पुण्याच्या फर्गसन महाविद्यालयातून विज्ञान विषयात पदवी घेतल्यानंतर खरे तर डॉ. प्रभा अत्रे यांनी वेगळ्याच क्षेत्रात जायला हवे होते. वडील शिक्षक असल्याने आणि घरात वैचारिक पुढारलेपण असल्यामुळे प्रभाताईंनी संगीत शिकण्याचे ठरवले आणि एरवी त्या काळात कोणत्याही मध्यमवर्गीय कुटुंबात मुलीला जसा विरोध झाला असता, तसे काहीच न घडता, त्या थेट सुरेशबाबू माने यांच्याकडे गाणे शिकण्यासाठी पोहोचल्या. किराणा घराण्याचे संस्थापक खाँसाहेब अब्दुल करीमखाँ यांचे चिरंजीव असलेले सुरेशबाबू हे संगीताच्या क्षेत्रातील एक अवलिया व्यक्तिमत्त्व होते. प्रभात स्टुडिओजमध्ये संगीतकार म्हणून व्ही. शांताराम यांनी त्यांची निवड केली होती आणि काळाच्या किती तरी पुढे असलेल्या सुरेशबाबूंनी मराठीमध्ये ठुमरीच्या रचना लोकप्रिय केल्या होत्या. प्रभाताईंना त्यांच्याकडून संगीताचे जे शिक्षण मिळाले, ते अस्सल घराणेदार होते. त्यानंतर हिराबाई बडोदेकर यांच्याकडे त्यांनी तालीम घेतली. हिराबाई या सुरेशबाबू यांच्या भगिनी. त्यामुळे घराण्याच्या संगीताचे संस्कार प्रभाताईंवर अतिशय व्यवस्थितपणे झाले. किराणा घराण्याच्या गायनशैलीत स्वभावत: असलेली लोकशाही प्रभाताईंनीही अंगीकारली आणि त्यांनी घराण्याच्या चौकटीत राहूनच स्वत:ची वेगळी वाट शोधण्याचा प्रयत्न केला. संगीतात प्रत्यक्ष मैफलीत होणारे गायन ही एक अतिशय महत्त्वाची सांस्कृतिक घटना असते, याचे भान प्रभाताईंना अगदी लहानपणापासून होते. उच्चविद्याविभूषित असल्याने, या कलेकडे अधिक डोळसपणे पाहण्याची वृत्तीही त्यांनी अंगी बाणवली. त्यामुळेच या गायनशैलीचा केंद्र्रंबदू ढळू न देताही अनेक कलावंतांनी प्रयोगशील राहून आपली मोलाची भर घातली. भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांनी जो अतिशय महत्त्वाचा सांगीतिक प्रयोग केला, त्याची पुढची पायरी प्रभाताईंनी गाठली आणि संगीताच्या क्षेत्रात आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा