भारतीय अभिजात संगीतातील घराणे या संकल्पनेची सुरुवातच ज्या ग्वाल्हेरमध्ये झाली तेथेही त्या घराण्याची पताका खांद्यावर घेऊन नाव सार्थ करणाऱ्यांची संख्या कमी नव्हती. परंतु विष्णू दिगंबर पलुस्करांनी या घराण्याच्या गायकीला ‘अखंड’ भारतात नावारूपाला आणले, ते गांधर्व विद्यालयाच्या माध्यमातून. ग्वाल्हेरची परंपरा साऱ्या देशभर पसरली आणि त्या काळातील संगीताच्या क्षेत्रात तिचा दबदबा निर्माण झाला. पं. शरद साठे हे या अशा संपन्न परंपरेचा वारसा सादर करणारे कलावंत होते.
विष्णू दिगंबरांचे चिरंजीव दत्तात्रय यांच्याकडेच थेट गायन शिकण्याची संधी त्यांना मिळाली. द. वि. पलुस्करांनी विसाव्या शतकाच्या मध्यात संपूर्ण देशाला जे वेड लावले होते, त्याचे वर्णन अचंबित करणारे होते. त्यांच्या अकाली निधनाने शरद साठे यांना प्रो. बी. आर. देवधर यांच्याकडे धाव घ्यावी लागली. त्या काळात भारतीय संगीतात किराणा, जयपूर, भेंडीबाजार यासारखी घराणी नव्या तेजाने तळपू लागली होती. तरीही पं. साठे यांनी मात्र ग्वाल्हेरचीच परंपरा पुढे सुरू ठेवण्याचे ठरवले. देवधर मास्तरांनंतर पं. शरच्चंद्र आरोलकर यांच्याकडून त्यांना तालीम मिळाली. या घराण्याची सगळी वैशिष्टय़े आपल्या गायनात पुरेपूर समाविष्ट करून शरद साठे यांनी मैफली गवई म्हणून नाव कमावले. जाहिरात संस्थेत नोकरी करत असतानाच मुंबईतील दादर माटुंगा सर्कल या संस्थेशी त्यांचा जवळचा संबंध प्रस्थापित झाला. या संस्थेचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले. अस्सल गायकीचे दर्शन घडवणाऱ्या साठे यांच्याकडे बंदिशींचा मोठा साठा होता. अप्रचलित रागातील अनेक सुंदर बंदिशी हे त्यांच्या गायनातील एक सौंदर्यस्थळ होते. आकाशवाणी, दूरचित्रवाणी या माध्यमांमध्ये कार्यक्रम सादर करतानाच अनेक संगीत सभांमधून पं. साठे यांची हजेरी हमखास असे. साठे यांना लंडनमधील भारतीय विद्याभवन संस्थेच्या केंद्रात निवासी प्राध्यापक म्हणूनही काम करण्याची संधी मिळाली. टप्पा, तराणा हे त्यांच्या गायनातील देखणे दागिने. त्या संगीत प्रकारांबद्दल त्यांचा अभ्यासही खूप. त्यामुळे ख्यालगायनाबरोबरच अशा ललित प्रकारांमध्येही पं. साठे हे अतिशय रमून जात. गेली सुमारे पाच दशके ते आपली कला सतत सादर करत आले. परिणामी आयटीसी संगीत संशोधन अकादमीचा सन्मान, पं. विनायकराव पटवर्धन स्मृती गौरव पुरस्कार, काशी संगीत समाजाचा संगीतरत्न पुरस्कार यांसारखे सन्मान त्यांना मिळाले. एक अतिशय गुणी, ज्ञानी आणि अभिजात कलावंत म्हणून ओळख असलेल्या पं. शरद साठे यांचे निधन ही सगळ्याच संगीतप्रेमींसाठी हळहळ वाटायला लावणारी घटना आहे.