‘कोसला’मधल्या पांडुरंग सांगवीकरपासून ते आजच्या फर्गसनच्या तमाम विद्यार्थ्यांपर्यंत सगळ्यांचे हक्काचे आणि प्रेमाचे ठिकाण म्हणजे हॉटेल वैशाली. खरे महाविद्यालय येथेच भरते. वाफाळलेल्या कॉफीच्या बरोबर तिथे गप्पा रंगतात, प्रेम जुळते, वाद झडतात… या सगळ्याच्या जोडीला गेली काही दशके पदार्थांची बदललेली चव. प्रत्येक पिढीला ही चव पुढच्या पिढीला सोपवण्याची ही सवय जगन्नाथ शेट्टी यांनी लावली. तशी पुण्यात हॉटेलांची- त्यातही उडुपींची- कमतरता नाही. या शहरातील खाद्यसेवनाबद्दल बाहेरून येणाऱ्या कुणालाही आश्चर्य वाटावे, एवढी हॉटेलांची संख्या. घरी कुणी स्वयंपाक करत असेल की नाही, अशी शंका येण्याएवढी त्या सगळ्या हॉटेलांमध्ये गर्दी. हॉटेल ही चैन असते, असे समजण्याच्या काळातही प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या फर्गसन महाविद्यालयातील मुलांसाठी त्यावेळचे मद्रास कॅफे म्हणजेच आताचे वैशाली हे माहेरघरच वाटत असे. दिवसभर पडीक राहून, येणाऱ्या-जाणाऱ्या मित्रांचा अड्डा जमवता येण्याची ही हक्काची जागा. इथले वेटर अन्नपदार्थ देण्याबरोबरच मित्रांचे निरोपही देत. नाटक, चित्रपट, संगीत क्षेत्रातील कलावंतांपासून ते सर्व पक्षांच्या नेत्यांपर्यंत; प्रत्येक विषयावर हिरिरीने चर्चा करण्याची खुमखुमी असलेल्या विद्वानांपासून कुटुंबवत्सल पुणेकरांपर्यंत सारेजण तिथे अतिशय गुण्यार्गोंवदाने असतात. कारण या प्रत्येकाला तिथल्या सांबाराचा नुसता घमघमाटही घायाळ करतो. जगन्नाथ शेट्टी यांची ही करामत. त्या खाद्यांबरोबरच तिथे जमणाऱ्या कट्ट्यावर ‘कट्टा’ हे वाचकप्रिय ठरलेले अनियतकालिकही याच ठिकाणाहून प्रसिद्ध होत राहिले. वैशाली, रुपाली आणि आम्रपाली ही एकाच रस्त्यावरील त्यांची तीन हॉटेले. खरे तर सांस्कृतिक केंद्रेच. दर्जातही कधी न घसरणारी, चवसातत्य टिकवणारी आणि मैत्रीची शाल पांघरणारी ही तीन हॉटेल्स. त्यांची बरोबरी पुण्यात शेकड्यांनी असलेल्या अन्यांना करता आली नाही. त्यामागे जगन्नाथ शेट्टी यांचे कष्ट कारणीभूत आहेत. एरवी क्वचित आवडणाऱ्या पडवळ नावाच्या भाजीला शेट्टींनी त्यांच्या सांबारात मोलाचे स्थान दिले. घरात पडवळ पाहिल्यावर नाके मुरडणारे सगळे जण वैशालीत मात्र त्याची प्रशंसा करतात. दक्षिणेकडील सांबाराची चव वैशालीसारखी नसते, असे सांगण्याएवढा उद्धटपणा पुणेकरांमध्ये आला, तो शेट्टींच्या कर्तृत्त्वामुळे. पाहुण्यांना पुण्यात तुळशीबाग आणि वैशाली-रुपाली ही दोनच ठिकाणे दाखवण्यासारखी असल्याचा विश्वास हे पुणेकराचे व्यवच्छेदक लक्षण. ज्याने या हॉटेलांना भेटच दिली नाही, ते कर्मदरिद्री अशी अपराधी भावना निर्माण करणाऱ्या जगन्नाथ शेट्टी यांचे निधन ही म्हणूनच अतिशय दु:खद घटना.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा