भारतात रंगीत ‘दूरदर्शन’ प्रक्षेपण १९८२ मध्येच सुरू झाले असले तरी महाराष्ट्रात घरोघरी रंगीत चित्रवाणी संच दिसू लागले ते १९९० सालच्या आसपास. मग, अगदी थोड्याथोडक्या घरांमध्ये ‘व्हिडीओ गेम संच’ दिसू लागले. त्यावर ‘मारिओ’सारखे खेळ खेळणे सानथोरांना आवडू लागले. चित्रवाणी संचाला ‘एनईएस’ ही अक्षरे छापलेला खोका जोडून, त्याच्या खोबणीत सहा-सहा खेळांचे ‘काट्र्रिज’ बसवणे, मग वायरची शेपूट असलेला आणि दुचाकीचे चित्र काढून खोडल्यासारख्या आकाराचा ‘कन्सोल’ त्यास जोडणे, हे सोपस्कार एकदा झाले, की पुढले सहा-सात तास मजेत जात! हा सारा आनंद अशा प्रकारे मिळवता येईल याची कल्पना करून ज्यांनी १९८३ सालीच ती प्रत्यक्षात आणली, ते जपानी इलेक्ट्रॉनिक अभियंता मसायुकी उइमेरा यांचे अलीकडेच (६ डिसेंबर) निधन झाल्याची माहिती तीन दिवसांपूर्वी जगाला समजली.

मसायुकी हे निन्टेन्डो एंटरटेन्मेंट सिस्टीम्स ऊर्फ ‘एनईएस’ या कंपनीत १९७१ पासून होते. १९८०चे दशक उजाडताना कंपनीचे मालक हिरोषी यामाउची यांनी, चित्रवाणी संचाच्या पडद्यावर हवे ते खेळ खेळता यावेत यासाठी यंत्रणा बनवण्याची जबाबदारी मसायुकी यांना सोपवली, त्यातून ‘गेम कन्सोल’ तयार झाला! अशा प्रकारचे इलेक्ट्रॉनिक खेळ ऑडिओ कॅसेटहून लहान आकाराच्या ‘काट्र्रिज’मध्ये सामावण्याची युक्ती तोवर साधली होती, पण हे खेळ खेळण्याची साधने सुटसुटीत हवी, त्यांचे नियोजन मसायुकी यांनी केले आणि स्वत: इलेक्ट्रॉनिक अभियंता असल्याने खेळांच्या स्वरूपातही त्यानुसार बदल त्यांनी केले.

जून १९४३ मध्ये जन्मलेल्या मसायुकी यांनी १९७१ मध्ये इलेक्ट्रॉनिक शाखेतील अभियंता पदवी घेतली आणि ते निन्टेन्डो कंपनीत दाखल झाले. अखेरच्या श्वासापर्यंत ते निन्टेन्डोशी जुळले होते. अर्थात त्यांचे अखेरचे पद ‘सरव्यवस्थापक- संशोधन व विकास’ असे होते. निवृत्तीच्या वयानंतर २००४ पासून त्यांनी क्योटो येथील विद्यापीठात ‘गेमिंग स्टडीज’ हा नवा अभ्यासक्रम शिकवण्याची जबाबदारीही पत्करली होती… नेमका हाच काळ, मसायुकींनी बनवलेल्या ‘टीव्ही गेम कन्सोल’च्या अस्ताचाही होता. २००३ नंतर टीव्हीला जोडून खेळण्याच्या कन्सोलचे उत्पादन जपानमध्ये बंद झाले आणि हातातल्या कन्सोलच्या आतच छोटा पडदा व त्यावर गेम, असे दिवस आले. आज मोबाइलच्या जमान्यातही गेम कन्सोलचे दर्दी लोक आहेत. संगणकावरही कन्सोल चालतात. अशा गेमिंगचा थरार अनुभवण्याची युक्ती शोधणारे कामसू, सरळमार्गी मसायुकीसान थोरच!