ठाण्यातील अ‍ॅड. शरद भाटे हे प्रसिद्ध करसल्लागार. टोकाचे स्पष्टवक्ते, कडक शिस्तीचे आणि तितकेच प्रामाणिक. भाटेंचे वडील शिक्षक होते. १२ भावंडं. घरची परिस्थिती बेताचीच, ती लक्षात घेऊन त्यांनी १६-१७ व्या वर्षापासूनच छोटी-मोठी कामं करत घरात हातभार लावायला सुरूवात केली. भाटेंनी सुरुवातीला ‘बँक ऑफ  महाराष्ट्र’मध्ये नोकरी करत असतानाच पार्टटाइम अकाऊंट्सची कामे केली. पुढे वकिली पूर्ण केली आणि कर या विषयात गती प्राप्त केली. पुढे ते स्वत:ची ओळख ‘टॅक्स अ‍ॅडव्होकेट’ अशीच करून देत. अनेक कर सल्लागार त्यांची मदत घेत. पुढे बँके तली नोकरी सोडून कर सल्लागार म्हणून व्यवसाय सुरू केला. त्यात त्यांना प्रचंड यश मिळाले. ठाण्यातील त्यांच्या अशिलांसाठी त्यांनी अनेक अभिनव योजना राबविल्या. अर्थसंकल्प सादर झाला की भाटे त्यातील करसंबंधी तरतुदींवर एक मोठे परिपत्रक काढीत. ते त्यांच्या सर्व अशिलांना आणि हितचिंतकांना स्वखर्चाने पोस्टाने पाठवत. हे परिपत्रक इतके परिपूर्ण असे की करसंबंधी बाकी कुठल्याही संदर्भांची गरज भासत नसे. भाटेंचा विशेष म्हणजे कर सल्ल्याचे काम सचोटीने करता येते हे त्यांनी दाखवून दिले.

काम छोटं असलं तरी ते पद्धतशीरपणे करण्याचा त्यांचा शिरस्ता. प्रत्येक कामात त्यांच्या बुद्धीची चमक आणि स्वभावातील मिस्किलपणा दिसे. बोलण्यात तर आवर्जून दिसे. सुरुवातीला नवीन माणसाला त्यांच्या बोलण्यात टोकाचा स्पष्टवक्तेपणा वाटे, पण त्यात प्रेमळपणाची झाक होती.

 पैसे ही शाश्वत गोष्ट नव्हे, याची जाणीव व्हावी म्हणून त्यांनी आपल्या लेटरहेडवरच ‘धन कमाविले कोट्यान कोटी, संगे न ये रे लंगोटी’ हे संतवचन उद्धृत केले होते; पण प्रत्यक्ष जीवनात ते आचरणातही आणले. भाटेंनी अपार कष्ट करत पैसे कमावले; पण या पैशांचा उपयोग केवळ स्वत:साठीच न करता सामाजिक बांधिलकी म्हणून सामाजिक कार्यासाठी वापरला. विशेष म्हणजे या सामाजिक कामाचा गवगवा त्यांनी कुठेही केला नाही. व्रतस्थपणे ते समाजासाठी काम करीत राहिले. बोरवाडीतील (ता. माणगाव, जिल्हा रायगड) ‘माउली’ वृद्धाश्रम उभारण्यात भाटेंचा मोलाचा वाटा होता. तिथल्या वृद्धांची सर्वतोपरी काळजी घेण्यासाठी ते तत्पर असत. अनेक सेवाभावी संस्थांच्या कार्यकर्त्यांना ते स्वखर्चाने हा वृद्धाश्रम पाहायला नेत, कोणतीही अपेक्षा न ठेवता!

भाटेंनी ‘लोकसत्ता’ मधून करविषयक, कायदेविषयक आणि गृहनिर्माण संस्थांविषयी मार्गदर्शनपर लेख लिहिले. त्यांच्या लेखांमुळे वाचकांना कर, कायदे आणि गृहनिर्माण संस्थांविषयी सखोल माहिती मिळे. लेखासंदर्भात एक गमतीशीर आठवण इथे नमूद करावीशी वाटते- १९ मे २०११ रोजी ‘लोकसत्ता’च्या ‘लोकरंग’ पुरवणीत ‘सर्किट’ या सदरात भाटेंच्या मिस्कील स्वभावाविषयीचा लेख प्रसिद्ध झाला होता. त्या लेखाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. पुढची अनेक वर्षे त्यांनी त्या तारखेला या लेखाचा वाढदिवस साजरा केला- असा लेखक विरळाच! भाटेंचा प्रामणिकपणा, स्पष्टवक्तेपणा- तरीही समोरच्या माणसाला आपलंसं करण्याचं कसब यामुळे त्यांच्या अनेक सुहृदांना त्यांचं जाणं चटका लावणारं  ठरलं. त्यांच्या निधनानंतर अनेकांनी ‘लोकसत्ता’स पत्रे पाठवून शोक व्यक्त केला.

Story img Loader