मध्यमवर्गीय मूल्यांचा पुरस्कार करणाऱ्या आणि पुढील काळात ‘हिट अँड हॉट’ नाटकांनी मराठी रंगभूमी व्यापली असताना आपला वेगळा सूर सशक्तपणे जागता ठेवणाऱ्या नाटककार प्रेमानंद गज्वी यांची ९९ व्या अ. भा. मराठी नाटय़संमेलनाच्या अध्यक्षपदी झालेली निवड विचारी रंगकर्मी आणि प्रेक्षक-वाचकांसाठीही आनंदाची बाब आहे. गज्वी यांची अध्यक्षपदी निवड झाल्यानंतरच्या, एरवी नाटय़संमेलनास जाण्यास फारसे इच्छुक नसणाऱ्या काही रंगकर्मीच्या सकारात्मक प्रतिक्रिया पाहिल्यास हे ध्यानात यावे. अशा प्रतिक्रिया येण्यास कारण म्हणजे गज्वींच्या अभिव्यक्तीच्या कसाविषयीचा विश्वास! १९८० च्या दशकापासूनचा गज्वींचा लेखनप्रवासही याची साक्ष देतो.
तेंडुलकर-मतकरी आणि पुढे आळेकर-एलकुंचवार यांच्यानंतर स्वातंत्र्योत्तर मराठी नाटकांत तिसऱ्या पिढीचे पर्व सुरू झाले. गज्वी हे त्या पर्वातले. समीक्षक ‘दलित नाटककार’ म्हणून त्यांचे मूल्यमापन करू पाहत असले, तरी गज्वी स्वत:स दलित नाटककार मानत नाहीत. सत्यशोधक आणि पुढे आंबेडकरी जलशांनी महाराष्ट्रातील वंचित वर्गाची रंगभूमी आकाराला आली आणि स्वातंत्र्योत्तर काळात समस्याकेंद्री नाटकांनी आपला विद्रोही तोंडवळा प्रखरपणे जपला. परंतु पुढे त्यात तोचतोचपणा येऊ लागला. आशय विद्रोही, पण शैली मध्यमवर्गीय मूल्यांचीच असे काहीसे त्यांचे स्वरूप झाले. नेमक्या याच वळणावर गज्वींच्या नाटकांनी समस्यांच्या सीमारेषा ओलांडल्या. त्यांची नाटके वास्तव मांडत होतीच, पण सखोल मूल्यभानही व्यक्त करत होती. ‘घोटभर पाणी’ ही एकांकिका असो वा देवदासी प्रथेचा नाटय़शोध घेणारे ‘देवनवरी’, ग्रामीण जीवनातील जातीय गुंता उलगडणारे ‘वांझ माती’, वेठबिगारांचा मुक्तिसंघर्ष मांडणारे ‘तनमाजोरी’ वा स्मशानकर्मे करणाऱ्या ब्राह्मणांविषयीचे ‘किरवंत’ हे नाटक असो, किंवा ‘जय जय रघुवीर समर्थ’, ‘पांढरा बुधवार’, ‘गांधी-आंबेडकर’, ‘रंगयात्री’, अगदी अलीकडचे ‘व्याकरण’- ही नाटके असोत, गज्वींनी दलित या कोटीक्रमापुरते सीमित न राहता मानवी जगण्याचा वास्तवशोध घेतलेला दिसतो. माणसा-माणसांतील, माणूस व समाज आणि समाज-समाजातील आंतरसंबंधांचा वेध ते घेताना दिसतात. हे करताना त्यांची शैली आधुनिक, प्रयोगशील राहिली. ती सुबोध आणि थेट आहे. त्यासाठी त्यांना पात्रांची भाऊगर्दी लागत नाही, की नाटय़ात्म आवेशाची फोडणी. तरीही वास्तव न दडवणारी, समाजशास्त्रीय चिंतन मांडणारी ही नाटके यशस्वी ठरली.
मूळचे चंद्रपूरचे असणाऱ्या गज्वींचा कवितेपासून सुरू झालेला चार दशकी लेखनप्रवास नाटकांनी व्यापला असला, तरी ‘जागर’ ही कादंबरी आणि ‘लागण’, ‘ढीवर डोंगा’ हे कथासंग्रहही त्यांच्या नावे आहेत. नव्वदोत्तरी- आधुनिकोत्तर कोलाहलाला सामोरे जाताना आवश्यक असणारा संयम व त्यासाठीची ज्ञानलालसा त्यांच्याकडे आहे आणि तेच त्यांच्या मांडणीचे अंगभूत सूत्र राहिले. त्याचा विस्तार त्यांनी २००३ साली बोधी नाटय़ परिषद’ सुरू करून केला आहे. ज्ञानासाठी कला हे ‘बोधी’चे तत्त्व. हा ज्ञानाग्रह गज्वींच्या मुख्य प्रवाही अध्यक्षीय भाषणातही दिसून येईल, अशी अपेक्षा आहे.