२६ नोव्हेंबर २००८ च्या रात्री लीना नायर झोपू शकल्या नव्हत्या… मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचे एक लक्ष्य असलेल्या ताजमहाल हॉटेलमध्ये त्या आणि त्यांचे पती कुमार नायर, दोघेही ‘युनिलीव्हर’ कंपनीच्या भारतातील उच्चपदस्थांनी दिलेल्या निमंत्रणावरून मेजवानीसाठी आले होते. पहाटे कधीतरी, अग्निशमन दलाने एक शिडी आणली आणि या मेजवानीतल्या ६०-६५ पाहुण्यांची सुटका झाली; पण त्या प्रसंगाचे वर्णन करतानाही लीना नायर आवर्जून सांगतात ते या मेजवानीचे यजमानीणपद भूषवणाऱ्या मलिका जागड हिच्या धैर्याबद्दल! ‘आधी पाहुण्यांना, मग कर्मचाऱ्यांना खाली पाठवून सर्वांत शेवटी मी इथून निघेन असे तिने ठरवले आणि तसेच केले’- हा उल्लेख करणाऱ्या लीना नायर, ‘जाल तिथे फरक पाडणारे काम करा. त्यासाठी इतरांना प्रेरित करा, नेतृत्व करा’ हा केवळ ‘सेल्फ हेल्प मंत्रा’ न मानता तशा जगतात- तसे वागणाऱ्या इतरांचेही कौतुक करतात, याचे हे एक उदाहरण.
‘शानेल’ या सुगंध आणि फॅशन नाममुद्रेवर आता लीना नायर यांच्या नेतृत्वप्रधान कार्यशैलीची मुद्रा उमटणार आहे. १९०९ पासून सुरू असलेल्या आणि १९२१ साली पहिला सुगंध बनवणाऱ्या या १५ अब्ज डॉलरच्या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारीपद त्या सांभाळतील. कोल्हापूरच्या असल्याबद्दल, सांगलीच्या वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयात इलेक्ट्रॉनिक अभियांत्रिकी शिकल्याबद्दल लीना यांचे पर्याप्त कौतुक झालेले आहेच. जमशेदपूरच्या ‘झेवियर लेबर रिलेशन्स इन्स्टिट्यूट’ (एक्सएलआरआय) मधून त्यांनी व्यवस्थापन अभ्यासक्रम पूर्ण केल्यामुळे तिथेही ‘आमच्या माजी विद्यार्थिनी’ म्हणून त्यांचे कौतुक आहे. परंतु विश्वनागरिकत्वाचे भान लीना नायर यांच्या व्यक्तिमत्त्वातून दिसते. गेले सुमारे दीड दशक जगभरच्या विविध शहरांना कामानिमित्त भेटी देताना, कंपनी एक- उत्पादनेही जगभर सारख्याच नावांची- पण प्रत्येक देशा/ प्रदेशाची संस्कृती आणि मागणी वेगळी, हेही त्यांना उमगले. करोनाकाळात ‘युनिलीव्हर’च्या मनुष्यबळ विभागप्रमुख असताना ही बहुराष्ट्रीय कंपनी सर्वत्र नित्याप्रमाणे सुरू राहील अशी कामगिरी लीना यांनी केली, तेव्हाचे अनुभव सांगताना ‘जपानी कर्मचाऱ्यांना घरून काम करण्यात तांत्रिक प्रश्न काहीही नव्हता- साधने होती, जोडण्याही होत्या- फक्त, ‘आमची घरे लहान आकाराची, त्यामुळे आम्हाला नाही जमत’ असे त्यांचे म्हणणे होते’ हेही त्या नमूद करतात! ‘महत्त्वाकांक्षी व्हा- स्वत:चे मोल जाणा’ असे सांगणाऱ्याने इतरांना समजून घेण्यात कमी पडायचे नसते, याचे उदाहरण त्या स्वत: घालून देतात.