‘आत्मनिर्भरते’च्या या काळात स्वदेशी बनावटीच्या ‘तेजस’ लढाऊ विमानांची निर्मिती महत्त्वाचीच. नुकतीच या विमानातून क्षेपणास्त्रांची यशस्वी चाचणीही करण्यात आली. ‘तेजस’ विकसित करण्यात वैज्ञानिक मानस बिहारी वर्मा यांचा मोठा वाटा होता. १९८६ साली माजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी त्यांना ‘तेजस’ विमाने तयार करण्याच्या प्रकल्पाचे संचालकपद दिले होते, ते त्यांनी सार्थ ठरवले. बिहारसारख्या मागास राज्यातून आलेल्या वर्मा यांनी भारताच्या संरक्षण प्रगतीत लावलेला हातभार मोलाचा होता. या हलक्या लढाऊ विमानांची रचना करताना वायुगतिकीचे सखोल ज्ञान असणे गरजेचे होते, जे त्यांनी या प्रकल्पात वापरले. वर्मा यांची संरक्षण उत्पादन क्षेत्रातील प्रदीर्घ कारकीर्द तब्बल ३५ वर्षांची होती. शस्त्र एकात्मीकरण, बहुआयामी रडार यांसह अनेक सुविधा तेजस विमानामध्ये मौजूद आहेत. बेंगळुरू येथे संरक्षण संशोधन व विकास संस्थेत त्यांनी काम केले. निवृत्तीनंतरही त्यांच्यातील वैज्ञानिक गप्प बसणे शक्य नव्हते. त्यांनी त्यांच्या ज्ञानाचा वापर ग्रामीण भागात केला. २०१८ मध्ये त्यांना पद्माश्रीने गौरविण्यात आले ते या वैविध्यपूर्ण कामगिरीसाठीच! वैज्ञानिक ही त्यांची प्रथम ओळख असली तरीही त्यांची समाजाशी नाळ कायम जुळलेली होती. २९ जुलै १९४३ रोजी बिहारमधील दरभंगा जिल्ह्यातील घनश्यामपूर भागातील बाऊर या छोट्याशा गावात जन्मलेल्या वर्मा यांची गाव ते राष्ट्रीय पातळीवरची भरारी नेत्रदीपक अशीच होती. वर्मा हे बिहार अभियांत्रिकी महाविद्यालय- म्हणजेच सध्या पाटण्यात असलेल्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेतून पदवीधर झाले. त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात ‘एरोनॉटिकल डेव्हलपमेंट  एजन्सी’ या संस्थेतून झाली. बेंगळुरूतील या संस्थेत ते २००२ पर्यंत  कार्यरत होते. त्याचवेळी भारताच्या अणुकार्यक्रमात मोठी कामगिरी पार पाडणारे ए. पी. जे अब्दुल कलाम यांच्याबरोबर काम करण्याची संधी त्यांना मिळाली. या संस्थेतून निवृत्त झाल्यानंतर ते दरभंगा येथील त्यांच्या मूळ गावी परतले आणि तेथे लोकांमधील साक्षरता वाढविण्याचे काम त्यांनी सुरू केले. त्यासाठी त्यांनी ‘विकसित भारत फाउंडेशन’ या संस्थेस प्रोत्साहन दिले.  ही संस्था अब्दुल कलाम यांनीच ९० च्या दशकात मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी स्थापन केली होती. विशेषकरून या संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागात फिरत्या विज्ञान प्रयोगशाळा सुरू करण्यात आल्या. कलाम यांनी बिहारचे तत्कालीन मुख्यमंत्री नितीशकुमार यांना वर्मा यांच्या अनुभवाचा फायदा बिहारच्या विकासासाठी करून घेण्याचा सल्ला त्या वेळी दिला होता. या वैज्ञानिकाचे निधन म्हणजे संरक्षण तसेच समाजसेवेच्या क्षेत्राची एक प्रकारे हानीच होय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व व्यक्तिवेध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Profile manas bihari verma akp