चुंबकत्व, अतिवाहकता व द्रव्याची रचना यांचे आकलन आता प्रगत अवस्थेत आहे. याचे श्रेय ज्या मोजक्या वैज्ञानिकांना आहे त्यातील एक म्हणजे अमेरिकी भौतिकशास्त्रज्ञ फिलिप अँडरसन. त्यांच्या निधनाने आपण एका नोबेल विजेत्या वैज्ञानिकास मुकलो आहोत. संघननीकृत द्रव्यांच्या सिद्धांताची मांडणी त्यांनी केली. उच्च अणुघनता असलेल्या घन व द्रव यांचे गुणधर्म त्यांनी जास्त सोप्या पद्धतीने सांगितले. यादृच्छिक रचना असलेल्या, म्हणून वेगळ्या पदार्थामध्ये इलेक्ट्रॉनचे वर्तन कसे असते यावर त्याचे गुणधर्म अवलंबून असतात. त्यातूनच तो पदार्थ वाहक, अर्धवाहक की अतिवाहक हे ठरते. १९५८ मध्ये त्यांचा एक शोधनिबंध प्रसिद्ध झाला होता. त्यात असंरचित पदार्थात इलेक्ट्रॉनचे आचरण कसे असते यावर प्रकाश टाकला होता. त्यांच्या मते काही इलेक्ट्रॉन अडकून पडतात, तर काही मुक्त प्रवास करतात. त्यांचे संशोधन ‘अँडरसन स्थानिकीकरण’ (अँडरसन लोकलायझेशन) नावाने प्रसिद्ध आहे. ते प्रकाश व ध्वनी लहरींनाही लागू पडते. हे संशोधन भौतिकशास्त्राच्या जगाला हादरे देणारे होते. धुक्यात प्रकाश कसा मागे परावर्तित होतो व असंरचित पदार्थ विद्युतरोधक कसे बनतात यावर त्यांनी सखोल विवेचन केले. १९७७ मध्ये त्यांना नेव्हिल फ्रान्सिस मॉट व जॉन हॅस ब्रॉक व्हॅन लेक यांच्या समवेत भौतिकशास्त्राचे नोबेल मिळाले होते. ‘स्पिन ग्लासेस’ ही अशी संरचना असते ज्यात पदार्थातील अणू एकमेकांशी सुसंगत व असंगत अशा दोन्ही पद्धतीच्या आंतरक्रिया एकाचवेळी करीत असतात त्यांना ‘स्पिन ग्लास संरचना’ म्हणतात. संगणकातील चल, मेंदूतील न्यूरॉन्स यांच्यातही असेच आचरण एकाच वेळी दिसून येते. त्यामुळे त्यांचे स्पिन ग्लास संशोधन हा संगणक, मेंदूविज्ञान यांना जोडणारा दुवाही ठरला. सत्तरच्या दशकात अँडरसन यांनी काही पदार्थात शून्य अंश सेल्सियसला अतिवाहकतेचा गुणधर्म दिसून येतो असे म्हटले होते. नंतरच्या काळात त्यांनी जास्त तापमानाला अतिवाहकता गुणधर्म दाखवणारे पदार्थ शोधले. सायन्स या नियतकालिकात त्यांनी १९७२ मध्ये मोअर इज डिफरंट हा संशोधन निबंध लिहिला होता त्याने खळबळ माजली. हार्वर्ड विद्यापीठात त्यांचे शिक्षण झाले, दुसऱ्या महायुद्धाच्या काळात त्यांनी अँटेना तयार करण्यासाठी नौदल संशोधन प्रयोगशाळेला मदत केली होती. नंतर ते बेल टेलिफोन लॅबोरेटरीत दाखल झाले. तेथे तीस वर्षे त्यांनी काम केले. काही काळ त्यांनी ब्रिटनच्या केंब्रिज विद्यापीठात काम केले नंतर ते प्रिन्स्टनमध्ये रूजू झाले. १९६२ मध्ये त्यांनी केलेल्या संशोधनाचा आधार घेत पीटर हिग्ज यांनी गॉड्स पार्टिकलचे भाकीत केले होते, हेही उल्लेखनीय!
फिलिप अँडरसन
सत्तरच्या दशकात अँडरसन यांनी काही पदार्थात शून्य अंश सेल्सियसला अतिवाहकतेचा गुणधर्म दिसून येतो असे म्हटले होते.
Written by लोकसत्ता टीम
First published on: 23-04-2020 at 00:01 IST
Web Title: Philip anderson profile abn