भारतात जन्मलेल्या पहिल्या तिघा एव्हरेस्टवीरांपैकी एक  मेजर हरिपालसिंग ऊर्फ ‘एचपीएस’ अहलुवालिया! १९६५ सालच्या मे महिन्यात भारतीय लष्करातर्फे एव्हरेस्ट सर करण्यासाठी निघालेल्या मोहिमेत ते होते. शिखर सर करणाऱ्या तिसऱ्या तुकडीत त्यांचा समावेश होता. २९ मे १९६५ या दिवशी त्यांनी व फू दोर्जी यांनी जगातील या सर्वोच्च शिखरावर भारताचा झेंडा रोवला. याच तिरंग्याचा आणि त्यामागील मूल्यांचा मान राखण्यासाठी, यशस्वी मोहिमेनंतर तातडीने ते १९६५ च्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान कर्तव्यावर हजर झाले… आणि याच युद्धात, पाठीत बंदुकीची गोळी घुसल्याने जखमी झाले… ही जखम मोठी होती… आयुष्यभर जायबंदी करणारी…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मात्र हिंमत कमी पडू द्यायची नाही, हा निर्धार अहलुवालियांनी  ठाम ठेवला होता. अर्थात, त्यांचा हा गुण याआधीही दिसला होताच. मुळात एव्हरेस्टवरील ज्या मोहिमेत ते सहभागी झाले, ती भारतीय लष्कराच्या दोन अपयशी (१९६० आणि १९६२ सालच्या) मोहिमांनंतरची तिसरी.  शेर्पा तेनसिंग (तेन्झिन्ग) नोर्गे आणि एडमंड हिलरी यांच्या १९५३ मधील यशस्वी चढाईनंतर, शेर्पा तेनसिंगच्या इच्छेनुसार नेहरूकाळात उभारली गेलेल्या ‘हिमालयन माउंटेनीअरिंग इन्स्टिट्यूट’मध्ये काही महिने खडतर प्रशिक्षण घेऊन, मैदानी प्रदेश असलेल्या पंजाबातील अवतारसिंग चीमा, एचपीएस अहलुवालिया असे लष्करी तरुण एव्हरेस्टवर निघाले होते. पहिल्या तुकडीत लेफ्टनंट कर्नल चीमा आणि नवांग गोम्बू होते. दुसऱ्या तुकडीत तीन शेर्पांसह, भूगर्भशास्त्रज्ञ चंद्रप्रकाश व्होरा होते. या दोन्ही तुकड्यांना वादळी हवामानामुळे, प्राणवायू नळकांड्यांचा पुरेपूर वापर करावा लागला होता. याच वादळामुळे अहलुवालिया यांच्या तुकडीला दोन दिवस थांबावेही लागले. तोवर प्राणवायू नळकांड्यांची  कमतरता भासू लागली. मात्र शारीरिक शक्ती आणि ज्ञानाचा वापर करत, कमी प्राणवायूतही गोम्बू व अहलुवालियांनी शिखर सर केले होते!

दुखापतीनंतर मेजर अहलुवालियांना निवृत्ती घ्यावी लागली.  मात्र गिर्यारोहणाचे ज्ञान आणि आखणीचा अनुभव याचा भरपूर वापर त्यांनी तरुण गिर्यारोहकांना मार्गदर्शनासाठी केला. भारतीय गिर्यारोहण महासंघाचे ते अध्यक्षही होते. यासह त्यांनी विकलांग व्यक्तींच्या स्वबळासाठीही हरतºहेचे प्रयत्न केले. ‘इंडियन स्पायनल इन्ज्युरीज सेंटर’ या संस्थेची स्थापना त्यांनी १९९३ साली केली आणि गेली सुमारे २९ वर्षे ते या संस्थेमार्फत, पाठीच्या दुखापतीमुळे शारीरिक क्षमतांना आव्हान मिळालेल्यांसाठी कार्यरत राहिले. सामाजिक कार्यात मोठे योगदान असूनही राजकारणाकडे किंवा राजकीय लागेबांध्यांमुळे मिळणाऱ्या पदांकडे त्यांनी नेहमी दुर्लक्ष केले. अर्थात, विकलांगकल्याण क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय संस्थांमध्येही त्यांनी भारतातर्फे बाजू मांडली होती. महाराष्ट्रातील गिर्यारोहकांचे निमंत्रण सहज स्वीकारणारे, प्रतिष्ठेपेक्षा संवाद महत्त्वाचा मानणारे मेजर अहलुवालिया हे विकलांगांचा वा गिर्यारोहकांचाच नव्हे, तर जिद्द बाळगणाऱ्या साऱ्यांचा आधार होते! 

मराठीतील सर्व व्यक्तिवेध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Profile indian mountaineer h p s ahluwalia akp