‘कोणतेही वास्तुशिल्प हे अखेर एक इमारत असते; काळानुसार त्यात पडझडही होऊ शकते आणि बदलसुद्धा’ हे ख्यातनाम वास्तुरचनाकार बाळकृष्ण दोशी यांनी ‘रॉयल गोल्ड मेडल’ हा वास्तुकलेचा सर्वोच्च पुरस्कार मिळाल्यानंतर काढलेले उद्गार सकारात्मक मानावेत की नकारात्मक, हा तज्ज्ञांच्या चर्चेचा विषय ठरेल. बाळकृष्ण दोशी हे आता ९४ वर्षांचे आहेत. काळानुसार होणारी पडझड म्हणजे काय याचा जैविक अनुभव येण्याचे हे वय खरेच; पण स्वत:चे उत्तम वास्तुशिल्प असलेले ‘अमदावाद नी गुफा’ हे अप्रतिम कलास्थान २००२ मध्ये उद्ध्वस्त झालेले त्यांनी पाहिले आहे. तरीही कोणतेही किल्मिष न ठेवता इदं न मम अशा वृत्तीने ते ‘काळानुसार बदल होणार’ म्हणताहेत… तेदेखील, ‘वास्तुरचनाकलेतला अत्युच्च सन्मान’ मिळवल्यानंतर!
हा ‘रॉयल गोल्ड मेडल’ नामक पुरस्कार ब्रिटनच्या सरकारतर्फे, राणीतर्फे दिला जातो. त्याआधी मानाचे ‘प्रिट्झ्कर पारितोषिक’ ( २०१८), लोकआवास योजनांसाठी दिला जाणारा आगाखान पुरस्कार (१९९५) हे वास्तुरचना क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय पुरस्कार तसेच पद्माभूषण (२०२०) आणि पद्माश्री (१९७६) हे किताब त्यांनी मिळवले आहेतच. अन्य मानसन्मान तुलनेने स्थानिक स्वरूपाचे ठरतील. पण स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय असा भेदभाव वास्तुरचनांच्या अभिकल्पात नसतो, जे काही जेथे असते ते तिथल्या वापरकर्त्यांसाठी असते, हे भान बाळकृष्ण दोशी यांनी नेहमीच पाळले. त्यामुळे, त्यांच्या वास्तुरचनांतील सिमेंट, विटा दिसणारा पोत, वारा येण्यासाठी उघडे भाग हे सारे पाहून कुणी बाळकृष्ण दोशींवर ब्रूटॅलिस्ट असा शिक्का मारला, पण १९४०/५० च्या दशकांतील त्या युरोपीय वास्तुशैलीचे एक अध्वर्यू ल कार्बुझिए भारतात येऊन भारतीयच कसे झाले याचे इंगित बाळकृष्ण दोशी यांना जितके माहीत आहे, तितके कुणालाच नसेल. म्हणून तर, कॉर्बुझिएचा वारसा समर्थपणे चालवणारे एकमेव भारतीय वास्तुरचनाकार हेही बिरूद दोशी यांना चिकटले. हा प्रभाव अहमदाबादेत त्यांनी उभारलेल्या काही इमारतींत दिसतो; पण तो पुसण्याचा प्रयत्न बेंगळूरुच्या आयआयएम या व्यवस्थापन संस्थेचे संकुल उभारताना दोशी यांनी केल्याचे दिसते. ‘अमदावाद नी गुफा’सारखे त्यांचे वास्तुशिल्प मात्र, बाळकृष्ण दोशी यांच्याकडून कोणता प्रभाव पुढील पिढ्यांनी स्वाकारावा, याचे प्रतीक ठरले होते. वास्तुरचनाकारांचे गुरू म्हणवले जाणारे दोशी आता प्रत्यक्ष अध्यापन करत नसले, तरी त्यांच्याकडून शिकण्यासारखे काय आहे, हे सांगणारी दुसरी फळी तयार झालेली आहे.