‘२६/११’च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याशी मुकाबला करणारे आणि त्याबद्दल राष्ट्रपती पदकही मिळविणारे सहायक पोलीस निरीक्षक नितीन काकडे यांचे शुक्रवारी (२२ नोव्हेंबर) वयाच्या अवघ्या ४५ व्या वर्षी झालेले निधन, हे चटका लावणारेच होते. मुंबईत मोक्याच्या जागांवर हल्ला करण्याचा तो कट अमलात आणणारे दहशतवादी ताजमहाल हॉटेलातही घुसले असल्याचे समजताच तेथे जाणाऱ्या पहिल्या पोलीस पथकात नितीन काकडे होते. काकडे यांची मुंबईतील पहिलीच नियुक्ती. त्याआधी ते पुण्यात नियुक्त झाले होते. मूळचे पुण्याचे असलेल्या काकडे यांची मुंबईत कुलाबा पोलीस ठाण्यात उपनिरीक्षक म्हणून बदली झाली. गेटवे ऑफ इंडिया आणि ताजमहाल हॉटेलची नवी इमारत यांच्या मधोमधच असलेल्या पोलीस चौकीवर ते तैनात होते. दहशतवादी जुन्या इमारतीत, बहुधा पलीकडल्या रस्त्याने घुसले होते. हे कळताच काकडे आत गेले. त्यानंतर काही वेळातच मुंबईत परिमंडळ एकच्या उपायुक्तपदी असलेले विश्वास नांगरे-पाटील, कुलाबा पोलीस निरीक्षक दीपक ढोबळे, मुंबईचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त राजवर्धन सिन्हा हे ‘ताज’मध्ये पोहोचले, त्यापूर्वी या हॉटेलातील अनेक लोकांना सावध करून, त्यांना सुखरूप बाहेर काढण्याचे काम काकडे यांनी सुरू केले होते.

‘ताज’च्या नव्या इमारतीतून पुढे जुन्या इमारतीतही काकडे गेले, मात्र तेथे दहशतवादय़ांनी केलेल्या ग्रेनेडस्फोटात ते भाजले आणि रुग्णालयात दाखल केले गेल्याने पुढल्या कारवाईत सहभागी होऊ शकले नाहीत. मात्र मुंबईतील पहिल्याच नियुक्तीत अंगावर पडलेली जबाबदारी तेवढय़ाच धाडसाने त्यांनी पार पाडली होती.

काकडे मूळचे सासवडचे. पोलीस दलात १९९६ मध्ये त्यांनी प्रवेश केला. मुंबईत म. फुले मंडईनजीकच्या पोलीस वसाहतीत राहणारे काकडे स्वच्छ प्रतिमेचे आणि कार्यक्षम म्हणून ओळखले जात. अलीकडे परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्तांचे ‘रीडर’ म्हणून ते काम करीत. नित्याप्रमाणे मरीन ड्राइव्हवर संध्याकाळी धावत असतानाच त्यांना हृदविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. दरवर्षीप्रमाणे यंदाही जानेवारी २०२० मध्ये होणाऱ्या २१ किलोमीटर मॅरेथॉनमध्ये ते सहभागी होणार होते. त्याचसाठी ते नियमित मेहनत घेत होते.

२६/११ हल्ला कुठला आहे याचा मागचापुढचा विचार न करता थेट झोकून देणाऱ्या या लढवय्या अधिकाऱ्याचा असा मृत्यू पोलीस दलासही अपेक्षित नव्हता.