नॉर्वेचा मॅग्नस कार्लसन हा काही महिन्यांपूर्वीपर्यंत बुद्धिबळातील पारंपरिक, जलद आणि अतिजलद अशा तिन्ही प्रकारांमध्ये जगज्जेता होता. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात त्याने पारंपरिक जगज्जेतेपद राखले, तरी जलद व अतिजलद प्रकारांमध्ये त्याला ते राखता आले नव्हते. तरीही या तिन्ही प्रकारांमध्ये तो आज जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे. शिवाय कोणत्याही स्पर्धेत कार्लसन विजयाच्याच ईर्षेने उतरतो. त्यामुळेच भारताच्या षोडशवर्षीय आर. प्रज्ञानंदने त्याला मध्यंतरी एका स्पर्धेत हरवले, तेव्हा त्या विजयाची दखल रशिया ते अमेरिका अशा विशाल बुद्धिबळविश्वात आणि त्यापलीकडेही घेतली गेली. कार्लसनला हरवणारे भारतीय बुद्धिबळपटू तोवर दोघेच होते – विश्वनाथन आनंद आणि पेंटाल्या हरिकृष्ण. आणखी एकदोन भारतीय बुद्धिबळपटूंनी त्याला हरवल्याच्या नोंदी आहेत, पण त्या प्राधान्याने करोनाकालीन लहानसहान स्पर्धा होत्या. एअरिथग्ज मास्टर्स ही स्पर्धा मात्र तशी नव्हती. त्यात केवळ निमंत्रित आणि अव्वल मानांकित बुद्धिबळपटूच सहभागी झालेले होते. प्रज्ञानंदने कार्लसनला त्या स्पर्धेत हरवले, त्या स्पर्धेत कार्लसन अंतिम फेरीपर्यंत पोहोचला आणि हा लेख लिहिला जाईपर्यंत अंतिम सामना सुरू झालेला नव्हता. पण आपल्या दृष्टीने या तपशिलाला महत्त्व नाही. प्रज्ञानंदला त्या स्पर्धेत बाद फेरी गाठता आली नाही, तरी ज्या प्रकारे त्याने कार्लसनला हरवले ते उल्लेखनीय होते. कार्लसनविरुद्ध प्रज्ञानंदकडे काळी मोहरी होती. सहसा या खेळात पांढरी मोहरी घेऊन खेळणाऱ्याची बाजू थोडी वरचढ असते, कारण डावाची सुरुवात तो करतो. परंतु कार्लसनविरुद्ध प्रज्ञानंदने एक प्यादे गमावूनही चिकाटीने प्रतिकार केला. प्रज्ञानंदने कार्लसनच्या राजाविरुद्ध मोर्चेबांधणी केली. कार्लसनने आणखी एक प्यादे जिंकले, परंतु तोपर्यंत प्रज्ञानंदच्या वजीर, घोडा आणि उंटाने कार्लसनच्या राजाला खिंडीत गाठले. या वेढय़ातून बाहेर पडण्याच्या प्रयत्नांत कार्लसनचा घोडा एकाकी पडला आणि अडकला. तो गमावण्याच्या आधीच ४० व्या चालीला कार्लसनने पराभव मान्य केला. पारंपरिक, जलद वा अतिजलद अशा कोणत्याही प्रकारात जगज्जेत्या कार्लसनला हरवण्याची प्रज्ञानंदची ही पहिलीच वेळ. या डावाकडे पाहून अनेकांना प्रज्ञानंदच्या शैलीचे कौतुक वाटले. प्रज्ञानंद वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी आंतरराष्ट्रीय मास्टर बनला, हा जागतिक विक्रम. १२ वर्षे पूर्ण केल्यावर काही महिन्यांत तो ग्रँडमास्टर बनला हा दुसरा विक्रम. आता त्याचा प्रयत्न स्थिरावण्याचा नव्हे, तर भरारी घेण्याचा आहे. त्याचा सध्याचा खेळ युवा वयातील विश्वनाथन आनंदच्या खेळाची आठवण करून देतो. आनंदही त्या वयात भल्याभल्या बुद्धिबळपटूंना हरवत होता. समोरच्याचा आब आणि क्षमता पाहून खेळावे वगैरे पथ्ये आनंदने कधी पाळली नाहीत. प्रज्ञानंदला गेले काही महिने आनंदच्या मार्गदर्शनाचा लाभ मिळाला, तो प्रभाव त्याच्या खेळात दिसून येतो आहेच. कार्लसनला हरवल्याबद्दल त्याचे कौतुक होत असले, तरी त्याच्या दृष्टीने ही निव्वळ एक स्पर्धा आहे. त्याच्या वाटचालीत प्रज्ञानंद कोणाचीच पत्रास ठेवत नाही इतकाच याचा अर्थ. आनंदच्या पावलावर पाऊल ठेवून तोही जगज्जेता बनू शकतो, तो या बेफिकीर ऊर्मीच्या जोरावरच. ही ऊर्मी १६ वर्षांचा असतानाही त्याच्या ठायी असावी हे मात्र आपले भाग्य!
आर. प्रज्ञानंद
कार्लसन अंतिम फेरीपर्यंत पोहोचला आणि हा लेख लिहिला जाईपर्यंत अंतिम सामना सुरू झालेला नव्हता.
Written by लोकसत्ता टीम
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 26-02-2022 at 00:11 IST
मराठीतील सर्व व्यक्तिवेध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Profile magnus carlsen norway chess in the world of chess r pragyananda akp