नौदलाच्या युद्धनौकातून जी विमाने आकाशात झेपावतात ती सागरी प्रदेशाचे रक्षण करण्यात फार मोठी भूमिका पार पाडत असतात. भारतीय नौदलात अशी विमाने लीलया उडवण्याचे कौशल्य साधलेल्या एका गरुडाचे पंख अखेर विसावले आहेत. ‘ग्रेएस्ट ऑफ द ईगल्स’ असे ज्यांना म्हटले जायचे ते माजी नौदलप्रमुख राधाकृष्ण हरिराम तहिलियानी यांचे नुकतेच निधन झाले.
नौदलात ज्यांनी सक्रिय भूमिका पार पाडली, त्यात तहिलियानी यांचा समावेश होता. त्यांचा जन्म १२ मे १९३० रोजी झाला. १ सप्टेंबर १९५० रोजी ते भारतीय नौदलात वैमानिक म्हणून रुजू झाले. युद्धनौकांवरील विमानांची उड्डाणे ते करीत असत. अमेरिकेतील नौदल युद्ध महाविद्यालयाचे ते पदवीधर होते, त्यानंतर त्यांनी नवी दिल्लीच्या डिफेन्स कॉलेजमधून पदवी घेतली. १९७७ मध्ये त्यांना रिअर अॅडमिरल पदावर बढती मिळाली, गोवा भागात फ्लॅग ऑफिसर म्हणून त्यांनी काम केले. पश्चिमेकडील नौदल विभागाचे ते फ्लॅग ऑफिसर होते. काही काळ त्यांनी नौदल मुख्यालयातही काम केले. कालांतराने ते व्हाइस अॅडमिरल झाले. नंतर दक्षिण विभागाचे व्हाइस अॅडमिरल म्हणून त्यांना बढती मिळाली. पश्चिम नौदल विभागाचे ते १९८३ मध्ये ‘फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ’ बनले. १८ मे १९६१ रोजी त्यांनी नौदलात वैमानिक म्हणून काम करताना आयएनएस विक्रांत युद्धनौकेवर सीहॉक विमाने ज्या डौलात उतरवली होती तो एक अभिमानास्पद क्षण होता. १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धात आयएनएस ३००० या युद्धनौकेवरील विमानांच्या काफिल्याची धुरा त्यांनी सांभाळली होती. पाकिस्तानचा त्या वेळी पराभव होण्यात नौदलाने पूर्वेकडे केलेली कोंडी हे प्रमुख कारण होते. १ डिसेंबर १९८४ ते २० नोव्हेंबर १९८७ या काळात ते नौदलप्रमुख होते. आयएनएस त्रिशूल व आयएनएस विक्रांत या दोन्ही युद्धनौकांवर त्यांनी काम केले होते. आयएनएस विराट ही दुसरी युद्धनौका खरेदी करण्याच्या प्रक्रियेत त्यांचा मोठा वाटा होता. त्याचबरोबर, नौदलासाठी सी हॅरियर विमाने खरेदी करून त्यांनी सागरी सुरक्षा भक्कम केली होती. त्यांना अतिविशिष्ट सेवा पदक व परम विशिष्ट सेवापदक देऊन गौरवण्यात आले होते. ३० नोव्हेंबर १९८७ रोजी ते निवृत्त झाले; त्यानंतर १९९० ते ९४ या काळात ते सिक्कीमचे राज्यपाल होते. ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलच्या भारतीय शाखेचे ते २०१० पर्यंत अध्यक्ष होते.