मुख्यमंत्रिपदाची खुर्ची काटेरी मुकुटच मानली जाते. एकीकडे पक्षातील ज्येष्ठ किंवा असंतुष्टांशी संघर्ष करावा लागतो तर दुसरीकडे पक्षश्रेष्ठींची मर्जीही महत्त्वाची ठरली. त्यामुळे पाच वर्षे हे पद भूषविलेला भाग्यवान म्हणावा लागेल, स्थिर सरकार दिल्याचे समाधान त्याला लाभते. मात्र एखाद्याने सलग २५ वर्षे मुख्यमंत्रिपद भूषविणे हा एक विक्रमच आहे. सिक्कीमचे मुख्यमंत्री पवन चामलिंग यांच्या नावे तो विक्रम आहे. सध्याची मुख्यमंत्रिपदाची त्यांची पाचवी वेळ आहे. त्यांनी पश्चिम बंगालचे ज्योती बसू यांचा विक्रम मोडला आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे एकेकाळचे आधारस्तंभ असलेल्या ज्योतीबाबूंनी २३ वर्षे पश्चिम बंगालची धुरा सांभाळली होती.
सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंटचे संस्थापक असलेल्या पवन चामलिंग यांनी डिसेंबर १९९४ मध्ये मुख्यमंत्रिपदाची धुरा हाती घेतली. ‘नवे सिक्कीम, आनंदी सिक्कीम’ या आपल्या घोषणेद्वारे त्यांनी राज्याचा कायापालट केला. ज्यांनी वाटचालीत साथ दिली त्या साऱ्यांचा हा सन्मान आहे, अशा भावना ६८ वर्षीय चामलिंग यांनी व्यक्त केल्या आहेत. दिवंगत ज्योती बसू यांच्यासारख्या महान व्यक्तिमत्त्वाचा विक्रम मोडणे हे माझ्यासाठी खूप मोठे आहे, असे चामलिंग यांनी स्पष्ट केले. दक्षिण सिक्कीममधील याँगयाँग येथे जन्मलेल्या पवन चामलिंग यांनी २२व्या वर्षीच राजकारण प्रवेश केला. १९७३चा तो काळ, सिक्कीम हे संस्थान भारतात विलीन करण्याची चर्चा सुरू होती. १९७५ मध्ये ते युवक काँग्रेसचे पदाधिकारी झाले. १९७८ मध्ये प्रजातंत्र काँग्रेसचे ते सचिव बनले. १९८३ मध्ये याँगयाँगचे सरपंच झाले, तेथून त्यांची कारकीर्द सुरू झाली. १९८५ मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले. दामथंगमध्ये दुसऱ्यांदा विजयी झाल्यावर मंत्रिमंडळात उद्योगखात्याची जबाबदारी त्यांच्या सोपविण्यात आली. ८९ ते ९२ या काळात नरबहादूर भंडारी यांच्या मंत्रिमंडळात ते होते. या काळात अनेक राजकीय उलथापालथी झाल्या. त्यातून १९९३ मध्ये त्यांनी सिक्कीम डेमॉक्रेटिक फ्रंटची स्थापना केली. त्यानंतर १९९४, १९९९, २००४, २००९ व २०१४ अशा सलग पाच वेळा त्यांनी विधानसभा निवडणुकीत पक्षाला विजय मिळवून दिला आहे. राज्याचा विकास व शांततेचे वातावरण यामुळे त्यांना यश मिळाल्याचे सांगितले जाते. २१ मे २०१४ रोजी सलग पाचव्यांदा त्यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गेली अनेक वर्षे सेंद्रिय शेतीकडे या राज्याने कटाक्षाने लक्ष दिले. परिणामी आज संपूर्ण राज्यात सेंद्रिय शेती केली जाते. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांनी दोन वर्षांपूर्वी सिक्कीम हे देशातील पहिले ‘सेंद्रिय राज्य’ म्हणून जाहीर केले. चामलिंग यांच्या धोरणांमुळेच सिक्कीमचा हा गौरव झाला.