मध्य प्रदेशातील एक जिल्हा. आपल्या देशातील साडेसहाशे जिल्ह्य़ांपकी असलेल्या होशंगाबाद या जिल्ह्य़ात एक मराठी प्रशासकीय अधिकारी धडाडीने काम करीत आहेत, त्यांचे नाव संकेत भोंडवे. जिल्ह्य़ातील विशेष लोकांच्या पुनर्वसनाकरिता उत्कृष्ट प्रशासकीय सेवेचा पुरस्कार त्यांना पंतप्रधानांच्या वतीने अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
भोंडवे मूळचे िपपरी-चिंचवडचे. त्यांचे शिक्षण एच. ए. स्कूल, डी. वाय. पाटील महाविद्यालय व पुणे विद्यापीठात झाले. बाहेरच्या राज्यात जाऊन काम करायला एरवी मराठी माणसे तयार नसतात असे म्हटले जाते, पण भोंडवे यांनी महाराष्ट्राची सीमाच ओलांडली नसून मराठी कर्तृत्वाचा शिक्काही देशपातळीवर उमटवला आहे. भोंडवे यांनी त्यांच्या सहाकाऱ्यांना हाताशी धरून होशंगाबाद येथे विशेष लोकांच्या सक्षमीकरणासाठी काम करताना एका वर्षांत २५ हजार लोकांना सक्षम केले आहे. भोंडवे हे २००७ मधील प्रशासकीय सेवा तुकडीतील अधिकारी. समाजासाठी काही तरी करून दाखवण्याच्या निर्धाराने ते या सेवेत आले आहेत. त्यांच्या मते काही लोक प्रगती करतात व काही मागे राहतात असे होता कामा नये. प्रगतीची ही असमानता दूर केली तर आपला देश मागे राहण्याचे काहीच कारण नाही. भोंडवे यांची कारकीर्द सागर जिल्ह्य़ात खुराईचे उपविभागीय अधिकारी म्हणून सुरू झाली, नंतर ते सिवनी जिल्हा परिषदेचे सीईओ होते. २०११ मध्ये त्यांना मुख्यमंत्र्यांचा उत्कृष्ट प्रशासकीय सेवा पुरस्कार मिळाला होता. अशोकनगर व दातिया येथेही त्यांनी जिल्हाधिकारी म्हणून काम केले आहे. भोंडवे यांच्या सहकाऱ्यांमध्ये तहसीलदार, ग्रामसेवक असे अनेक जण आहेत, त्यांनी विशेष लोकांना सक्षम करण्यासाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या. त्यांना स्वयंपूर्ण केले, वेगवेगळी कौशल्ये शिकवली. अनेकांना शेतीची अवजारे दिली. विमा संरक्षण देऊन १०१ जोडप्यांचे विवाहही करून दिले, शिवाय पाच लाखांची आíथक मदतही दिली. सरकारी कार्यालयांमध्ये वावरणे विशेष लोकांना सोपे जावे म्हणून काहीच सुविधा नसते. पायऱ्या त्यांना चढता येत नाहीत त्यासाठीभोंडवे यांनी होशंगाबाद जिल्ह्य़ात सर्व सरकारी कार्यालयात रॅम्पस तयार केले आहेत. पंधराशे मानसिक विकलांगांना पेन्शन सुरू केली. उमंग कार्यक्रमात त्यांनी विशेष लोकांना तीनचाकी सायकली, कृत्रिम अवयव तर दिलेच शिवाय आरोग्य तपासणीचीही व्यवस्था केली. मराठी माणसे जेव्हा दुसरीकडे जाऊन देशाच्या प्रगतीत योगदान देतात तेव्हा नकळत आपलीही मान ताठ होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा