अभियांत्रिकीच्या क्षेत्रात तुलनेने फार कमी महिला दिसतात. अर्थात प्रगत देश याला काही प्रमाणात अपवाद आहेत. जगातील सर्वात वेगवान लेसरची निर्मिती करणाऱ्या प्रा. मार्गारेट मुरनन या अशाच ख्यातनाम लेसर तंत्रज्ञ आहेत. त्यांना अलीकडेच आर्यलडचे सेंट पॅट्रिक विज्ञान पदक देण्यात आले आहे. अमेरिकेसारख्या देशात काम करत असतानाही त्यांना आर्यलडसारख्या देशात गौरवण्यात येण्याचे कारण म्हणजे त्या जन्माने आयरिश आहेत. आर्यलडमध्ये संशोधनासाठी वेगळे वातावरण निर्माण करण्यातही त्यांचा मोठा वाटा आहे.

प्रा. मुरनन यांचा जन्म लिमेरिक गावचा.  आता त्या अमेरिकेतील सर्वोत्तम भौतिकशास्त्रज्ञ व तंत्रज्ञांपैकी एक आहेत. लेसर अभियांत्रिकीत त्यांनी मोठे काम केले आहे. जगातील सर्वात वेगवान लेसर शलाका त्यांनी तयार केल्या. कुणाचा विश्वास बसणार नाही, पण त्यांनी तयार केलेले लेसर इतके वेगवान आहेत, की ते रासायनिक अभिक्रियांतील अणूंची गती मोजू शकतात. २००५ मध्ये ज्या वैज्ञानिकांना भौतिकशास्त्राचे नोबेल मिळाले त्यांच्या यशात खरे तर मुरनन यांचा मोठा वाटा आहे. याचे कारण म्हणजे त्यांनी संशोधनात जो लेसर वापरला होता तो डॉ. मुरनन यांनी तयार केलेला होता. त्यांनी तयार केलेल्या काही लेसर शलाका या १२ फेमटोसेकंदात निर्माण होणाऱ्या आहेत. (सेकंदातील दहाचा उणे पंधराव्या घाताएवढा भाग) आपण कॅमेऱ्याचा फ्लॅश मारतो तितका वेग असलेले लेसर तयार करण्यातील त्यांचे काम महत्त्वाचे आहे. वैज्ञानिक संशोधनात अलीकडे प्रतिमाचित्रणाला महत्त्व आहे. त्यात वैद्यक, तंत्रज्ञान व विज्ञान संशोधन ही क्षेत्रे अपवाद नाहीत. अनेक पदार्थाच्या रचना, शरीररचनेचा अभ्यास करण्यासाठी अशा प्रकारचे प्रतिमाचित्रण ही गरजेची बाब आहे. हे चित्रण अधिक सुस्पष्ट करणारे लेसर किरण तयार करण्यात डॉ. मुरनन यांनी केलेली कामगिरी अजोड अशीच म्हणावी लागेल. त्यांनी अतिशय किफायतशीर व टेबलावर बसू शकेल असे एक्सरे लेसर यंत्र तयार केले आहे. क्ष-किरणांचा अधिक परिपूर्ण वापर करण्याचे श्रेय या महिला वैज्ञानिकास आहे. युनिव्हर्सिटी ऑफ कोलॅरॅडोच्या त्या मानद सदस्या आहेत.  वॉशिंग्टन स्टेट युनिव्हर्सिटी व युनिव्हर्सिटी ऑफ मिशिगन व नंतर युनिव्हर्सिटी ऑफ कोलॅरॅडो येथे त्यांनी अध्यापनाचे काम केले. डॉ. मुरनन यांना वडिलांमुळेच भौतिकशास्त्राची गोडी लागली. त्यांच्या मते विज्ञान संशोधन हे सांघिक काम असते, त्यामुळे त्यांचे पती प्रा. हेन्री कॅप्टेन यांनाही त्या विज्ञान संशोधनातील कायमचा भागीदार मानतात. त्यांचा विद्यार्थी वर्गही मोठा आहे. अतिशय वेगवान प्रकाशीय व क्ष-किरण विज्ञान हा त्यांच्या अभ्यासाचा विषय. अमेरिकन फिजिकल सोसायटीच्या त्या फेलो असून यापूर्वी त्यांना मारिया गोपर्ट मेयर पुरस्कार मिळाला होता. नॅशनल अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सेस या संस्थेवर त्यांची निवड झाली. अमेरिकन अ‍ॅकॅडमी ऑफ आर्ट्स अँड सायन्सेस या प्रख्यात संस्थेच्या त्या फेलो आहेत. एकूणच त्यांनी लेसर अभियांत्रिकीत केलेले संशोधन नव्या जगाची कवाडे खुली करणारे आहे.

Story img Loader