‘ऑस्कर सो व्हाइट’ हा हॅशटॅग २०१६ पासून प्रचलित झाला, कारण अॅकॅडमी मोशन पिक्चर आर्ट्स अॅण्ड सायन्सेसने ऑस्कर पुरस्कारांसाठी वर्षांनुवर्षे गोऱ्या कलावंत-तंत्रज्ञांना झुकते माप दिल्याच्या सप्रमाण भावनेचा त्या वर्षी कडेलोट झाला होता. खरे तर अशीच काहीशी चळवळ ‘ऑस्कर सो मॅस्क्युलिन’ या हॅशटॅगखाली सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक या अत्यंत महत्त्वाच्या पुरस्कारासंदर्भात सुरू व्हायला हरकत नव्हती. अभिव्यक्तीचे प्रागैतिक प्रारूप म्हणवल्या जाणाऱ्या हॉलीवूड आणि ऑस्कर परिप्रेक्ष्यात आजवर केवळ तीनच महिला दिग्दर्शकांना ऑस्करची बाहुली जिंकता यावी, हा विरोधाभास गौरेतरांबाबत असमतोलाइतकाच ढळढळीत. जेन कॅम्पियन या ६७ वर्षीय दिग्दर्शक यंदाच्या ऑस्कर सोहळय़ात सर्वोत्कृष्ट ठरल्या. येथील ऑस्कर दर्दीना त्यांची ओळख तशी जुनी. १९९३ मधील ‘द पियानो’ या चित्रपटासाठी त्यांना पहिल्यांदा दिग्दर्शन विभागात नामांकन मिळाले होते. यंदा ‘द पॉवर ऑफ द डॉग’ या चित्रपटासाठी त्यांना नामांकन होते. ऑस्कर नामांकन दोनदा मिळवणाऱ्या त्या पहिल्याच दिग्दर्शक. गतशतकात तर असे नामांकनही अभावानेच मिळायचे. १९७७ मध्ये लिना वेर्तम्युलर यांना ‘द सेव्हन ब्युटीज’साठी दिग्दर्शनाचे नामांकन होते. तोवर कोणाही महिलेला हा मान मिळाला नव्हता. ‘द पियानो’साठी कॅम्पियन यांना पटकथा लेखनाचे ऑस्कर मात्र मिळाले. त्यामुळे आता पटकथा लेखन आणि दिग्दर्शन अशी दोन ऑस्कर जिंकणाऱ्या त्या पहिल्या व एकमेव महिला. त्यांच्यापूर्वी कॅथलीन बिगेलो (‘द हर्ट लॉकर’ – २०१०) आणि क्लोइ झाओ (‘नोमॅडलॅण्ड’ – २०२१) यांनाच ऑस्कर जिंकता आले. पण आणखी चार महिला दिग्दर्शकांना नामांकन मिळूनही ऑस्कर जिंकता आले नाही. ‘द पियानो’ला पामे डिओर हा मानाचा फ्रेंच पुरस्कार मिळाला होता आणि त्यावेळीही त्या पहिल्याच होत्या. या पुरस्काराच्या ७० व्या वर्षांनिमित्त कान महोत्सवात २०१७मध्ये त्यांचा इतर दिग्दर्शकांबरोबर सत्कार करण्यात आला. त्यावेळचे जेन कॅम्पियन यांचे उद्गार महत्त्वाचे होते – ‘त्या सगळय़ा पुरुषांमध्ये मी एकटीच बाई. त्यामुळे जरा अवघडल्यासारखं झालं खरं. पण एकटी बाई म्हणूनच लक्षात आली. बाईच नसती तर कोणाला फिकीर होती?’! जेन कॅम्पियन या न्यूझीलंडच्या आणि या देशाला तशी चित्रपटकर्त्यांची फार मोठी परंपरा वगैरे नाही. ऑस्करच्या आधी झालेल्या ‘क्रिटिक्स चॉइस’ पुरस्कार सोहळय़ात त्यांनी टेनिसपटू विल्यम्स भगिनींबद्दल सहजपणे व्यक्त केलेले मतही वादग्रस्त ठरले. ‘त्यांना आमच्यासारखे पुरुषांशी खेळावे लागत नाही’ हे त्यांचे उद्गार वेगळय़ा संदर्भात पाहिले गेले. कॅम्पियन यांनी जाहीर माफी मागितली, पण त्यांनी व्यक्त केलेल्या व्यथेमध्ये चूक काहीच नव्हते. ‘स्त्रीवादी चळवळी आताशा अंतर्धान पावल्या आहेत. पण आजही पुरुषी वर्चस्ववाद संपुष्टात आलेला नाही’, असे कॅम्पियन यांचे मत. त्यांचे विषय फार मुख्य प्रवाहातील नसतात. चित्रपटही मोजकेच बनवतात. परंतु त्यामुळेच स्टुडिओ संस्कृतीपेक्षा ओटीटी स्ट्रीिमग व्यासपीठांविषयी त्यांना हल्ली आदरभाव वाटू लागला आहे. नेटफ्लिक्ससारखी व्यासपीठे गुंतागुंतीच्या आणि वेगळय़ा धाटणीच्या चित्रपटांना आसरा देतात असेही त्यांनी म्हटले आहे. हॉलीवूडच्या बडय़ा दिग्दर्शकांमध्ये ओटीटीच्या मुद्दय़ावर अजूनही काहीसा गोंधळ असताना, कॅम्पियन यांची भूमिका नि:संदिग्ध आणि स्पष्ट आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा