इटलीतले ‘इंटरनॅशनल सेंटर फॉर थिऑरेटिकल फिजिक्स’, आंतरराष्ट्रीय गणिती संघटना आणि भारताचे विज्ञान-तंत्रज्ञान मंत्रालय यांच्या सहयोगाने दिल्या जाणाऱ्या ‘रामानुजन पुरस्कारा’ने २००५ पासून, ४५ वर्षांखालील आणि विकसनशील देशांतील १६ गणितज्ञांना गौरविले गेले, त्यापैकी फक्त तिघे भारतीय होते. हे तिघेही कोलकात्याच्या ‘भारतीय सांख्यिकी संस्थे’तले प्राध्यापक, तर यंदाचा १७ वा पुरस्कार मिळवणाऱ्या, एकंदर चौथ्या भारतीय ठरलेल्या नीना गुप्ता यादेखील याच संस्थेत सहयोगी प्राध्यापक आहेत. ‘झारिस्की रद्दीकरण कूटप्रश्न’(झारिस्की कॅन्सलेशन प्रॉब्लेम) या ७० वर्षे न सुटलेल्या गणिती प्रश्नाच्या उत्तरासाठी त्यांनी केलेल्या संशोधनाबद्दल त्यांना २०१३ पासून अनेक पुरस्कार मिळाले आहेत, त्यापैकी हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार सर्वांत महत्त्वाचा ठरेल. ‘झारिस्की कूटप्रश्न’ हा बीजगणितीय भूमितीच्या प्रांतातील बहुपदी रचनांविषयीचा कूटप्रश्न. त्याच्या उत्तरासाठी विविधांगी अभ्यास गुप्ता यांनी केला आणि अर्थातच याआधीच्या गणितज्ञांनी झारिस्की प्रश्नावर जी उत्तरे शोधली, त्यांचा ऊहापोह करताना नवे प्रश्नही गुप्ता यांनी उपस्थित केले. यावरील त्यांचे संशोधन-निबंध जिज्ञासूंना आंतरजालावरही पीडीएफ स्वरूपात वाचता येतील. इतरांसाठी, ‘‘शाळेत अगदी दहावीपर्यंत मी गणितात पहिली वगैरे येत नसे. पण मला गणिताची आवड होती आणि प्रश्न सोडवण्यात मी गुंगून जाई’’ हे गुप्ता यांनी एका मुलाखतीत काढलेले उद्गार बरेच काही शिकवणारे ठरावेत!
कोलकात्यातच गुप्ता शिकल्या, २००६ मध्ये गणित विषयासह बीएस्सी झाल्या. ‘आयएसआय’ या लघुनामाने ओळखल्या जाणाऱ्या भारतीय सांख्यिकी संस्थेत जाणे हे त्यांचे स्वप्न होते, ते पीएच.डी.च्या निमित्ताने पूर्ण झाले. याच काळात आंतरराष्ट्रीय गणितज्ञांची व्याख्याने प्रत्यक्ष ऐकून त्यांनी झारिस्की कूटप्रश्नावर काम सुरू केले. २०११-१२ मध्ये मुंबईच्या ‘टीआयएफआर’ (टाटा मूलभूत संशोधन केंद्र) मध्ये फेलोशिपवर आल्या असता तेथील ज्येष्ठ प्राध्यापक श्रीकांत महादेव भाटवडेकर यांच्यासह केलेल्या कामाने अधिक चालना मिळाली आणि २०१३ मध्ये या कूटप्रश्नावरील उत्तराचे भाष्य गुप्ता स्वतंत्रपणे करू शकल्या. हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळवण्यापूर्वी त्यांना टीआयएफआरचा पुरस्कार (२०१३) तरुण शास्त्रज्ञांना दिला जाणारा ‘इन्सा’ पुरस्कार (२०१४), भारताचा ‘डॉ. शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार’ (२०१९) हेही पुरस्कार मिळाले आहेत. किरणोत्सार शोधणाऱ्या मारी क्युरी आणि ‘कम्युटेटिव्ह अल्जेब्रा’ (क्रमनिरपेक्षी बीजगणित) ही नवी विषयशाखा सुरू करणाऱ्या गणितज्ञ एमी नोएथर या गुप्ता यांच्या आदर्श. यापैकी नोएथर यांच्या विषयात गुप्ता यांनी मोठा पल्ला गाठला आहे.