विसाव्या शतकातली महत्त्वाची कवयित्री मानली गेलेली सिल्व्हिया प्लाथ हिनं लेखनक्षेत्रात नोकरी करायची ठरवली, तेव्हा तिला फॅशनविषयक नियतकालिकात काम करावं लागलं होतं . कारण काय, तर स्त्रीच आहे, शैलीदार लिहिते, म्हणून फॅशनबिशन, सेलेब्रिटी, त्यांच्या मुलाखती, अशा फार सामाजिक वादळं न उठवणाऱ्या विषयांवर लिहिणं ठीक! हेच सारं, जोन डिडिऑन हिच्याही वाट्याला आलं. तिलाही नेमक्या याच गुणांमुळे फॅशन नियतकालिकातच उमेदवारी करावी लागली. सिल्व्हिया प्लाथनं या असल्या लिखाणाच नाद सोडला आणि शैली कशी धारदार असू शकते हे कवितांमधून सिद्ध केलं. तर तिच्या नंतरची जोन डिडिऑन कविता करू लागली होती, कादंबऱ्याही लिहू लागली होती, पण याहीपेक्षा नियतकालिकांमधून लिहिणं हे जोन डिडिऑनचं बलस्थान होतं!
ही जोन डिडिऑन निवर्तल्याची बातमी २३ डिसेंबरला आली. न्यूयॉर्कर या साप्ताहिकाची जणू चिरतरुण लेखिका, म्हणून जोन डिडिऑन नेहमीच ‘अगंतुगं’ सारख्या एकेरी संबोधनानंच ओळखली गेली… अगदी वयाच्या ८७ व्या वर्षीपर्यंत! न्यू यॉर्क शहराचं नाव लावणाऱ्या त्या नियतकालिकात, जोन डिडियन पार दुसऱ्या टोकाच्या किनाऱ्यावरून- म्हणजे सान फ्रान्सिस्को किंवा अन्य कुठल्या कॅलिफोर्नियन शहरातून, कॅलिफोर्नियाबद्दल किंवा हॉलीवुडबद्दल लिहीत असत. त्यातही, या किनाऱ्यावरली त्यांची कारकीर्द सुरू झाली हॉलीवुडपासून, पण नंतर सामाजिक आशयाचं लेखन करताना त्या गांभीर्याच्या परिघात जोन यांनी हॉलीवुडलाही आणलं. तिथल्या तारे, तारकांबद्दल उत्कट माणुसकीनं लिहिलं आणि लेखक हे समाजाच्या सुखदु:खांचे समीक्षक असतात, अशा विश्वासातून साऱ्यांकडे पाहिलं. दिवंगत लेखक अर्नेस्ट हेमिंग्वे हे त्यांचे प्रेरणास्थान. त्यांच्या ‘फेअरवेल टु आर्म्स’ वर उत्तम समीक्षालेखही जोन यांनी लिहिला होता.
जोन डिडिऑन यांच्या नावावर पाच कादंबऱ्याही आहेत आणि पटकथा तर भरपूर आहेत. अनेक चित्रपटांसाठी त्या सहलेखन करीत. मात्र लेखिका म्हणून त्यांना काहीएक मान्यता लाभली ती दीर्घलेख अथवा निबंधलेखिका म्हणूनच. त्यांचा पहिला निबंधसंग्रह वयाच्या तिशीत, १९६८ साली प्रकाशित झाला होता. अवतीभोवतीच्या निरीक्षणांपासून, समाजामधले न्यून आणि दुखऱ्या जागा नेमक्या दाखवून देत आणि त्याची कालिकता, वैश्विकता यांचा समाचार घेत हे निबंध पुढे जात. पती जॉन ग्रेगरी ड्यून यांच्या निधनानंतरचे वर्ष (२००३-०४) हे जोन यांनी एकाकीपणा आणि सामाजिकता यांचा थांग लावत व्यतीत केले. त्यावर आधारित त्यांचे ‘द इयर ऑफ मॅजिकल थिंकिंग ’ (२००५) हे पुस्तक पुलित्झर पारितोषिक विजेते ठरले. कादंबरीकार वा समीक्षक म्हणून त्यांनी नाव कमावले नाही हे खरे, परंतु शैलीकार म्हणून त्यांची ओळख नेहमीच कायम राहील.