एकीकडे इस्रायलच्या कृषी अभ्यास दौऱ्यांना हौसेने जायचे, तर दुसरीकडे आपल्या उसाला ठिबकसिंचनाच्या सक्तीविषयीचे निर्णय हाणून पाडण्यासाठी प्रयत्न करायचे ही दुविधा महाराष्ट्रासह देशातील अनेक ठिकाणच्या शेतकऱ्यांची दिसते; याचे कारण ‘तुम्ही हे करूनही यशस्वीच होऊ शकता,’ असा विश्वास शेतकऱ्यांना कुणी देत नाही. तसा विश्वास देण्यासाठी तज्ज्ञता, जाणकारी यांचे भक्कम पाठबळ लागते. अशी जाणकारी सिंचनतज्ज्ञ प्रवीण राव यांच्याकडे आहे, यावर त्यांना नुकत्याच मिळालेल्या ‘डॉ. एम. एस. स्वामीनाथन पुरस्कारा’ने शिक्कामोर्तब केले! मानपत्र व दोन लाख रु. अशा स्वरूपाचा हा पुरस्कार २००४ पासून दर दोन वर्षांनी ‘आयसीएआर’ (भारतीय कृषी अनुसंधान परिषद) व तिची कर्मचारी संघटना तसेच एक खासगी बियाणे-कंपनी यांच्यातर्फे दिला जातो. राव यांची निवड मार्च २०२० मध्येच झाली होती, तो पुरस्कार आता प्रदान करण्यात आला.
ठिबक व अन्य प्रकारचे सूक्ष्मसिंचन हा राव यांच्या विशेष अभ्यासाचा विषय. त्यासाठी पाच वर्षे त्यांनी इस्रायलमधील प्रकल्पांवरही काम केलेले आहे. १९९५ मध्ये त्यांना इस्रायली परराष्ट्र खात्याची ‘मशाव फेलोशिप’ मिळाली आणि इस्रायलतर्फे आशिया व दक्षिण अमेरिकेतील २० देशांत ते सूक्ष्मसिंचन पद्धतींचे मार्गदर्शन करणाऱ्या तज्ज्ञ गटात समाविष्ट झाले. सध्या ‘प्रा. जयशंकर तेलंगणा कृषी विद्यापीठा’च्या कुलगुरूपदी असलेले डॉ. राव, १९८३ पासून कृषी शिक्षणाच्या क्षेत्रात आहेत. आजवर ११ एम.एस्सी.- अॅग्रिकल्चर आणि दहा पीएच.डी. त्यांच्या हाताखाली तयार झाले. संशोधन-पत्रिकांमधील एकंदर ११७ शोधनिबंध व दहा पुस्तके त्यांच्या नावावर आहेत, तसेच स्थानिक शेतकऱ्यांसाठी तेलुगू भाषेतील २२ पुस्तिकाही त्यांनी लिहिल्या आहेत. आजवर १९८ सूक्ष्मसिंचन प्रकल्पांना त्यांनी मार्गदर्शन केले. यापैकी १३ प्रकल्प मोठ्या प्रमाणावरील होते. अनेक राज्य सरकारांच्या सिंचन सल्लागार गटांवर ते मार्गदर्शक म्हणून कार्यरत होते. उसासाठी ठिबकसिंचनाचा प्रभावी वापर करता येतो हे त्यांनी दाखवून दिले होतेच; पण अन्य अनेक पिकांसाठी सूक्ष्मसिंचन हाच किफायतशीर पर्याय असू शकतो, हेही त्यांच्या प्रयोगांमुळे अनेक शेतजमिनींमध्ये वारंवार सिद्ध होत राहिलेले आहे. यापैकी तेलबिया प्रकल्पांसाठी त्यांनी केलेले सिंचन-मार्गदर्शन विशेष उल्लेखनीय आहे. कृषीतज्ज्ञांच्या एकंदर १४ विविध अभ्याससंस्थांचे ते सदस्य आहेत.