मुंबई महापालिकेचा चालताबोलता इतिहास म्हणून ज्यांचा उल्लेख सन्मानाने करता येई, असे व्यक्तिमत्त्व म्हणजे वास्तुरचनाकार प्रतापराव मोतीराम वेलकर. मुंबई शहराच्या मौखिक इतिहासाशी त्यांचा थेट संबंध होता. अखेरपर्यंत त्यांची स्मरणशक्ती दांडगी होती. कोणताही संदर्भ ते बिनचूक सांगत. शेवटपर्यंत त्यांची वाणी खणखणीत होती. अलीकडेच त्यांच्या पत्नीचे निधन झाल्यावर ते काहीसे स्तब्ध झाले होते. केवळ शहराच्या वास्तुरचनेशीच नव्हे तर जुन्या काळाशी आधुनिक काळाची सांगड घालणारे ते व्यक्तिमत्त्व होते. प्रतापरावांचे वडील म्हणजे मुंबईतील ख्यातनाम शल्यचिकित्सक डॉ. मोतीराम वेलकर. हे लोकमान्य टिळकांचे मुंबईतले उजवे हात होते. लोकमान्य टिळक जेव्हा व्हॅलेन्टाइन चिरोलवर बदनामीचा खटला दाखल करण्यासाठी लंडनला गेले तेव्हा त्यांनी डॉ. वेलकर यांना सोबत नेले होते. अर्थात त्यानंतर अडीच वर्षांनी प्रतापरावांचा जन्म झाला. प्रतापरावांनी मुंबईच्या इतिहासासंदर्भात, येथील सुधारणांसंदर्भात तसेच इथल्या सामाजिक, ऐतिहासिक बदलांवर विपुल लेखन केले आहे. त्यांनी लिहिलेल्या पाठारे प्रभूंच्या इतिहासामध्ये मुंबईच्या चौपाटीवर उडविण्यात आलेल्या पहिल्या विमानाची हकीकत नोंदली गेली आहे. शिवकर बापूजी तळपदे यांच्या पहिल्या विमानाची गोष्ट, त्यासाठी लागलेल्या निधीसाठीची धावपळ या सर्व घटनांची नोंद त्यांनी केल्यामुळेच या ऐतिहासिक घटनेचा संदर्भ अभ्यासकांना मिळाला. लंडनमध्ये वास्तुरचनेची पदवी घेतल्यावर प्रतापराव मुंबई महापालिकेत वास्तुरचनाकार म्हणून नोकरीस लागले. मात्र शहराच्या विविध भागांतील ऐतिहासिक संदर्भांवर विपुल लिखाणामुळे त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली. मुंबईत काळबादेवी परिसरातील १७९६ पासूनचे राम मंदिर म्हणजे चापेकर बंधूंच्या मुंबईतील क्रांतिकार्याचे स्मारक असल्याचे त्यांनी एका पुस्तकात नमूद केले आहे. १९५६ पासून ते या मंदिराच्या विश्वस्तपदी कार्यरत होते. त्यांनी त्याकाळच्या ऐतिहासिक व्यक्तींचा स्वातंत्र्य चळवळीतील सहभाग असलेल्या घटनांची आपल्या संदर्भलेखांमध्ये नोंद केल्यामुळे मुंबईचा राजकीय, सामाजिक अंगाने अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांना मोलाची मदत झाली. ‘अव्यक्त लोकमान्य’ आणि ‘तिसरा सावरकर’ ही त्यांची गाजलेली पुस्तके होत. ‘लोकमान्य टिळक आणि डॉ. वेलकर’ या त्यांच्या ग्रंथाबद्दल त्यांचा पुण्यात प्रा. ग. प्र. प्रधान यांच्या हस्ते आणि डॉ. य. दि. फडके यांच्या अध्यक्षतेखाली सत्कार करण्यात आला होता. प्रतापराव वेलकर यांनी पालिकेच्या विविध योजनांवर, विकासकामांवरही लेखन केले. त्यांच्या निधनाने शहराचा चालताबोलता संदर्भग्रंथ आता काळाच्या पडद्याआड गेला आहे.
प्रताप मोतीराम वेलकर
हे लोकमान्य टिळकांचे मुंबईतले उजवे हात होते. लोकमान्य टिळक जेव्हा व्हॅलेन्टाइन चिरोलवर बदनामीचा खटला दाखल करण्यासाठी लंडनला गेले तेव्हा त्यांनी डॉ. वेलकर यांना सोबत नेले होते.
Written by लोकसत्ता टीम
First published on: 22-12-2021 at 00:01 IST
मराठीतील सर्व व्यक्तिवेध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Profile pratap motiram velkar akp