अष्टपैलू क्रिकेटपटू अ‍ॅलन डेव्हिडसनचा १९५० आणि १९६०च्या दशकात दबदबा होता. सहा फूट उंची, ऑस्ट्रेलियाच्या माऱ्याला प्रारंभ करणारी डावखुरी वेगवान गोलंदाजी, मधल्या फळीत फटकेबाजी करण्याची क्षमता असलेली डावखुरी फलंदाजी ही डेव्हिडसन यांची वैशिष्ट्ये. जशी त्यांची गोलंदाजीची शैली खास होती, तसाच त्यांचा वेग आणि लेट स्विंगही लक्षवेधी होता. याशिवाय नजीकच्या क्षेत्ररक्षणाच्या चापल्यामुळे ‘द क्लॉ’ हे टोपणनाव त्यांना प्राप्त झाले होते. डेव्हिडसन यांनी ४४ कसोटी सामन्यांत फलंदाज १,३२८ धावा केल्या, तसेच १८६ बळी त्यांच्या खात्यावर होते. परंतु २०.५३ धावांची त्यांची सरासरीसुद्धा आश्चर्यकारक होती. एका कसोटीत १०० धावा आणि १० बळी घेण्याची किमया साधणारे ते पहिले क्रिकेटपटू. मधल्या फळीतील फलंदाज म्हणून नऊ शतकेही त्यांच्या खात्यावर होती. त्यांच्या अष्टपैलुत्वाचा कर्णधार रिची बेनॉ यांना अभिमान वाटायचा.

    डेव्हिडसन यांचा जन्म न्यू साऊथ वेल्समधील सेंट्रल कोस्ट परिसरातील लिसारो येथे झाला. कुटुंबाच्या क्रिकेटप्रेमामुळे त्यांनाही या क्रिकेट आवडू लागले. गॉसफोर्ड हायस्कूलमध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना १९व्या वर्षी बँकेत नोकरी मिळाली. मग नॉर्दर्न डिस्ट्रिक्ट संघाचे ते प्रतिनिधित्व करू लागले. लवकरच त्यांनी न्यू साऊथ वेल्स संघात स्थान मिळवले. शेफिल्ड शिल्डच्या तीन सामन्यांत प्रतिनिधित्व केल्यानंतर १९५०मध्ये वयाच्या २०व्या वर्षी न्यूझीलंड दौऱ्यावर जाणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या रिझर्व्ह संघात त्यांची निवड झाली. वायरारापा संघाविरुद्ध डावात १० बळी आणि नाबाद १५७ धावांची खेळी त्यांनी साकारली. १९५२ मध्ये डेव्हिडसन यांना इंग्लंडमधील लीग क्रिकेटचे तीन प्रस्ताव चालून आले. परंतु राष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्थान मिळवण्यासाठी त्यांनी ते फेटाळले. अखेरीस १९५३ मध्ये इंग्लंड दौऱ्यासाठी डेव्हिडसन यांची ऑस्ट्रेलिया संघात निवड झाली. पण मिलर-लिंडवॉल हे ऑस्ट्रेलियाच्या वेगवान माऱ्याची धुरासुद्धा सांभाळत होते. १९५६ मध्ये किथ मिलरच्या निवृत्तीनंतर १९५७-५८ च्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यापासून नवा चेंडू हाताळण्याची जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली. तिथून डेव्हिडसन यांच्या कारकीर्दीला खऱ्या अर्थाने प्रारंभ झाला.  १९६२ मध्ये विस्डेनने निवडलेल्या वर्षातील पाच सर्वोत्तम क्रिकेटपटूंमध्ये डेव्हिडसन यांचा समावेश होता. १९६४ मध्ये ‘मेंबर ऑफ दी ऑर्डर ऑफ दी ब्रिटिश एम्पायर’ आणि १९६४ मध्ये ‘मेंबर ऑफ दी ऑर्र्डर ऑफ ऑस्ट्रेलिया’ हे बहुमान त्यांना मिळाले. याशिवाय १९८८ मध्ये स्पोर्ट्स ऑस्ट्रेलिया हॉल ऑफ फेम, २००४ मध्ये ऑस्ट्रेलियन क्रिकेट हॉल ऑफ फेम, २०११ मध्ये आयसीसी हॉल ऑफ फेम तसेच २०००  मध्ये ऑस्ट्रेलियन स्पोर्ट्स मेडल त्यांना प्रदान करण्यात आले. वयाच्या ९२व्या वर्षी जगाचा निरोप घेणाऱ्या डेव्हिडसन यांच्या कर्तृत्वाचे क्रिकेटविश्वाला अप्रूप वाटते.