‘या देशाच्या बायांना, आयाबहिणींना सांगाया जायाचं हाय गं। एकी करून आणि लढा पुकारून ह्यो तुरुंग फोडायचा हाय गं॥’ अशा गीतांनी महाराष्ट्रात स्त्रीवादी चळवळ रुजवली. त्याआधी फुले यांच्यापासूनच ‘स्त्रीशूद्रांच्या’ उन्नतीचे भान महाराष्ट्राला आले. अमेरिकेत मात्र स्त्री चळवळ व १९६४ पर्यंत मतदानाचा सार्वत्रिक अधिकारही न मिळालेल्या आफ्रिकन-अमेरिकनांची चळवळ हे दोन्ही जणू निरनिराळे प्रवाह राहिले. त्यामागचा अंत:प्रवाह एकच आहे-असायला हवा-हे सांगण्याचे काम ज्यांनी केले त्यांपैकी महत्त्वाच्या लेखिका म्हणजे बेल हूक्स. कृष्णवर्णीय स्त्रिया, पुरुषी दृष्टिकोन, चळवळींतले प्रश्न, समतावादी शिक्षणमूल्ये अशा विविधांगी विषयांवरली ३८ हून अधिक पुस्तके लिहिणाऱ्या बेल हूक्स (खरे नाव ग्लोरिया जीन वॅट्किन्स) १५ डिसेंबर रोजी निवर्तल्या. अमेरिकेत १९७१ मध्ये गौरवर्णीय स्त्रियाच स्त्रीवादी चळवळीत दिसत असताना, वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी आपल्या आजीचे नाव टोपणनाव म्हणून वापरणाऱ्या या लेखिकेने ‘आयन्ट आय अ वुमन’ (मी बाई नाही व्हय?) हे पुस्तक लिहिले. दहा वर्षांनंतर (१९८१) ते प्रकाशित झाले. आफ्रिकन-अमेरिकन स्त्रियांवर वंशभेद आणि लिंगभेद असा दुहेरी अन्याय होत असतो, हे जोरकसपणे मांडून न थांबता तेव्हाच्या चळवळीने कृष्णवर्णीय स्त्रियांकडे कसे पाहिले पाहिजे हे त्या सांगत राहिल्या, त्यातून आणखी पुस्तके लिहिली गेली. आसपासचे जग डोळसपणे पाहा, संस्कृतीच्या घडत्या रूपांची समीक्षा करा, त्यातून वैचारिक ऊर्जा मिळवा, असे त्यांचे सांगणे. आफ्रिकन-अमेरिकन कवयित्री ग्वेन्डोलिन ब्रूक्स यांच्या एका कवितेआधारे बेल हूक्स यांनी ‘निग्रो’ म्हणून हिणवल्या जाणाऱ्या पुरुषांनाही तारुण्यातला ताठा कसा व्यक्त करावासा वाटतो, त्यामागल्या प्रेरणा काय असतात, हे ‘वी रिअल कूल’ या पुस्तकात आस्थेने अभ्यासले! पण या समाजावर होणाऱ्या सततच्या हल्ल्यांबद्दलही त्यांनी वेळोवेळी २३ लेख लिहिले; ते ‘किलिंग रेज’मध्ये ग्रथित झाले. प्रेमाची-प्रेमी युगुलांची भाषा, आणाभाका, संशय, भांडणे आणि ताटातूट या अगदी खासगी अनुभवांचे सामाजिक, मानसिक आणि तात्त्विक आयाम त्यांनी ‘ऑल अबाउट लव्ह’ आणि ‘साल्व्हेशन’ या दोन पुस्तकांतून शोधले. ‘प्रेमानेच जग जिंका’ असा संदेशबिंदेश तर ओप्रा विन्फ्रेसुद्धा देतात; पण बेल हूक्सचे लिखाण त्यापेक्षा निराळे… ते अशा संदेशांना वास्तवात आणण्यामागील अडथळे, खाचखळगे यांचाही शोध घेते आणि तसे करताना कोठेही नकारात्मक, निराशवादी सूर बेल हूक्स लावत नाहीत.
टीकाकारांनी त्यांचे लिखाण ‘फारच व्यक्तिगत स्वरूपाचे’ असल्याबद्दल नापसंती व्यक्त केली आहे. पण ‘पर्सनल इज पॉलिटिकल’ हा स्त्रीवादी चळवळीचा नाराच बेल हूक्स यांनी पुढे नेऊन व्यक्तिगत ते केवळ राजकीयच ठरते असे नाही, तर हे व्यक्तिगत अनुभवच समाजाविषयीचे तत्त्वचिंतन समृद्ध करतात, हेही दाखवून दिले. ‘टीचिंग कम्युनिटी’ आणि ‘टीचिंग टु ट्रान्सग्रेस’ ही त्यांची दोन पुस्तके, अमेरिकी शिक्षकांना मार्गदर्शन करणारी आहेत. बेल हूक्स यांचे उच्चशिक्षण इंग्रजी साहित्य विषयाचे होते, हे लक्षात घेतल्यास भाषा आणि जीवनाचा घट्ट संबंध उमगतो!