पुण्याच्या फर्गसन महाविद्यालयातून विज्ञान विषयात पदवी घेतल्यानंतर खरे तर डॉ. प्रभा अत्रे यांनी वेगळ्याच क्षेत्रात जायला हवे होते. वडील शिक्षक असल्याने आणि घरात वैचारिक पुढारलेपण असल्यामुळे प्रभाताईंनी संगीत शिकण्याचे ठरवले आणि एरवी त्या काळात कोणत्याही मध्यमवर्गीय कुटुंबात मुलीला जसा विरोध झाला असता, तसे काहीच न घडता, त्या थेट सुरेशबाबू माने यांच्याकडे गाणे शिकण्यासाठी पोहोचल्या. किराणा घराण्याचे संस्थापक खाँसाहेब अब्दुल करीमखाँ यांचे चिरंजीव असलेले सुरेशबाबू हे संगीताच्या क्षेत्रातील एक अवलिया व्यक्तिमत्त्व होते. प्रभात स्टुडिओजमध्ये संगीतकार म्हणून व्ही. शांताराम यांनी त्यांची निवड केली होती आणि काळाच्या किती तरी पुढे असलेल्या सुरेशबाबूंनी मराठीमध्ये ठुमरीच्या रचना लोकप्रिय केल्या होत्या. प्रभाताईंना त्यांच्याकडून संगीताचे जे शिक्षण मिळाले, ते अस्सल घराणेदार होते. त्यानंतर हिराबाई बडोदेकर यांच्याकडे त्यांनी तालीम घेतली. हिराबाई या सुरेशबाबू यांच्या भगिनी. त्यामुळे घराण्याच्या संगीताचे संस्कार प्रभाताईंवर अतिशय व्यवस्थितपणे झाले. किराणा घराण्याच्या गायनशैलीत स्वभावत: असलेली लोकशाही प्रभाताईंनीही अंगीकारली आणि त्यांनी घराण्याच्या चौकटीत राहूनच स्वत:ची वेगळी वाट शोधण्याचा प्रयत्न केला. संगीतात प्रत्यक्ष मैफलीत होणारे गायन ही एक अतिशय महत्त्वाची सांस्कृतिक घटना असते, याचे भान प्रभाताईंना अगदी लहानपणापासून होते. उच्चविद्याविभूषित असल्याने, या कलेकडे अधिक डोळसपणे पाहण्याची वृत्तीही त्यांनी अंगी बाणवली. त्यामुळेच या गायनशैलीचा केंद्र्रंबदू ढळू न देताही अनेक कलावंतांनी प्रयोगशील राहून आपली मोलाची भर घातली. भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांनी जो अतिशय महत्त्वाचा सांगीतिक प्रयोग केला, त्याची पुढची पायरी प्रभाताईंनी गाठली आणि संगीताच्या क्षेत्रात आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले.

हे सारे आपोआप झाले, असे जरी त्यांचे म्हणणे असले, तरी त्यामागे काही निश्चित चिंतनाची बैठक होती. मारुबिहाग आणि कलावती या रागांच्या गायनाची त्यांची ध्वनिमुद्रिका इतकी लोकप्रिय झाली, की त्यानंतर त्यांना ध्वनिमुद्रणासाठी आणि प्रत्यक्ष मैफलीसाठी अनेक निमंत्रणे येऊ लागली. प्रभाताईंनी त्या वेळी त्याकडे फारसे लक्ष दिले नाही, तरीही त्यांच्या मनातील स्वरांचा तंबोरा अखंड निनादतच होता. त्यामुळे संगीतात कलावंत असणे आणि त्याबरोबरच त्याचा व्यासंगही करणे अशा दोन पातळ्यांवर प्रभाताईंना काही भरीव कामगिरी करता आली. सरगम या संगीतातील एका अतिशय लोभस अलंकाराचा शास्त्रशुद्ध अभ्यास करून डॉ. प्रभा अत्रे यांनी सादर केलेल्या प्रबंधाला पीएच.डी. पदवीही मिळाली. संगीतातील भावात्मकतेला प्राधान्य देत, शब्दांना स्वरांचा मुलामा चढवत, त्यांनी आपली गायनशैली विकसित केली. त्यामुळेच त्यांचे गायन त्यांच्या समकालीन कलावंतांपेक्षा वेगळे आणि उठावदार झाले.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

संगीतात गायक आणि नायक अशा दोन संकल्पना मानल्या जातात. गायक हे कलांचे सादरीकरण करतात, तर नायक हे बंदिशींची रचना करतात. प्रभाताईंनी नायक म्हणून केलेली कामगिरीही अतिशय तोलामोलाची म्हटली पाहिजे. सुस्वराली या नावाने त्यांनी या बंदिशींचा संग्रह प्रकाशित केला आहे. अभिजात संगीत अधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी सुरू केलेला संग्रहालयाचा प्रकल्प असो, की स्वरमयी गुरुकुल या नावाने नव्या कलावंतांना रसिकांसमोर सादर करण्याची योजना असो, प्रभाताई नेहमीच संगीतासाठी कार्यरत राहिल्या आहेत. या कार्यामुळे त्यांना जाहीर झालेला पद्माविभूषण हा किताब सार्थ ठरला आहे.