वल्र्ड टूर फायनल्समध्ये बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने अजिंक्यपद मिळवणे हे तिच्या आत्मविश्वासासाठी आणि २०२० टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या संभाव्य सुवर्णपदकासाठी सुलक्षण ठरेल. आतापर्यंत अनेकदा असे आढळून आले आहे, की सिंधू एखाद्या मोठय़ा स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारते, पण अजिंक्यपद तिला हुलकावणी देते. ती इतक्यांदा अंतिम फेरीपर्यंत पोहोचते या वास्तवाकडे दुर्लक्ष होऊन ती कशी कचखाऊ आहे यावरच निष्कारण आणि अवास्तव चर्चा होऊ लागली होती. चीनमधील ग्वांगजो येथे झालेल्या वर्ल्ड टूर्स फायनलच्या अंतिम फेरीत सिंधूने जपानच्या नोझोमी ओकुहाराला सरळ सेट्समध्ये २१-१७, २१-१९ असे हरवले आणि आनंदाश्रूंना वाट करून दिली.
हे स्वाभाविक होते, कारण सप्टेंबर २०१७ पासून सिंधू निरनिराळ्या सात स्पर्धाच्या अंतिम फेरीत पोहोचली आणि प्रत्येक वेळी उपविजेती ठरली. याशिवाय रिओ ऑलिम्पिक २०१६, २०१७ आणि २०१८ मधील जागतिक स्पर्धा यांच्या अंतिम फेरीत ती पोहोचली होती, तरी सुवर्णपदक जिंकू शकली नव्हती. बॅडमिंटनसारख्या वैयक्तिक क्रीडाप्रकाराविषयी असे म्हटले जाते, की तुम्ही वारंवार अंतिम फेरीत पोहोचत असाल, पण अजिंक्य ठरत नसाल तरीही डगमगून जायचे कारण नाही. कारण सातत्याने अजिंक्य ठरण्याच्या कामगिरीपासून तुम्ही अवघा एक विजय दूर असता! एकदा का तो विजय मिळाला की आत्मविश्वास कैक पटींनी वाढतो. सिंधूच्या बाबतीत असे काहीसे घडेल, असे मानण्यासारखी परिस्थिती आहे. कारण तिला वारंवार हरवणाऱ्या कॅरोलिना मारिन (स्पेन), अकाने यामागुची (जपान), नोझोमी ओकुहारा (जपान), ताइ झु यिंग (तैवान) यांनाही तिच्याइतक्या सातत्याने अंतिम फेरीत पोहोचता येत नाही. गेल्या वर्षी जागतिक स्पर्धेत अंतिम फेरीत तिला नोझोमी ओकुहाराने हरवले होते. जाकार्ता एशियाडमध्ये तैवानच्या ताइ झु यिंगशी हरल्यामुळे सिंधूला सुवर्णपदकाने हुलकावणी दिली होती. ग्वांगजो वर्ल्ड टूर फायनल्समध्ये तिने उपान्त्य फेरीत ताइ झु यिंगला आणि अंतिम फेरीत ओकुहाराला हरवून आधीच्या पराभवांची सव्याज परतफेड केली. वर्ल्ड टूर फायनल्समध्ये आठ अव्वल बॅडमिंटनपटू एकमेकांशी खेळतात. यापूर्वी २०११ मध्ये सायना नेहवालने अंतिम फेरीपर्यंत धडक मारली होती. तिच्याही आधी २००९ मध्ये मिश्र दुहेरीत ज्वाला गुत्ता आणि व्ही. दिजू अंतिम फेरीत पोहोचले होते. सिंधूने ही स्पर्धा जिंकून त्यांच्यावरही कडी केली. आता पुढील वर्षी पुन्हा एकदा जागतिक स्पर्धा आणि ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धा जिंकण्यासाठी सिंधू मानसिकदृष्टय़ा सिद्ध झालेली आहे.