाच पळत सुटला,’ असे वर्णन शिमोमुरा करत. १९४५ मध्ये नागासाकीत अणुबॉम्ब पडला, तेव्हाही ते शस्त्रागारातच काम करीत होते. अण्वस्त्र हल्ल्यानंतर झालेली आम्लवर्षांही त्यांनी अनुभवली होती. नंतर नागासाकी कॉलेज ऑफ फार्मसीतून शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी नागोया विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण घेतले. नागासाकी विद्यापीठात त्यांनी रसायनशास्त्राचे अध्यापनही केले. १९६०-८२ या काळात त्यांनी प्रिन्स्टन विद्यापीठात संशोधन करताना त्यांच्या पत्नी अकेमी शिमोमुरा यांच्यासमवेत ग्रीन फ्लुरोसंट प्रोटिन (जीएफपी) म्हणजे हरित प्रदीप्त प्रथिन दहा हजार जेलीफिशपासून वेगळे काढले होते, या शोधामुळे पेशींचा देहव्यापार उलगडणे अधिक सोपे झाले. सूक्ष्मजीवशास्त्राचा तो सुवर्णकाळ होता त्यातून पेशींचे प्रतिमाचित्रण आणखी सोपे झाले. ते रसायनशास्त्रज्ञ जसे होते, तसेच सागरी जीवशास्त्रज्ञही होते. मरीन बायोलॉजिकल लॅबोरेटरी या मॅसॅच्युसेट्समधील प्रयोगशाळेत त्यांनी २००१ पर्यंत काम केले. यूएस नॅशनल अॅकॅडमी ऑफ सायन्सेसवर त्यांची निवड झाली होती. जपानी सम्राटांचा ऑर्डर ऑफ कल्चर सन्मानही त्यांना मिळाला. ‘बायोल्युमिनन्स- केमिकल प्रिन्सिपल्स अँड मेथड्स’ व ‘ल्युमिनस पस्र्युटस- जेलिफिश, जीएफपी अँड द अनफोरसीन पाथ टू नोबेल प्राइज’ ही त्यांची दोन पुस्तके गाजली. त्यांनी त्यांच्या भाषणांमधून नेहमीच अण्वस्त्रमुक्तीसाठी प्रचार केला कारण अणुयुद्धाच्या झळा त्यांनी स्वत: अनुभवलेल्या होत्या. त्या अस्थिर काळानेच त्यांना मानवी कल्याणासाठीचे संशोधन करण्याची ऊर्मी दिली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा