भारतीय शालेय शिक्षण व्यवस्थेत सर्वच उत्तम सुरू असल्याच्या किंवा अत्यंत दयनीय अवस्था असल्याच्या अशा टोकाच्या आभासातून व्यवस्थेला बाहेर काढून वास्तवाकडे नेण्याचे काम प्रथम फाऊंडेशन गेले जवळपास दशकभर करत आहे. शालेय शैक्षणिक स्थितीचा वेध घेणाऱ्या ‘असर’ या सर्वेक्षणाने अनेक भ्रम मोडीत काढले. शिक्षण व्यवस्थेला दिशा देऊ पाहणाऱ्या या सर्वेक्षणाचे नेतृत्व केले डॉ. रुक्मिणी बॅनर्जी यांनी. शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी त्यांना नुकताच मानाचा असा ‘यिदान’ हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
बॅनर्जी या सध्या प्रथम फाऊंडेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. प्राथमिक शिक्षणाच्या स्थितीबाबत चर्चाच होत असताना त्याला प्रत्यक्ष पाहणी आणि आनुषंगिक आकडेवारीची जोड देऊन प्रकाशित झालेल्या पहिल्या अहवालाने देशाला शब्दश: हादरवले होते. शाळा, प्रशिक्षणे, अभियाने, प्रयोग सर्व सुरू असताना पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या भाषिक आणि गणिती कौशल्यांची खालावलेली स्थिती असरने समोर आणली. देशभरात २००५ पासून दरवर्षी होणारे हे सर्वेक्षण आता आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचले आहे. त्यामागे बॅनर्जी यांच्या शिक्षणविषयक विचार, नियोजन आणि संवादकौशल्याचा वाटा मोठा आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली दहा वर्षे असरचे सर्वेक्षण करण्यात आले. शिक्षणावर अनेक आंतरराष्ट्रीय स्तरावरील शोधनिबंध लिहिणाऱ्या, प्रथमसारख्या नामांकित संस्थेच्या उच्चपदस्थ असलेल्या बॅनर्जी अगदी गावपातळीवर जाऊन विद्यार्थ्यांमध्ये सहज मिसळून काम करतात. मुंबईतील झोपडपट्ट्या, पुण्याजवळील वस्त्या, बिहारसह अनेक राज्यांतील दुर्गम भागांत त्यांनी शैक्षणिक प्रसाराबरोबरच गुणवत्तावाढीसाठी काम केले आहे. संशोधन आणि प्रत्यक्ष काम याची दुर्मीळ सांगड बॅनर्जी यांच्या कामात दिसते. हाती आलेले निष्कर्ष सार्वत्रिक करून मोकळे न होता समोर आलेल्या समस्येवर तोडगा काढण्याचे, परिस्थिती सुधारण्याचे काम त्यांनी प्रथमच्या माध्यमातून केले.
डॉ. बॅनर्जी या मूळच्या बिहार येथील, अर्थशास्त्रातील पदवीधर. ऑक्सफर्ड विद्यापीठाची ºहोड्स शिष्यवृत्ती त्यांना मिळाली आहे. शिकागो विद्यापीठातून पीएच.डी. केल्यानंतर शिकागो येथील स्पेन्सर्स फाऊंडेशनच्या माध्यमातून त्यांनी काम सुरू केले. जवळपास १३ वर्षे परदेशात संशोधन केल्यानंतर त्यांनी पुन्हा भारतात परतून काम करण्याचा निर्णय घेतला. परतल्यावर १९९६ मध्ये त्या प्रथम फाऊंडेशनशी जोडल्या गेल्या. गणित अध्यापन, अध्ययन-अध्यापन निष्पत्ती, शिक्षकांची कामगिरी या विषयांवर त्यांचे शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत. मुलांसाठी साहित्य निर्मितीतही डॉ. बॅनर्जी यांचे मोठे योगदान आहे. गोष्टींपासून ते अध्ययनपूरक साहित्यनिर्मितीही त्यांनी केली आहे.