जेव्हा भारतीय संगीत एका नव्या ‘नादा’च्या शोधात होते, तेव्हा गिटार, संतूर आणि तबला या क्षेत्रातील त्या वेळच्या युवक म्हणता येईल, अशा तिघांनी ‘कॉल ऑफ द व्हॅली’ या नावाने जो प्रयोग केला, त्याला तेव्हापासून, म्हणजे १९६७ पासून आजपर्यंत भारतीय संगीताच्या चाहत्यांनी अतिशय मन:पूर्वक दाद दिली. संतूर हे अभिजात संगीताच्या दरबारात नव्याने दाखल झालेले, पण पूर्ण भारतीय असे वाद्य. तबला तर सगळ्याच मैफलींमध्ये अत्यावश्यक ठरलेले वाद्य. या दोन्हीच्या जोडीला गिटार हे पूर्ण पाश्चात्त्य बनावटीचे वाद्य त्यामध्ये सहज मिसळून गेले, याचे कारण ब्रिजभूषण काब्रा यांच्यासारखा प्रतिभावान संगीतकार ते वाजवत होता आणि त्याच्या जोडीला होते पंडित हरिप्रसाद चौरसिया आणि पंडित शिवकुमार शर्मा.
ब्रिटिशांच्या आगमनानंतर भारतीय संगीतात ऑर्गन, हार्मोनिअम, व्हायोलिन ही वाद्ये अलगदपणे येऊन पूर्ण भारतीय झाली. इतकी की, पाश्चात्त्यांना ती त्यांचीच आहेत, याबद्दलही संशय यावा. गिटार हे मात्र बराच काळ भारतीय संगीतात रुजेल, असे कुणालाच वाटत नव्हते. काब्रा यांनी ते काम केले. त्या वाद्यात आवश्यक त्या दुरुस्त्या करून ते वाद्य अभिजात संगीतासाठी परिपूर्ण करण्याबरोबरच, त्याच्या वादनाची एक स्वतंत्र शैली निर्माण करणे, हे त्यांचे फारच मोठे योगदान. रागदारी संगीत वाद्यांवर उमटताना एक नवा स्वरानुभव येतो.
सारंगी, सतार, सरोद, संतूर या प्रत्येक वाद्याच्या वादनाची रीत आणि त्याची ‘कहन’ही निराळी. परिपूर्णतेचा ध्यास घेणाऱ्या अनेक प्रतिभावंतांनी त्या वाद्यांवर प्रभुत्व मिळवले आणि संगीतच संपन्न केले. काब्रा यांचा ध्यास तोच होता. मुळात संगीत ही त्यांची आवड नाही, पण एका गाफील क्षणी ते या वाद्याच्या प्रेमात पडले आणि एकलव्य पद्धतीने त्यांनी अभ्यास सुरू केला. त्यांना सरोदिये उस्ताद अली अकबर खाँ भेटले आणि त्यांची दृष्टी विस्फारली. गिटार या वाद्याच्या नादात एक ‘मेटॅलिक साऊंड’ आहे. त्यामुळे त्याच्या वादनशैलीत स्वरांचे लगावही वेगळ्या पद्धतीने येतात.
काब्रा यांनी त्यावरही हुकमत मिळवली आणि आपली स्वत:ची शैली निर्माण केली. अभिजात संगीताच्या दरबारात या वाद्याला त्यामुळेच मानाचे स्थान मिळाले. रागसंगीतातील त्यांचे स्वतंत्र वादन अल्बमच्या रूपात उपलब्ध झाले आणि गिटारकडे पाहण्याची भारतीयांची नजरही बदलली. भूगर्भशास्त्रात पदवी घेतल्यानंतर ते या वाद्याच्या प्रेमात पडले; मग कलावंत म्हणूनच जगायचा निर्णय झाला आणि जगभरातील अनेक कार्यक्रमांतून पं. ब्रिजभूषण काब्रा यांनी आपली कला सादर केली. सामाजिक भान असणाऱ्या या कलावंताने आपल्या गावी, म्हणजे जोधपूर येथे महिलांना शिक्षण मिळण्यासाठी विशेष प्रयत्न केले. त्यांच्या वडिलांनी स्थापन केलेल्या महेश शिक्षण संस्थानमार्फत हे काम आजही सुरू आहे. संगीत शिक्षणाच्या क्षेत्रातील त्यांचे कामही तेवढेच महत्त्वाचे. भारतीय संगीताला एका वेगळ्या पातळीवर नेणाऱ्या एका कलावंताचे निधन ही म्हणूनच खूप दु:खकारक घटना.