जागतिक संगीताच्या क्षेत्रात निर्माण होणाऱ्या वादळांचा, बदलांचा परिणाम त्वरेने समजावून घेत, ते आपल्या संगीतात समाविष्ट करणारे संगीत अशी भारतीय चित्रपटातील संगीताची ओळख आहे. आलोकेश ऊर्फ बप्पी लाहिरी हे त्याचे मूर्तिमंत उदाहरण. त्यांनी हिंदूी चित्रसृष्टीत आणलेले डिस्को संगीताचे वारे कमालीचे लोकप्रिय झाले. ‘डिस्को किंग’ ही त्यांची त्यामुळेच झालेली ओळख. ९० हिंदूी आणि ४० अन्य भाषांमधील चित्रपटांना त्यांनी संगीत दिले.  ८० आणि ९०चे दशक त्यांनी आपल्या मुठीत ठेवले. तत्कालीन सर्वात लोकप्रिय संगीतकार अशी त्यांची ओळख निर्माण झाली. त्याचा परिणाम एवढाच झाला, की त्यांना श्रेष्ठ संगीतकार म्हणून मान्यता मिळाली नाही. तरीही त्यांनी संगीतबद्ध केलेली काही गीते इतकी सुंदर आणि वेगळी वठली, की ती त्यांचीच आहेत, यावर सहज विश्वास बसू नये. ‘वारदात’, ‘डिस्को डान्सर’, ‘नमक हलाल’, ‘शराबी’, ‘अपने पराये’, ‘सैलाब’ अशा काही मोजक्या चित्रपटांमधील त्यांची गीते, त्यांची सांगीतिक कारकीर्द उजळून टाकणारी. चित्रपटसृष्टीतील अफाट वेगाशी जुळवून घेणारे कलावंत फार थोडे. बप्पीदा त्यापैकी एक. त्या काळात त्यांनी संगीताचा कारखानाच काढला असावा, अशी दबक्या सुरातील चर्चा ऐकायला मिळत असे. त्याकडे दुर्लक्ष करीत बप्पी यांनी आपले काम सुरूच ठेवले. अंगभर दागिने घालण्याची हौस, ही त्यांची संगीतबाह्य ओळख. गायक म्हणूनही त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली. गायक होण्यासाठीचा हृदयस्थ स्वर नसतानाही, आपल्या वेगळय़ा शैलीने बप्पीदांनी अनेक गीते गाऊन लोकप्रिय केली. ‘सिंथेसाइज्ड डिस्को म्युझिक’ भारतात लोकप्रिय करण्यात त्यांचा वाटा मोठा. बंगाली चित्रपटसृष्टीत ‘अमर संगी’, ‘आशा ओ भालोबाशा’, ‘अमर तुमी’, ‘अमर प्रेम’ या चित्रपटांतील त्यांच्या गीतांनी त्यांना कमालीची लोकप्रियता मिळाली. त्याच्याच जोरावर २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत प. बंगालमधील श्रीरामपूर या मतदारसंघातून त्यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूकही लढवली. त्यात ते पराभूत झाले. बप्पीदा मूळचे बंगाली. त्यांचे आई-वडील अभिजात संगीत आणि श्यामा संगीतातील प्रसिद्ध कलावंत होते. प्रसिद्ध पार्श्वगायक किशोरकुमार हे त्यांचे नातेवाईक. १९७५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जख्म’ या चित्रपटाने बप्पींना लोकप्रियता मिळाली. किशोरकुमार आणि महंमद रफी या दोघांनी एकत्र गायलेले गीत त्यांनी स्वरबद्ध केले. त्यानंतरच्या ‘चलते चलते’ या चित्रपटातील सगळी गीते लोकप्रिय झाली आणि त्यानंतर बप्पी लाहिरी यांनी मागे वळून पाहिलेच नाही. नव्या ढंगाची, नव्या शैलीची गीते स्वरबद्ध करणारा संगीतकार म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली, तरी ‘किसी नजर को तेरा इंतजार आज भी है’ ही त्यांनी संगीत दिलेली गजल, त्यांच्या अभिजाततेची खरी ओळख ठरली. १९८३ ते ८५ या दोन वर्षांत त्यांनी संगीतबद्ध केलेल्या १२ चित्रपटांनी चित्रगृहांमध्ये रौप्य महोत्सव साजरे केले. १९८६ मध्ये ३३ चित्रपटांसाठी १८० गीते स्वरबद्ध करण्याचा त्यांचा विक्रम गिनीज बुक ऑफ वल्र्ड रेकॉर्डसमध्ये नोंदला गेला. विक्रमी आणि लोकप्रिय संगीतकार ही ओळख असलेल्या बप्पी यांची किती तरी गीते आजही श्रोत्यांच्या मनात रुंजी घालतात. ‘अपने पराये’ या चित्रपटातील लता मंगेशकर यांनी गायलेले ‘हलके हलके आयी चलके’, आणि ‘श्याम रंग रंगा रे’ ‘शराबी’ चित्रपटातील ‘लोग कहते हैं मैं शराबी हूँ’ यासारखी काही गीते बप्पीदांची वेगळी ओळख करून देणारी आहेत. हिंदूी चित्रपट संगीतात नवा प्रवाह निर्माण करून तो लोकप्रिय करण्याचे श्रेय बप्पीदांना द्यायला हवे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा