मानवाचा उगम नेमका कुठे झाला याबाबत खात्री नव्हती त्या वेळेस चाल्र्स डार्विन याने मात्र छातीठोकपणे आफ्रिकेचेच नाव घेतले होते. मात्र त्याचा पुरावा सापडत नव्हता. ओल्डुवाईच्या चिंचोळ्या खोऱ्यामध्ये मेरी लिकीला हा पुरावा सापडला. मात्र त्याचे श्रेय तिचा नवरा असलेल्या लुईस लिकीलाच अधिक मिळाले. याच मातापित्यांच्या पोटी १९ डिसेंबर १९४४ साली जन्माला आलेल्या या मुलाने वयाच्या सहाव्या वर्षी आयुष्यातील पहिल्या जीवाश्माचा शोध घेतला, ते होते ऱ्हास पावलेल्या मोठ्या आकाराच्या डुकराचे. आई-वडील पुरातत्त्वज्ञ आणि मानववंशशास्त्रज्ञ, त्यामुळे कदाचित कुणाला हे ‘सहज’ वाटू शकते. पण नंतर याच मुलाने मोठे झाल्यानंतर १९६०-७०च्या दशकात होमो हिबिलिसच्या तब्बल ४०० हून अधिक कवट्यांची जीवाश्मे शोधण्यात यश मिळवले. तर काही पूर्ण सांगाडेही मिळाले. त्यामुळे मानवी उत्क्रांतीच्या अभ्यासालाही वेगळे वळण मिळाले. या जीवाश्माची कालनिश्चिती रिचर्डने २६ लाख वर्षे केली होती, मात्र जगभरच्या संशोधकांनी ती १८-२० लाखांपर्यंत असल्याचे मान्य केले. त्याच्या वडिलांचे अनेक शोध वादग्रस्त ठरले तसेच याचेही झाले. मात्र जीवाश्म सापडणे हा लिकी कुटुंबीयांचाच जणू हातखंडा विषय झाला. रिचर्डला खोऱ्याने सापडलेल्या जीवाश्मांनंतर तर लिकी लक नावाचा शब्दप्रयोगच इंग्रजीत अस्तित्वात आला.
सुरुवातीस आई-वडिलांचा जीवाश्मशास्त्र किंवा पुरातत्त्वाचा मार्ग नाकारणाऱ्या रिचर्डने सफारी गाइड म्हणून केले. मात्र नंतर केनियिच्या लेक तुर्काना परिसरामध्ये कूबी फोरा येथे तब्बल ४०० होमिनिन जीवाश्मांचा शोध घेतला. आजवर शोधण्यात आलेल्या जीवाश्मांमध्ये मानवी वंशजांच्या संदर्भात घेण्यात आलेला हा सर्वात मोठा शोध मानला जातो. होमिनिन या टप्प्यापासून माणूस होण्याची प्रक्रिया खरी सुरू झाली असे मानले जाते. हा मानवाचा थेट नव्हे तरी अप्रत्यक्ष वंशज.
१९७० नंतर सेंटर फॉर प्रीहिस्ट्री आणि पेलिएंटॉलॉजीमध्ये काम करण्यास त्याने सुरुवात केली. १९८९ साली त्याने पुन्हा एकदा आपले करिअर बदलले आणि आफ्रिकेच्या वन्यजीवांचे रक्षण करण्याची जबाबदारी त्याने स्वीकारली. हत्तींची शिकार करून हस्तिदंताची तस्करी रोखण्याची जबाबदारी त्याने चोख पार पाडली. तस्करांकडून हस्तगत केलेले १२ टन हस्तिदंत नैरोबी नॅशनल पार्कमध्ये जाळण्याच्या घटनेनंतर त्याचे नाव जगभर चर्चेत आले.
१९९३ साली मात्र विमान अपघातात त्याला दोन्ही पाय गमवावे लागले. हा घातपात असल्याची चर्चाही त्या वेळी जगभर झाली. त्यानंतर दोनच वर्षांत स्वस्थ न बसता त्याने सफिना पार्टी या राजकीय पक्षाचीही स्थापना केली. १९९७-९९ या काळात ते मंत्रीसुद्धा झाले. मात्र भ्रष्टाचाराचे आरोप करत त्यांना बाजूस सारण्यात आले. २०१५ साली मात्र पुन्हा एकदा पंतप्रधान हुरू केन्याटा यांनी त्यांची केनिया वाइडलाइफ सव्र्हिसेस बोर्डच्या अध्यक्षपदी निवड केली. ‘फेलो ऑफ रॉयल सोसायटी’ हा कोणत्याही संशोधकासाठी सर्वात मोठा सन्मान… या सन्मानाने लुईस लिकींना हुलकावणी दिली, मात्र रिचर्ड यांना हा सन्मान लाभला.
मानवी उत्क्रांतीचा महत्त्वाचा टप्पा समजून घेण्यासाठी ज्याचे प्रयत्न जगास उपयुक्त ठरले व भविष्यातही ठरतील अशा या संशोधकाचे अलीकडेच- २ जानेवारी रोजी निधन झाले. मात्र त्याच्या शोधामुळे अस्तित्वात आलेला लिकी लक हा शब्दप्रयोग पुढेही सुरूच राहील.