पर्यावरणप्रेमींची जगात कमतरता नाही; पण जिवावर उदार होऊन व्यवस्थेशी लढणारे पर्यावरणप्रेमी अगदीच दुर्मीळ आहेत. इंडोनेशियातील बोगोर कृषी विद्यापीठातील वनतज्ज्ञ बाम्बांग हेरो सहार्यो हे अशा दुर्मिळांपैकी एक. खरे तर पर्यावरणाच्या प्रत्येक प्रश्नात राजकीय व आर्थिक हितसंबंध आड येत असतात. त्यामुळे त्याविरोधात आवाज उठवणे म्हणजे धनदांडग्यांचा रोष ओढवून घेण्यासारखेच असते. मात्र, सहार्यो यांनी इंडोनेशियातील वणव्यांबाबत आपली वैज्ञानिक मते निर्भीडपणे मांडली. त्यापायी सहार्यो यांना धमकावण्यात आले, तरी त्यांनी जैवविविधतेसाठीचा लढा सुरूच ठेवला आहे. त्यांच्या या निर्भीडपणासाठी ‘नेचर’ हे विज्ञान नियतकालिक आणि ‘चॅरिटी सेन्स’ ही संस्था यांच्यावतीने दिला जाणारा ‘जॉन मॅडॉक्स’ पुरस्कार जाहीर झाला आहे. ३८ देशांतील २०६ नामांकनांतून सहार्यो यांची निवड करण्यात आली.
इंडोनेशियातील पीटलँडमध्ये एक हजार हेक्टरचे जंगल तोडून तेथे पामच्या झाडांची लागवड पाम तेल कंपन्यांनी केली. त्याविरोधात सहार्यो यांनी आवाज उठवला. या प्रमादाबद्दल त्यांच्यावर धनाढय़ कंपन्यांनी दावा दाखल केला. तो फेटाळण्यात आल्याने कायदेशीर पातळीवर तरी त्यांची सुटका झाली. सहार्यो यांनी वणव्यांचे मार्ग व स्रोत यांवर बरेच संशोधन केले आहे. एकूण ५०० खटल्यांत तज्ज्ञ म्हणून त्यांनी साक्ष दिली आहे. वणव्यांमुळे होणाऱ्या आरोग्य व पर्यावरणाच्या हानीबाबत त्यांनी वैज्ञानिक विवेचन केले आहे. अनेक दाव्यांत केवळ तज्ज्ञांच्या साक्षीअभावी पर्यावरणाचे मारेकरी सहीसलामत सुटतात; पण सहार्यो यांनी मात्र पर्यावरणाशी शत्रुत्व असलेल्या अनेकांना शिक्षा घडवण्यात मोठी भूमिका पार पाडली आहे. इंडोनेशियातील वणवे नैसर्गिक नाहीत, तर पाम तेल कंपन्यांची ती कारस्थाने आहेत, हे कटुसत्य त्यांनी जगासमोर आणले. इंडोनेशियात लावण्यात येणाऱ्या या आगींमुळे मलेशिया व सिंगापूरसारख्या देशांतही प्रदूषणयुक्त काळे धुके येते, ही वस्तुस्थिती सहार्यो यांनी समोर आणली.
याशिवाय अशा आगींतून मोठय़ा प्रमाणात कार्बन डायऑक्साइड हवेत सोडला जातो. ५ सप्टेंबरला अशाच लावण्यात आलेल्या आगीतून १४ मेगाटन कार्बन वातावरणात सोडला गेल्याचे पुरावे उपग्रहांनी दिले आहेत. अशा प्रकारांमुळे एक कोटी मुलांचे भवितव्य धोक्यात येते, असे ‘युनिसेफ’चे म्हणणे आहे. त्यामुळे नैसर्गिक झाडे जाळून पाम, रबर व पल्पवूडची लागवड करणाऱ्या अनेक कंपन्यांना जेरीस आणणाऱ्या सहार्यो यांचे काम खरोखर भावी पिढय़ांना उज्ज्वल भवितव्य देणारे आहे यात शंका नाही!