अभिजात संगीतातील बिनीचे शिलेदार गज़लकडे वळले आणि गज़ल हा साहित्य प्रकार उर्दू आणि हिंदी भाषांमध्ये कमालीचा लोकप्रिय झाला. मेहदी हसन यांनी सत्तरच्या दशकात गायलेल्या गज़्ालांनी संगीत रसिक अक्षरश: वेडे झाले होते. पाकिस्तानमध्ये राहणाऱ्या मेहदी हसन यांच्या लोकप्रियतेमुळे हा संगीत प्रकार भारतातील कलावंतांनाही खुणावू लागला. जगजीत सिंग-चित्रा सिंग यांनी एकत्रितपणे गज़लगायनाचे कार्यक्रम करण्यापूर्वी मुंबईत राजेंद्र आणि नीना मेहता यांनी गज़लच्या सहगायनाचे कार्यक्रम करायला सुरुवात केली होती. शब्द आणि त्यातील भाव ओळखून त्यातील स्वरांचे पदर उलगडून दाखवण्याची या दोघांची कुशलता तेव्हाच्या रसिक वर्तुळात खूपच नावाजली गेली. ‘एक प्यारासा गांव’, ‘हमने शराब लेके हवा में उछल दी’, ‘ताज महल में आ जाना’ या त्यांच्या गज़्ालांनी तेव्हा सगळ्यांना मोहून टाकले होते. प्रसिद्धीच्या वलयापासून जरासे अंतर राखतच मेहता दाम्पत्याने आपले कार्यक्रम आवडत्या रसिकांसाठी सादर केले. त्यामुळे त्यांना राष्ट्रीय पातळीवरील प्रसिद्धीच्या झोतात येता आले नाही, पण त्यांना त्याचे कधीच अप्रूप नव्हते. त्यामुळे त्याबद्दल त्यांच्या मनात कधी लालसाही निर्माण झाली नाही. ‘म्युझिकल मेहताज्’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या राजेंद्र-नीना मेहता यांच्यातील राजेंद्र मेहता यांचे नुकतेच निधन झाले, तेव्हा त्यांच्या या चाहत्यांना सगळ्या आठवणी येणे स्वाभाविकच होते. १९६७मध्ये विवाह झाल्यानंतर सुमारे ३५ वर्षे या दोघांनी अनेक कार्यक्रम केले. कळायला सोपे शब्द आणि त्यांच्या भावात दडलेले सूर शोधणारे त्यांचे गायन, हे त्यांचे वैशिष्टय़. तरुण वयात लाहोरमधील नभोवाणी केंद्रात बातम्यांचे निवेदक म्हणून त्यांनी काम केले. फाळणीनंतर ते मुंबईत स्थायिक झाले. कैफी आजमी, फैज महमद फैज यांच्यासारख्या कवींशी त्यांचा जवळचा संबंध आला. स्वभावातच असलेले मार्दव आणि संवेदनशीलता यामुळे चांगली कविता समजून घेणे हा त्यांचा छंद होता. या कवितेला असलेले सुरांचे कोंदण कविता अधिक गडद करते, हे त्यांच्या गायनावरून अनेकांच्या लक्षात आले. भारत सरकारचा एकही पुरस्कार न मिळणे ही त्यांच्यासाठी क्लेशदायक गोष्ट नव्हती, कारण त्यांना आपला ‘ब्रँड’ बनवायचाच नव्हता. गुलाम अली, पंकज उदास, जगजीत सिंग, तलत अझीझ यांच्यासारख्या नावाजलेल्या गज़लगायकांच्या तुलनेत राजेंद्र मेहता कुठेही कमी नव्हते. पण त्यांना आपल्या खास रसिकांचीच अधिक काळजी असल्याने, ते सतत स्वत:मध्ये रमत गेले. त्यांच्या निधनाने एकेकाळी रसिकांच्या गळ्यातील ताईत बनलेला एक ज्येष्ठ कलावंत हरपला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 19th Nov 2019 रोजी प्रकाशित
राजेंद्र मेहता
मेहदी हसन यांनी सत्तरच्या दशकात गायलेल्या गज़्ालांनी संगीत रसिक अक्षरश: वेडे झाले होते.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 19-11-2019 at 02:01 IST
मराठीतील सर्व व्यक्तिवेध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Profile rajendra mehta akp