दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग व मुख्यमंत्री अरिवद केजरीवाल यांच्यातील संघर्ष सर्वश्रुत आहे. पण दिल्लीच्या लोकायुक्तपदी दिल्ली उच्च नायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती रेवा खेतरपाल यांची निवड करताना मात्र त्यांच्यातील मतक्याचे दर्शन घडले. कारण लोकायुक्त निवडण्याच्या समितीत केजरीवाल व जंग हे एकत्र असूनही ही निवड कुरबुरी न होता पार पडली. लोकायुक्तपदाच्या शर्यतीत हरयाणा व पंजाब उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश जसबीर सिंग व ओदिशा उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश बिलाल नाझकी हे होते, पण त्यात खेतरपाल यांनी बाजी मारली आहे.
आम आदमी पक्षाने सत्तेवर येताच लोकायुक्त नेमण्याचे आश्वासन दिले होते, पण पहिल्या सहा महिन्यांत ही नियुक्ती होऊ शकली नाही. दिल्लीचे लोकायुक्तपद हे महत्त्वाचे अशासाठी आहे की, तेथील सरकार भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाने जे नेते पुढे आले त्या अरिवद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली आहे. दिल्लीचे अन्नमंत्री असीम अहमद खान यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अलीकडेच मुख्यमंत्री केजरीवाल यांनी पदावरून काढून टाकले होते.यापूर्वी निवृत्त न्यायाधीश मनमोहन सरीन हे दिल्लीचे लोकायुक्त होते,पण २०१३ नंतर या पदावर कुणाची नियुक्ती करण्यात आली नव्हती.
खेतरपाल यांचा जन्म सिमल्यातला. त्यांचे शिक्षण मिरांडा हाऊस महाविद्यालयात झाले. नंतर त्या दिल्ली विद्यापीठाच्या विधि महाविद्यालयात प्राध्यापकही होत्या. खेतरपाल यांच्यापुढे रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केजरीवाल यांच्यावर दाखल केलेल्या बेअदबीचा खटला चालला होता, त्या वेळी त्यांनी तुम्ही सुजाण राजकारणी आहात, त्यामुळे हे प्रकरण मिटवून टाका असा सल्ला दोघा नेत्यांना दिला होता. १९९१ मध्ये त्यांची अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश म्हणून नेमणूक झाली होती. २००६ मध्ये त्यांना दिल्ली उच्च न्यायालयात बढती मिळाली. १६ डिसेंबर २०१२ रोजी दिल्लीत एका मुलीवर चालत्या गाडीत बलात्कार झाला होता. त्यानंतर मोठा जनक्षोभही उसळला होता. त्यातील आरोपींच्या फाशीवर त्यांनी शिक्कामोर्तब केले होते. सप्टेंबर २०१४ मध्ये त्या निवृत्त झाल्या. लोकायुक्त म्हणजेच भ्रष्टाचारविरोधी लोकपाल पदावर मी पूर्णपणे निष्पक्षपाती व न्याय्य पद्धतीने काम करीन, कारण तरच या नियुक्तीचा उद्देश साध्य होणार आहे, असे त्या सांगतात. त्यांचा कायदा क्षेत्रातील अनुभव मोठा आहे यात शंका नाही, पण केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्यात जो संघर्ष चालू आहे त्यात कुणा एकाच्या हातचे बाहुले न बनण्याचे आव्हान त्यांच्यापुढे आहे.

Story img Loader